रावजी रामचंद्र काळे
रावबहादुर रावजी रामचंद्र काळे, बी.ए. एलएल. बी. ( विटे(सातारा), ८ ऑगस्ट १८६८; - पुणे, १७ जानेवारी १९३६) हे मुंबई उच्च न्यायालयात ‘ओरिजिनल साइड’चे ॲडव्होकेट होते. ते तत्कालीन मुंबई लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे सभासद व सातारा नगरपालिकेचे अध्यक्ष होते. बॅरिस्टर धनंजयराव गाडगीळ हे त्यांचे जावई होते.
शिक्षण
संपादनरावबहादुर काळे यांचे शिक्षण सुरुवातीला सातारा हायस्कूल, पूना हायस्कूल, पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये, आणि नंतर मुंबईतील एलफिन्स्टन कॉलेजात झाले होते. त्यांचे खास विषय इंग्रजी व संस्कृत असे होते. ते संस्कृतमधले पारितोषिकप्राप्त असे विद्वान होते. त्यांना दक्षिणा प्राइझ कमिटीची फेलोशिपही होती. रावबहादुर काळे १८९२ मध्ये वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झाले.
कारकीर्द
संपादन१८९२पासून रावबहादुर काळे यांनी साताऱ्यात वकिली सुरू केली. ते३ साताऱ्यात भवानी पेठेत राजपथालगत स्वतःच्या वाड्श्यात रहात. सातारा नगरपालिकेत ते १९००साली, आणि जिल्हा परिषदेत १९०२साली प्रविष्ट झाले. १९०२त १९२० या काळात ते सरकारी वकील आणि पब्लिक प्रॉसिक्य़ूटर होते. पुढे अनेक वर्षे ते साताऱ्याचे नगराध्यक्ष आणि सातारा जिल्हा परिषदेचे चेरमन होते. १९२८साली, रावबहादुर काळे यांना मुंबई उच्च न्यायालयात ‘ओरिजिनल साइड’चे ॲडव्होकेट म्हणून काम करायची सनद मिळाली. १९२९सालापासून ते मुंबई बार काउन्सिलचे सदस्य झाले.
१९२१मध्ये त्या वेळच्या सातारा जिल्ह्यातून मुंबई प्रांताच्या प्रांतिक कायदे मंडळात प्रागतिक पक्षातर्फे निवडून गेले. १२ वर्षे त्यांनी कायदे मंडळाचे सदस्य म्हणून काम केले.
समाजकार्य
संपादनरावबहादुर काळे यांनी १९२०साली डिस्ट्रिक्ट नॅशनल लिबरल लीगची स्थापना केला; ते या पक्षाचे अध्यक्ष होते. ते किर्लोस्करांच्या लोखंडी नांगर उत्पादन करणाऱ्या कारखान्याचे आणि साताऱ्यातील वेस्टर्न इंडिया लाइफ इन्शुअरन्स कंपनीचे निदेशक होते. ते १९२१, १९२७ आणि १९३०साली असे तीन वेळा ‘रिफॉर्म्ड बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल’वर निवडून गेलेले ते सभासद होते. राब. काळे सांगली विधानसभेचे सदस्य आणि औंध संस्थानच्या विधानसभेचे अध्यक्ष होते. ते मुंबई विद्यापीठ आणि इंडियन वूमेन्स विद्यापीठ या दोघांच्या सिनेटांचे सदस्य होते. शिवाय, सातारा ऐतिहासिक म्युझियमचे ते विश्वस्त होते. त्याव्यतिरिक्त काळे हे पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिक्स या संस्थेचे एक संस्थापक होते.
दानशूरता
संपादनसर्व्हन्ट्स ऑफ इंडिया या संस्थेला रावबहादुर काळे यांनी १९३०साली सवा लाख रुपयांची देणगी दिली होती. त्यांनी साताऱ्यातील अनेक सामाजिक संस्थांना देणग्या दिल्या आणि त्यांतील काही संस्थांचे अध्यक्षपदही भोगले.
साताऱ्याची कन्याशाळा, आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल, शाहू बोर्डिंग, कऱ्हाडचे टिळक हायस्कूल आदी संस्थांना राब. रावजी रामचंद्र काळे यांनी आर्थिक हातभार लावला.
