रामदास भटकळ
रामदास गणेश भटकळ (जन्म - ५ जानेवारी १९३५) हे पॉप्युलर प्रकाशन या पुस्तक प्रकाशन संस्थेचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. इ.स. १९५२मध्ये, वयाच्या १७व्या वर्षी, त्यांनी इंग्रजी आणि मराठी पुस्तके प्रसिद्ध करण्यासाठी पॉप्युलर प्रकाशन नावाची एक खासगी प्रकाशन संस्था काढली. ही संस्था साठाहून अधिक वर्षे पुस्तके छापून प्रकाशित करत आली आहे.
रामदास भटकळ | |
---|---|
जन्म नाव | रामदास गणेश भटकळ |
जन्म | ५ जानेवारी १९३५ |
शिक्षण |
एम.ए. राज्यशास्त्र एल्एल.बी |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य |
भाषा | मराठी |
प्रसिद्ध साहित्यकृती | मोहनमाया |
पुरस्कार | तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार[१] |
शिक्षण
संपादनरामदास भटकळ यांचे शालेय शिक्षण मुंबईतील रॉबर्ट मनी हायस्कूलमधून, कॉलेजचे एलफिन्स्टन कॉलेजमधून व गव्हर्नमेन्ट लॉ कॉलेजधून झाले. ते मुंबई विद्यापीठाचे एम.ए. (राज्यशास्त्र), एल्एल.बी. आहेत.
इ.स.१९६१ मध्ये प्रकाशन व्यवसायासंबंधी प्रशिक्षणासाठी लंडन येथील इंग्लिश युनिव्हर्सिटीज प्रेसमध्ये त्यांनी तीन महिन्यासाठी नोकरी केली. त्यानंतर त्यांंनी इंग्लंडमधील ग्रंथव्यवहाराचा अभ्यास आरंभला.
प्रकाशन संस्था
संपादनभटकळांनी इ.स. १९५२ मध्ये पॉप्युलर बुक डेपोमार्फत मराठी पुस्तकांच्या प्रकाशनाचे व इ.स. १९५८ पासून इंग्रजी पुस्तकांच्या प्रकाशनाचे काम सुरू केले. त्यांची ही संस्था इंग्रजीत सामाजिक आणि शैक्षणिक विषयांवरची फक्त उच्च दर्जाची विचारप्रवर्तक पुस्तके छापते. तर मराठीत या संस्थेतर्फे इतिहास, संगीत, समाजशास्त्र या विषयांची पुस्तके आणि ललित वाङ्मय प्रकाशित होते.
द्वैमासिक
संपादन- १९७५ च्या सालात रामदास भटकळ यांनी रायटर्स सेंटर मुंबई या संस्थेचे 'संदर्भ' हे वाङमयीन द्वैमासिक सुरू केले. त्याचे संपादन कवी ग्रेस करत असत.' संदर्भ'चे अवघे दहाबारा अंक निघाले. ग्रेस एखादा विषय प्रत्येक कला क्षेत्रातल्या दिग्गजांना देऊन त्यावर त्यांचे टिपण किंवा लेख मागवत असत.
परदेशगमन
संपादनभटकळ यांनी सरकारी निमंत्रणावरून अमेरिका आणि रशिया या देशांना अनुक्रमे इ.स.१९६५ आणि इ.स.१९६८ मध्ये भेट दिली आहे.
गायनाचे कार्यक्रम
संपादनरामदास भटकळ हे नाव प्रकाशक म्हणून येण्याआधी शे-दीडशे कार्यक्रमांमधून गायले होते. ऐन उमेदीच्या काळात त्यांनी रागदारी संगीताच्या मैफली गाजवल्या होत्या आणि बुवा, पंडित या उपाध्या मिरवल्या होत्या.
भटकळांनी पंडित एस.सी.आर. भट यांच्याकडे त्यांनी काही वर्षं शास्त्रीय संगीताची तालीम घेतली आणि मैफलीही केल्या. संगीतकार यशवंत देव यांच्याकडे ते भावगीतेही शिकले होते, पण पुढे प्रकाशन व्यवसायाचा व्याप वाढल्यामुळे रामदास भटकळांना गाण्याकडे फारसे लक्ष देता आले नाही.
इ.स. २०१३ साली झालेल्या एका कार्यक्रमात रामदास भटकळ यांनी बालकवींची 'आनंदी आनंद गडे ' ही कविता एखाद्या दिग्गज गायकाप्रमाणे रागदारीत गाऊन दाखविली..
