रामोशी

निषाद घराण्याची पोटजाती

रामोशी महाराष्ट्रातील मागासलेली एक विमुक्त जमात. त्यांची वस्ती मुख्यतः पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर आणि औरंगाबाद या जिल्ह्यांत आढळते. कर्नाटक राज्यातही त्यांची तुरळक वस्ती आहे. तेथे त्यांना ‘बेडर’ या नावाने ओळखतात. महाराष्ट्र शासनाच्या विमुक्त जाती/भटक्या जमाती (DT-A)या विभागात 'बेरड' १ नंबरला व 'रामोशी' १४ नंबरला दाखविलेला आहे.ब्रिटिश राजवटीत ही जमात गुन्हेगार जमात म्हणून ओळखली जात असे. पुढे स्वातंत्र्योत्तर काळात ती मागासवर्गीय विमुक्त जमात म्हणून मान्यता पावली. या समाजाची महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्या २,०९,८७५ (१९८१) होती. रामोशी स्वतःला रामवंशी म्हणवितात. रानावनात भटकंती असल्याने 'रानवाशी' या शब्दाचा मूळ नावाचा अपभ्रंश होऊन रामोशी हे ज्ञातिमान बनले असावे. त्याविषयीच्या काही दंतकथा प्रचलित आहेत.

मराठा अंमलात गावगाड्याच्या ग्रामव्यवस्थेत त्यांना बलुतेदार म्हणून मान्यता दिलेली होती. बारा बलुतेदारांप्रमाणे त्यांना पारंपरिक खास व्यवसाय नसला, तरी त्या काळी गावच्या रक्षणाची जबाबदारी रामोशांवर असे, हाच पुढे त्यांचा व्यवसाय मानला गेला. त्याचा मोबदला गावचे शेतकरी, पाटील व ग्रामस्थ त्यांना देत असत. त्याला बलुते असे म्हटले जाई. काही गावांमध्ये त्यांना इनाम म्हणूनही जमिनी दिल्या गेल्या.

रामोशी हिंदू असून मराठी भाषिक आहेत. त्यांच्या बोलीभाषेत काही तेलुगू व कन्नड शब्द आढळतात. त्यांची एक सांकेतिक भाषा आहे. रामोशी पुरुष धोतर, सदरा, डोईला पागोटे असा पेहराव करतो. गळ्यात काळ्या दोऱ्यात ओवलेले ताईत, मनगटावर काळा दोरा, कानात सोन्याच्या बाळ्या व एका हातात चांदीचे कडे यांमुळे पाहताक्षणी रामोशी ओळखता येतो. स्त्रिया नऊवारी काठपदरी इरखलवजा हातमागाचे लुगडे आणि चोळी घालतात.या समाजात मलमे,बुधावले,आडके,जाधव,नाईक,मंडले,शिरतोडे,मदने,चव्हाण,गुडगुडे,यलमार,घळगे,शितोळे,गुजले,भंडलकर,खोमणे अशी आडनावे आढळतात. गोमांस सोडून इतर सर्व प्रकारचे मांस ते खातात.

यांच्यात आते व मामे बहिणीशी लग्न-संबंध होतो. एकाच आडनावाच्या कुळात व समान कुलदैवते असणाऱ्या कुटुंबात विवाह होत नाही. रामोशी-बेरड पूर्वी विवाह होत नव्हते, आता मात्र कालौघात दोन्ही उपजातीत रोटी-बेटी व्यवहार होऊ लागलेत. या समाजात जातिवंत रामोशी आणि 'कडू'असे दोन प्रकार आजही प्रचलित आहेत. ज्याने समाज सोडून इतर समाजात रोटी बेटी व्यवहार केलेला नाही त्यांना 'जातिवंत'म्हणतात व ज्यांचे इतर समाजाशी रोटी-बेटी व्यवहार झालेत त्यांना 'कडू' समजतात. जातिवंत समाज बांधव कडूशी रोटी बेटी व्यवहार करीत नाहीत. "कडव्याची पोरगी आम्ही करत पण नाही आणि त्यांच्यात देत पण नाही"अशी जातिवंत लोकांची धारणा असते. कालौघात कडू जातिवंत प्रकार कमी होताना दिसतो, पण काही लोक अद्याप जातिवंत म्हणून टिकवून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसतात. खायाला अन्न नसूदे पण जात आणि खानदान सोडायचं नाही. हा विचार कृतीतून जपताना ते दिसतात. जंगम अथवा ब्राह्मण लग्न लावतो. विधवा-विवाह आणि घटस्फोटास मान्यता आहे.

खंडोबा हे रामोश्यांचे कुलदैवत आहे. याशिवाय राम, कृष्ण, शंकर, वेताळ, बहिरोबा, म्हसोबा, जनाई, तुकाई, काळोबाई या देवदेवतांना ते भजतात. शुभकार्याला ‘जयमल्हार’ या उद्घोषाने प्रारंभ करतात. खंडोबाच्या जत्रेत देवाची पालखी उचलण्याचा पहिला मान रामोश्यांना दिला जातो.

खंडोबाला मुले-मुली सोडण्याची किंवा खंडोबाशी मुलींची लग्न लावण्याची प्रथा या समाजात आहे. देवाला सोडलेल्या मुलीस ‘मुरळी’ व मुलास ‘वाघ्या’ म्हणतात. वाघ्यांचे घर वाघ्या आणि संन्यासी वाघ्या हे दोन प्रकार आहेत. प्रपंच करून खंडोबाची सेवा करणारा घर वाघ्या आणि अविवाहित राहून सेवा करणारा संन्यासी वाघ्या होय. वाघे-मुरुळी एकत्र येऊन नाचगाण्याचे कार्यक्रम करतात, त्याला जाग्रण-गोंधळ असे म्हणतात. जाग्रण-गोंधळ ही पारंपरिक लोककला मानली जाते.

या समाजात काही लोक मृताला पुरतात इतर काही मृताला जाळतात. पितृपक्षात ते श्राद्ध घालतात. १९१५ साली श्रीमती सावित्रीबाई तात्याबा रोडे यांनी क्षत्रिय रामोशी संघ पुणे येथे स्थापून ही जात सुधारण्याचा प्रयत्न केला. याशिवाय नरवीर उमाजी नाईक समाज सुधार मंडळ, पुणे व जयमल्हार रामोशी समाज उन्नती मंडळ, मुंबई या संघटना समाज सुधारण्याचा प्रयत्न करीत आहेत. उमाजी नाईक हे या समाजातील क्रांतिवीर समजले जातात. त्यांना समाजाचे दैवत मानतात. दरवर्षी त्यांची जयंती व पुण्यतिथी रामोशी समाजात उत्साहाने साजरी केली जाते