राम जाधव (जन्म : इ.स. १९३४; मृत्यू : दिल्ली, ३० नोव्हेंबर २०२०) ऊर्फ मामा हे २०११ साली रत्‍नागिरी येथे झालेल्या ९१व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांना हौशी रंगभूमीचे 'भीष्माचार्य' म्हणत. मामांचे हौशी रंगभूमीसाठी मोठे योगदान आहे. मामांनी अकोल्यात १९६० साली स्थापन केलेल्या 'रसिकाश्रय' संस्थेच्या माध्यमातून अनेक कलावत आणि नाटके रंगभूमीला दिली.. 'रसिकाश्रय' ही महाराष्ट्रातील सर्वात जुन्या नाट्य संस्थांपैकी एक आहे.

मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील जाधव हे खामगावला शारीरिक शिक्षणाचे शिक्षक होते. अगदी लहानपणापासूनच राम जाधव यांनी रंगभूमीवर प्रवेश केला. लहान-मोठ्या भूमिका साकारत त्यांनी आपली चुणूक दाखविली. पुढे महाविद्यालयीन जीवनातदेखील त्यांनी अनेक भूमिका साकारल्या. नंतरच्या काळात त्यांनी आपले संपूर्ण आयुष्यच रंगभूमीच्या चरणी बहाल केले. पुढे त्यांनी रेल्वेत नोकरी केली. आव्हानांना भिडणे हा जाधव यांचा मूळ स्वभाव होता. पन्नास वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाह करून पत्नीला घेऊन जाधव अकोल्याला गेले असता उसळलेल्या जनक्षोभाचा त्यांनी सामना केला. त्यानंतर समवयस्क मित्रांबरोबर त्यांनी ‘रसिकाश्रय’ या संस्थेची स्थापना केली. त्यांनी बसवलेल्या अनेक नाटकांनी मुंबई, पुणे येथे धडक द्यायला सुरुवात केली आणि राज्यभरातील नाट्यरसिकांचे लक्ष वेधून घेतले. विदर्भामध्ये हौशी रंगभूमीसाठी त्यांनी झोकून दिले. दरवर्षीच्या राज्य नाट्यस्पर्धेत त्यांच्या नाटकाला कोणतेना कोणते बक्षीस मिळत गेले. त्यांना व्यावसायिक रंगभूमीसाठीही विचारणा झाली होती. पण हौशी रंगभूमीवर प्रेम असल्याने त्यांनी तेथेच मुख्यत्वे योगदान दिले.

रेल्वेमध्ये तिकीट कलेक्टरची नोकरी करीत असताना दुसरीकडे रंगभूमीवर मामांच्या विविध भूमिका वठविणे सुरूच होते. राम जाधव म्हणजे मराठी नाट्यक्षेत्रातील हौशी रंगभूमीवरचे एक भारदस्त नाव होते. तब्बल ५० वर्षे हे नाव राज्य नाट्यस्पर्धांमध्ये सातत्याने गाजत राहिले. त्यातूनच रंगभूमीवर अकोल्याचा झेंडा डौलाने फडकत गेला. नाट्यस्पर्धेत मुंबई , पुणे व नागपूर सारख्या सर्वार्थाने पोषक वातावरण असलेल्या शहरांतील रंगकर्मीशी त्यांनी मोठा संघर्ष केला, आणि अकोल्यासह विदर्भातील कलावंतांना मोठे व्यासपीठ मिळवून दिले. प्रतिकूल परिस्थितीत आणि तुटपुंज्या साधन-सामुग्रीच्या बळावर एकनिष्ठ आणि ध्येयनिष्ठ साथीदारांच्या सहकार्याने मात्तब्बर नाट्य संस्थाना जेरीस आणणारा लढवय्या म्हणजे 'मामा' जाधव. मुंबई-पुण्याकडे होणारी वेगळी, प्रायोगिक नाटके हेरून आणि जागतिक रंगभूमीवरची नावाजलेली नाटके अनुवादित करून त्यांनी आपल्या संस्थेतर्फे त्यांचे प्रयोग केले. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले.