रामदास भटकळ यांनी लिहिलेली पुस्तके
संपादन- जगदंबा (गांधी आणि कस्तुरबा यांच्या संबंधी)
- जिगसॉ (आयुष्यात भेटलेल्या अविस्मरणीय व्यक्तांबाबत)
- जिव्हाळा (प्रकाशन व्यवसायात संपर्कात आलेल्या लेखकांसंबंधी)
- पॉप्युलर रीतिपुस्तक (लेखक, संपादक, मुद्रक, मुद्रितशोधक, प्रकाशक यांच्यासाठी उपयुक्त माहितीचे पुस्तक)
- द पोलिटिकल आल्टर्नेटिव्ह्ज इन इंडिया (संपादन)
- मोहनमाया (मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनावरील पुस्तक)
- रिंगणाबाहेर (भटकळांच्या प्रकाशन व्यवसायाबाहेरच्या गायन, राजकारण आणि नाटक या क्षेत्रांसंबंधी)
सन्मान
संपादन- रामदास भटकळ यांनी फ्रॅंकफुर्ट येथे भरणाऱ्या आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनात पाच वेळा भाग घेतला आहे.
- बॉम्बे बुकसेलर्स अँड पब्लिशर्स असोशिएशनचे ते भूतपूर्व अध्यक्ष आहेत.
- कॅपेक्सिल या निर्यातदारांच्या संस्थेच्या बुक्स अँड पब्लिकेशन पॅनेलचेही ते अध्यक्ष होते.
- रामदास भटकळ हे १९८६ साली औरंगाबाद येथे झालेल्या दुसऱ्या प्रकाशक संमेलनाचे अध्यक्ष होते.
- पुस्तकांच्या एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलचे सरकारमान्य चेरमन म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
- महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट प्रकाशनाच्या पहिल्या पुरस्काराचे ते मानकरी होत.
जानेवारी २०१४ मध्ये रामदास भटकळ यांची ई-टीव्हीवरील ’संवाद’ कार्यक्रमात मुलाखत झाली होती. ती मुलाखत अनेक नामवंतांनी नावाजली.
विचारवंतांच्या हत्यांचा निषेध
संपादनभटकळ यांना महाराष्ट्र राज्य शासनाकडून ’जिगसॉ’ आणि ’मोहनमाया’ या पुस्तकांच्या उत्कृष्ट लेखनासाठीचे पारितोषिक म्हणून अनुक्रमे १९९९ आणि २००९ साली प्रत्येकी दहा हजार रुपये मिळाले होते. देशामध्ये विचारवंतांच्या होणाऱ्या हत्यांच्या निषेधार्थ, त्यांनी ही रक्कम शासनाला परत देण्याऐवजी सामाजिक कार्य करणाऱ्या युसुफ मेहेरअली सेंटरला दिली. याशिवाय अन्य पुरस्कारांतून मिळालेले सुमारे एक लाख रुपये महारोगी सेवा समिती आणि नर्मदा नवनिर्माण अभियान या दोन संस्थांना विभागून दिली. (ऑक्टोबर२०१५)
पॉप्युलरचा इतिहास
संपादनपॉप्युलर प्रकाशनाच्या जडणघडणीचा मागोवा घेणाऱ्या लेखांचे संकलन ‘पॉप्युलरचं अंतरंग’ या नावाने प्रकाशित झाले आहे. संकलनाचे काम किशोर आरस यांनी केले आहे.
पुस्तकाचे अंतरंग
संपादनया पुस्तकाची मांडणी तीन विभागांत करण्यात आली आहे. पहिल्या विभागात ‘पॉप्युलर’चे संस्थापक रामदास भटकळ यांनी ‘चिरंतनाच्या मागावर’ हा जवळजवळ शंभर पानांचा मजकूर लिहिला आहे.
दुसऱ्या विभागात व्यवस्थापक आणि नंतर संचालक म्हणून काम पाहिलेल्या रघुनाथ गोकर्ण आणि संपादक मृदुला जोशी, अंजली कीर्तने, शुभांगी पांगे आणि अस्मिता मोहिते यांची मनोगते आहेत.
तिसऱ्या ‘उत्तरपक्ष’ या विभागात भटकळ यांच्या सात मुलाखतींचा अंतर्भाव आहे. कादंबरीविषयी रंगनाथ पठारे, कथेसंबंधी अरुणा दुभाषी, कवितेबद्दल सुधा जोशी यांनी भटकळ यांना बोलते केले आहे. रत्नाकर मतकरी यांनी नाटकाविषयी, वसंत पाटणकर यांनी समीक्षेबद्दल, अरुण टिकेकर यांनी चरित्र, इतिहास आणि सामाजिक शास्त्रे यांविषयी आणि वसंत सरवटे यांनी चित्रे-सजावट आणि बालसाहित्य या विषयांवर भटकळ यांच्याशी संवाद साधला आहे.
संदर्भ
संपादन- ^ "जयंत नारळीकर, रामदास भटकळ यांना वाङ्मय पुरस्कार". 2019-02-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-01-25 रोजी पाहिले.