राष्ट्र सेवा दल

(राष्ट्रसेवा दल या पानावरून पुनर्निर्देशित)

युवा पिढीला राष्ट्रनिष्ठा, लोकशाही, जातिधर्मातीतता, समता. विज्ञानाभिमुखता इत्यादींची शिकवण देण्यासाठी काम करणारी राष्ट्र सेवा दल ही एक प्रमुख स्वयंसेवी संघटना आहे. हिची स्थापना साने गुरुजी यांनी केली.

योगदान

संपादन

स्वांतंत्र्यचळवळ

संपादन

[]अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाखाली देशात स्वातंत्र्याची चळवळ चालू होती. या चळवळीच्या कामात शिस्त व व्यवस्थितपणा आणायला मदत करणे व लहान मुलामुलींना जाति-धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाचे धडे देणे, ही कामे करण्यासाठी युवक संघटना चालवण्याची अपरिहार्यता काँग्रेसच्या काही तरुण नेत्यांना वाटू लागली. या विचारातून ना.सु. हर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली १९२३ साली ‘हिंदुस्थानी सेवा दला’ची स्थापना झाली. मासिक झेंडावंदन शिस्तबद्ध रीतीने आयोजित करण्याचे काम हे सेवा दल करू लागले.

१९३२ च्या सत्याग्रहाच्या कालखंडात ब्रिटिश सरकारने हे सेवा दल बेकायदा ठरवले. दुसरे जागतिक महायुद्ध सुरू झाल्यानंतर स्वातंत्र्याच्या चळवळीस जोर चढला; तथापि काही सांप्रदायिक विचारांच्या संघटनाही जोर करू लागल्या होत्या. त्यांचा मुकाबला करण्यासाठी वि. म. हर्डीकर, शिरूभाऊ लिमये, ना.ग. गोरे आदींनी पुढाकार घेऊन ४ जून १९४१ रोजी पुणे येथे तरुणांचे एक शिबिर घेऊन जातिधर्मातीत राष्ट्रवाद जोपासण्यासाठी राष्ट्र सेवा दलाची पुनर्घटना केली.

एस.एम. जोशी यांना दलप्रमुख नेमण्यात आले. संध्याकाळी मैदानावर मुलामुलींनी एकत्र जमायचे, चरखा चिन्ह मध्यभागी असलेल्या तिरंगी राष्ट्रीय झेंड्याला प्रणाम करायचा, कवायत, लेझीम, लाठी, सामुदायिक गाणी, मैदानी खेळ, अभ्यासवर्ग वगैरे कार्यक्रम घ्यायचे. वंदे मातरम् हे राष्ट्रगीत झाल्यावर शाखा विसर्जन होई. अशा शाखा पश्चिम महाराष्ट्रात गावोगाव सुरू झाल्या. पुढे छोडो भारत आंदोलनाला ९ ऑगस्ट १९४२ रोजी प्रारंभ झाला. सेवा दलाचे अनेक कार्यकर्ते भूमिगत चळवळीत उतरले. त्यामुळे सरकारने सेवा दलावर करडी नजर ठेवली. सेवा दलाच्या अनेक कार्यकर्त्यांचा छळ झाला.

भूमिगत चळवळीत खेडोपाडी सेवा दलाच्या कार्यकर्त्यांचा संपर्क वाढल्याने राष्ट्र सेवा दलाचे काम महाराष्ट्रात फार मोठ्या भागात पसरले. पुढे सातारा येथे सेवा दल सैनिकांचा भव्य मेळावा झाला (१९४७). आझाद हिंद सेनेचे एक प्रमुख सेनानी कॅ. शाहनवाजखान हे त्या मेळाव्याचे प्रमुख पाहुणे होते. बारा हजार युवक-युवती त्यात सहभागी झाल्या होत्या.

सेवा दलाच्या शक्तीचे हे प्रदर्शन पाहून काँग्रेसच्या काही नेत्यांना वाटले की तिचे नियंत्रण पूर्णतया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या हातात असले पाहिजे. सेवा दलाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना वाटत होते, की काँग्रेसचे ध्येयधोरण आपल्याला मान्य असले, तरी संघटनेचे कार्य स्वायत्तपणाने चालले पाहिजे. सेवा दल कार्यकर्त्यांच्या १९४८ च्या बैठकीत चर्चा होऊन असा निर्णय घेण्यात आला की राष्ट्र सेवा दलाचे काँग्रेसशी संघटनात्मक संबंध असणार नाहीत. समाजवादी शीलाचे नागरिक तयार करणे आणि विधायक कार्यासाठी निष्ठावान, कार्यक्षम व समर्पणवृत्तीचे कार्यकर्ते उपलब्ध करून देणे, ही ध्येये सेवा दलाने स्वीकारली. ही स्वायत्तता सेवा दलाने पुढेही अबाधित ठेवली.

स्वातंत्र्योतर

संपादन

[]१९६२मध्ये सेवा दलाने घटना दुरुस्ती करून सभासदनोंदणी व अंतर्गत निवडणूक यांचा अंगिकार केला. सेवा दलाचे कार्य १९६७पासून उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, मणिपूर, जम्मू-काश्मीर इ. राज्यांतही सुरू झाले. राष्ट्र सेवा दलात स्त्री-पुरुषांच्या सहकार्यावर प्रथमपासून भर दिल्याने अनेक स्त्री कार्यकर्त्यांनी सेवा दल बांधणीत मोलाची कामगिरी बजावली. तसेच कलापथकांतही मुलींनी काम करण्याला सुरुवात झाली.

सेवा दलातर्फे अधूनमधून शिबिरे, मेळावे अशा प्रकारचे कार्यक्रम होत राहिले. १९७३पासून समता मोर्चे, हुंडाबळी मोर्चे आदी कार्यक्रम हाती घेण्यात आले. अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करण्यासाठी १९८०मध्ये सेवा दलाने विज्ञानपथक सुरू केले. यापूर्वी लीलाधर हेगडे, वसंत बापट, यदुनाथ थत्ते, सुधा वर्दे, बापू काळदाते हे वेळोवेळी सेवा दलाचे अध्यक्ष होते.

संदर्भ

संपादन
  1. ^ a b थत्ते, यदुनाथ. राष्ट्र सेवा दल : २५ वर्षांची वाटचाल.