राम जाधव म्हणजे नाट्यशास्त्राचे चालते बोलते विद्यापीठ होते. 'रसिकाश्रय' नाट्यसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी अकोल्यातील अनेक नाटके रंगभूमीवर अजरामर केली. मामांनी अभिनयासोबतच, दिग्दर्शन, निर्माता म्हणूनदेखील आपली छाप पाडली. मामांच्या कार्याची दखत घेत राज्यशासनासह विविध संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन गौरविले.

राम जाधव यांनी नाट्यनिर्माते झाल्यावर सातत्याने १५०हून अधिक नाटकांची निर्मिती केली.

राम 'मामा' जाधव यांच्या 'रसिकाश्रय' नाट्यसंस्थेच्या माध्यमातून अनेक नाटकांनी राज्य नाट्य स्पर्धेत आपली चमक दाखविली. मामांनी अभिनय केलेल्या 'संक्षिप्त नटसम्राट'ला रसिक-प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. 'रसिकाश्रय'च्या माध्यमातून अकोल्यातील नाट्यक्षेत्रात तीन पिढ्या घडल्या आहेत. मामांच्या करारी आणि कठोर शिस्तीखाली तयार झालेल्या अनेकांनी पुढे नाट्यक्षेत्र गाजवले.. रसिकाश्रयच्या माध्यमातून या क्षेत्रात पुढे आलेल्यांमध्ये अनेक गुणवान लेखक, दिग्दर्शक, कलावंत आणि तंत्रज्ञ मिळवून दिले. यात पुरुषोत्तम दारव्हेकर, मधुकर तोरडमल, शं. ना. नवरे, सुरेश खरे, सतीश दुभाषी, जब्बार पटेल, रोहिणी ओक (हट्टंगडी) यांच्यापासून ते प्र. ल. मयेकर, अरुण नलावडे, शुभांगी संगवई (गोखले), अतुल कुलकर्णी, दिलीप देशपांडे, मधु जाधव, रमेश थोरात, अरुण घाटोळ, गीताबाली उन्होणे, प्रशांत जामदार, नीलेश जळमकर, अमोल ताले, श्रद्धा वरणकार अशी अनेक नावे पुढे आली. या यादीत हजारो गुणी रंगकर्मींचा समावेश आहे. आपली गुणवत्ता सिद्ध करून ही मंडळी महाराष्ट्राच्या विविध प्रदेशांतून मुंबईतील व्यावसायिक वर्तुळात स्थिरावली. परंतु स्पर्धेत आपल्या गुणवत्तेने चमकून आणि पुरस्कार मिळवूनही मुंबईत न येता आपापल्या प्रदेशातच पाय रोवून उभी राहिलेली, तेथील नाट्यकला फुलावी हाच ध्यास घेतलेलीही अनेक मंडळी होती. त्यातले राम जाधव हे महत्त्वाचे नाव आहे. त्यांनी आयुष्यभर रेल्वेत टीसी म्हणून अकोल्यात नोकरी केली आणि आपल्या नाट्यकलेत बाधा येऊ नये म्हणून पदोन्नतीही घेतली नाही, ही एक गोष्टही त्यांचे नाटकावरील प्रेम सिद्ध करण्यास पुरेसे आहे.

राम जाधव यांचे चिरंजीव हरियाणात वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. तेथे असतानाच मामांचे वृद्धापकाळामुळे दिल्लीत निधन झाले.

राम जाधव यांनी निर्मिलेली काही नाटके

संपादन
  • कट्यार काळजात घुसली
  • दोन पिकली दोन हिरवी
  • संक्षिप्त नटसम्राट
  • नाटककाराच्या शोधात साहा पात्रे
  • बाकी इतिहास
  • बेगम बर्वे
  • शांतता कोर्ट चालू आहे.
  • संगेत सौभद्र

सन्मान

संपादन
  • २०११मध्ये रत्‍नागिरी येथे झालेल्या ९१व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद.
  • राम जाधव यांना त्यांच्या रंगभूमीवरील योगदानामुळे अनेक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला होता.
  • राज्य रंगभूमी परिनिरिक्षण मंडळाचे अनेक वर्ष सदस्यत्व.