डिसेंबर १८९९मध्ये साताऱ्यात न्यू इंग्लिश स्कूलच्या कामास सुरुवात झाली. शाळेच्या पहिल्या सल्लागार मंडळाचे राब.काळे सदस्य होते. त्यांनी केवळ चार रुपये व्याजाने ३४ हजार रुपये शाळा बांधकामासाठी दिले, राजपथावरील आपला मोठा वाडा अनाथ बालिकाश्रम मंडळास बक्षीस दिला. ’साताऱ्यात ही संस्था जोपर्यंत कोणतेही स्त्री शिक्षणोपयोगी कार्य करील, तोपर्यंत हा वाडा संस्थेकडेच राहील' अशी अटही काळे यांनी घातली होती. आजही (इ.स.२०१२) या वाड्यात, म्हणजे सध्याच्या कन्या शाळेच्या जागेत स्त्रियांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी शिलाई वर्ग चालविला जातो. कन्या शाळा, आयुर्वेद प्रसारक मंडळ या संस्थांबरोबरच लोक शिक्षण व ग्रामीण विकास संशोधनाचे कार्य, शाळा व महाविद्यालयीन शिक्षण घेणारे विद्यार्थी अशांना या वर्षी रा. ब. रा. रा. काळे ट्रस्टतर्फे इ.स.२०११ या वर्षात सुमारे ९७ हजार रुपयांची मदत देण्यात आली.
रयत शिक्षण संस्थेच्या वतीने साताऱ्यातील धनणीच्या बागेत रा. ब. काळे प्राथमिक शाळा चालवली जाते. रावबहादुर यांच्या ७५व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने संस्थेने दहा लाख रुपये खर्चून शाळा इमारतीचे नूतनीकरण केले. खेळासाठी पाच लाख रुपये उपलब्ध केले आहेत. पाच मोफत संगणक, एलसीडी प्रोजेक्टर दिला आहे. शाळेच्या लायब्ररी व लॅबोरेटरीसाठी दर वर्षी एक लाख रुपयांची मदत सुरू केली आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या अडचणीच्या काळात रा. ब. काळे कर्मवीर अण्णांच्या मदतीला धावले. दहा हजार रुपयांच्या ठेवीतून संस्थेस मदत सुरू केली. त्या काळात संस्थेस मिळालेली ही सर्वांत मोठी आर्थिक मदत होती. सातारा पालिकेचे अध्यक्ष असताना श्री. काळे शहरात जो मातब्बर पाहुणा येईल, त्याला अण्णांचे कार्य हटकून दाखवत. रयत शिक्षण संस्थेच्या नोंदणीनंतर संस्थेचे दुसरे अध्यक्ष म्हणून त्यांनी या पदाची धुरा समर्थपणे वाहिली.
पत्रकारिता
संपादनरावबहादुर काळे हे साताऱ्यतून 'ऐक्य' नावाचे साप्ताहिक चालवीत. सन १९३५पासून चं.ह. पळणिटकर त्याचे संपादक होते. पुढे खर्च भागेनासा झाला म्हणून मालकांनी ’ऐक्य’ बंद करायचे ठरवले, तेव्हा ’ऐक्य’चा छापखाना जोशी यांनी, आणि साप्ताहिक पळणिटकरांनी विकत घेतले. पळणिटकरांनी बराचसा नोकरवर्ग काढून टाकला आणि १९२४मध्ये स्थापन झालेले ते ’ऐक्य’ चालू ठेवले.
सचोटी
संपादनमुंबई कायदे मंडळाच्या एका निवडणुकीत एका गृहस्थाच्या पाटिलकीचा निकाल वशिल्याने त्याच्यासारखा करून दिल्यास गावची मते काळे यांना मिळतील, असा प्रस्ताव एकाने त्यांच्यापुढे ठेवला. त्यावर रावबहादुर यांनी दिलेले उत्तर आजच्या काळात राजकीय व्यक्तींच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे. ते म्हणाले, ""वशिला लावण्याचे दुष्कृत्य कदापि करणार नाही. मतदारांनी मिळालेल्या मताधिकाराचा उपयोग का व कसा करावयाचा यासंबंधात योग्य दिशा दाखविण्याचे कार्य माझ्या उमेदवारीने थोडे जरी साधले तरी त्याचे महत्त्व मला निवडणुकीतील यशापेक्षा अधिक वाटते.
पुस्तके
संपादनरावबहादुर रावजी रामचंद्र काळे यांनी ‘राष्ट्रीय शिक्षण’, ‘बॉम्बे लॅन्ड रेव्हेन्यू पॉलिसी’, ‘हिंदू धर्म आणि तत्त्वज्ञान’ यांसारख्या विषयांवर काही छोटी पुस्तके लिहून प्रसिद्ध केली आहेत. रावबहादुर काळे यांचे ‘पुरुषोत्तम’ नावाचे चरित्र ऐक्यकार चं.ह. पळणिटकर यांनी लिहिले आहे.
रावजी रामचंद्र काळे यांना १९१३साली रावसाहेब या उपाधीने, आणि १९२०साली रावबहादुर या उपाधीने सन्मानित केले गेले.