रामायण महाभारताची जैन संस्करणे

व्यासांचे महाभारत, वाल्मिकी रामायण आणि तुलसी रामायण यांच्याखेरीज रामायण-महाभारताची अनेक संस्करणे आहेत. त्यांमधील कथाही थोड्याफार फरकाने वेगळ्या आहेत. जैनांची रामायण-महाभारते ही अशीच वेगळी आहेत.

चित्र:Ganesh writing Mahabharata.jpg

जैन रामायणे संपादन

काही जैन रामायणांत रामाला पद्म म्हटले आहे. ६३ महापुरुषांपैकी तो एक मानव होता.

या जैन रामायणांतही इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात लिहिलेले विमलासुरीचे माहाराष्ट्री या प्राकृत भाषेत लिहिलेले रामायण, आठव्या शतकात लिहिलेले पौमाचरिया रामायण, ११व्या शतकामध्ये संस्कृतमध्ये लिहिलेली रविसेनकृत पद्मपुराण, व अपभ्रंश भाषेत लिहिलेले स्वयंभूदेवलिखित पौमचरियु ही प्रमुख संस्करणे आहेत.

ह्या संस्करणांमधील काही पात्रे जैन मुनींना प्रत्यक्ष भेटली आहेत. मुनींनी त्यांना जैन जीवन-पद्धतीचे ज्ञान दिले, काही पात्रांना त्यांच्या पूर्वजन्मांच्या हकीकती सांगितल्या. उदाहरणार्थ, जटायूचा पूर्वजन्म. स्वयंभूदेवाच्या मते, जेव्हा जटायू जैन मुनींना भेटला तेव्हा त्यांनी तो आपल्या पूर्व जन्मीच्या आठवणीने बेशुद्ध पडला. पूर्वजन्मी तो दंडक नावाचा राजा होता. एकदा त्याने आपल्या शाही बगिचामधून एका जैन मुनीला अंगावर मेलेला साप फेकून हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. पण तरीही जैन मुनीचे ध्यान भंग पावले नाही. दंडक राजाने मुनीचे शिष्यत्व पत्करण्याचे ठरवले, पण त्याच्या कुटुंबीयांना हे मान्य नव्हते. त्यांनी दंडकाला जैन मुनींविरुद्ध भडकावले. त्या परिणाम म्हणून दंडकाला पुढील जन्मी जटायू नावाचे गिधाड बनण्याचा शाप मिळाला. जैन मुनींनी जटायूला जैन जीवन-पद्धतीचे ज्ञान दिले आणि मुक्ती मिळवून दिली.

जैन रामायणाप्रमाणे दशरथ आणि भरत ह्या दोघांनाही जैन मुनी व्हावे असे वाटत होते. राम वनवासात गेल्यावर भरत गृहस्थाश्रमी जीवन जगू लागला, पण शेवटी तो जैन मुनी झाला. इतकेच नाही तर रावणाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा जैन मुनी झाला. सीतेच्या लव-कुश ही दोन्ही मुलांना आणि हनुमान, बिभी़षण यांना जैन मुनी होण्याचे भाग्य लाभले. सीतेचे हरण झाल्यावर दुःखी झालेला राम जैन मुनींची प्रवचने ऐकत असे. मुनींनी रामाला जीवनाची नश्वरता समजावून सांगितली आणि संसाराचा मोह कसा व्यर्थ आहे हे पटवून दिले. अखेरीस रामाने स्वर्गात जाण्यापूर्वी कैवल्य नावाचे उच्च कोटीचे ज्ञान प्राप्त केले.

जैन रामायणात, रावणाला जैनांचे २०वे तीर्थंकर मुनिसुव्रताचे भक्त म्हटले आहे. मुनींचे म्हणणे ऐकून रावणाने सीतेला तिच्या इच्छेविरुद्ध स्पर्श न करण्याचे ठरवले. आपली पत्नी मंदोदरी आणि हनुमान यांच्याकडून जैन प्रवचने ऐकल्यावर रावणाने मनोमन निश्चय केला की, रामाला युद्धात पराजित केल्यावर सीतेला त्याच्या स्वाधीन करायचे. एका जैन रामायणात असेही म्हटले आहे की राम युद्धात रामाकडून नाही तर लक्ष्मणाकडून मारला गेला, कारण राम हा अहिंसाव्रताचे पालन करीत होता.

जैन महाभारते संपादन

पुन्नाटसंघीय दिगंबर संप्रदायाचे आचार्य जिनसेन यांनी लिहिलेल्या 'हरिवंशपुराणात वर्णन केलेल्या कृष्ण आणि जरासंध यांच्या लढाईचेच विस्तृत वर्णन जैन महाभारतात आहे.

कृष्णाचे वडील वसुदेव अतिशय देखणे होते. त्यांच्या पत्नी-देवकीने आठ मुलांना जन्म दिला; पहिल्या सहा मुलांच्या जागी एका व्यापाऱ्याच्या पत्नीने सहा मृत मुले ठेवली. सातव्या आणि आठव्या मुलांना गुराख्यांनी नेले आणि गुराखी म्हणूनच वाढवले. वसुदेव शेवटी जैन मुनी बनले. कृष्णाच्या चुलत भावाला त्यांच्या लग्नाच्या जेवणासाठी मारल्या गेलेल्या पशूंच्या किंकाळ्या सहन झाल्या नाहीत, म्हणून तेही जैन मुनी झाले, व पुढे २२वे तीर्थंकर म्हणून ओळखले जाऊ लागले.

महाभारताच्या जैन संस्करणानुसार शंभर कौरवांनी पाच पांडवांविरुद्ध युद्ध घोषित केले. या युद्धासाठी पांडवांनी कृष्णाची मदत मागितली. पांडवांनी जरासंधाशी लढण्यासाठी कृष्णाला मदत करावी, या अटीवर कृष्णाने मदत करणे कबूल केले. कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये कृष्णाने जरासंधावर सुदर्शन चक्र फेकले. पण नेमिनाथ मध्येच उभे असल्याने चक्र जरासंधाच्या आणि नेमिनाथांच्या आजूबाजूला फिरून परत कृष्णाच्या बोटावर येऊन बसले. कृष्णाने दुसऱ्यांदा जरासंधावर सुदर्शन चक्र फेकून त्याचा वध केला. शेवटी कृष्णाने पांडवांना मदत करून कृष्णाने कौरवांचा पराभव केला.

यावरून दिसते की रामायण-महाभारताची जैन संस्करणे वाल्मिकी-व्यासरचित रामायण-महाभारतांपेक्षा वेगळी आहेत. सगळा भर पात्रांच्या जैन मुनी बनण्यावर आणि अहिंसेच्या पालनावर आहे.