वादंग

संपादन
  • करण जोहरचा वादात सापडलेला 'ए.आय.बी' या शोच्यावेळी नाट्य सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष असलेल्या वादावेळी राम जाधव यांची परखड भूमिका अतिशय चर्चेचा विषय ठरली होती.
  • राम जाधव नाट्य परिनिरीक्षण मंडळात असताना नाटक परिनिरीक्षण मंडळाने 'दाभोळकरचे भूत' या नावालाच आक्षेप घेत असंख्य कट सुचवून नाटकाला परवानगी नाकारण्यात आली होती. केवळ सहापैकी एका सदस्याच्या (राम जाधव यांच्या) आक्षेपावरून हे नाटक रोखून ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष राम जाधव यांनी २५ जुलै २०१४ रोजी पत्रकार परिषदेत सांगितला. या नाटकातून अंधश्रद्धा पसरण्याची शंका व्यक्त करणाऱ्या सेन्सॉर बोर्डातील एका सदस्याचा मान ठेवण्यासाठी आम्हाला पुन्हा एकदा नाटक विचारार्थ ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला, असेही ते म्हणाले.

‘या नाटकाच्या संदर्भातील निर्णय घेण्यासाठी सांस्कृतिक मंत्र्यांच्या आदेशावरून एक समिती नेमण्यात आली असून ही समिती पुन्हा एकदा विचार करून निष्कर्ष काढेल. त्यानंतर सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांच्यासोबतच्या बैठकीत चर्चा होईल आणि मग सचिवांच्या उपस्थितीत सेन्सॉर बोर्डाची बैठक घेण्यात येईल. ही संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतरच नाटकाला परवानगी देण्यात येईल,‘ असे राम जाधव यांनी स्पष्ट केले. समिती निर्णयासाठी किती कालावधी घेईल हे सांगता येणार नाही असेही ते म्हणाले दिग्दर्शकांची विनंती अव्हेरली

दरम्यान, दिग्दर्शक हरीष इथापे यांनी तीन महिन्यांच्या कालावधीत प्रयोग करू द्या, लोकांचे आक्षेप आले तर त्यानंतर नाटक कायमस्वरुपी बंद करून टाकू, अशी विनंती केली. समाजातील अंधश्रद्धा दूर करण्याचा संदेश देणारे हे नाटक अंधश्रद्धेलाच चालना कसे देणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या विनंतीला स्पष्टपणे नकार देण्यात आला.

रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राम जाधव यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले गिरीश गांधी यांनी ‘दाभोळकरचे भूत’ या नाटकाच्या मुद्यावरून सेन्सॉर बोर्डाला चांगलेच धारेवर घेतले आणि मुठभर लोकांमुळे अभिव्यक्तीवर घाला पडत असेल तर त्या सदस्यांना घरचा रस्ता दाखवा, या शब्दांत ठणकावले. इतके असूनही राम जाधव यांनी नाटकाला परवानगी देण्यास नकार दिला.

नव्या त्रि-सदस्य समितीने ‘दाभोळकरचे भूत’ नाटकाला हिरवा कंदील दाखवला, पण तरीही राम जाधव यांनी नाटकाला परवानगी नाकारली.

शेवटी वर्तमानपत्रांमधून खूप गाजावाजा झाल्यावर ’केवळ बहुमता’चा आदर ठेवण्यासाठी नाटकाला २९ जुलै २०१४ रोजी सेन्सॉर बोर्डाच्या जाधव यांनी प्रमाणपत्र देण्याची तयारी दाखवली. दोन्ही समित्यांचा अहवाल सांस्कृतिक मंत्र्यांना सादर केल्यानंतर नाटकावर निर्णय घेण्यात येईल, असे म्हणणाऱ्या राम जाधवांना आता तशी गरज वाटली नाही.