रामकृष्ण धोंडो बाक्रे (जन्म : १३ जुलै[१][२] १९१६ [३]; - २२ डिसेंबर १९९६ [४] पंढरपूर, सोलापूर) हे ज्येष्ठ संगीत समीक्षक आणि पत्रकार होते. ते साने गुरुजींचे अनुयायी होते. काही काळ राष्ट्र सेवा दल, मुंबई शाखेचे प्रमुख होते. ते भूमिगत स्वातंत्र्यसैनिक होते. संगीत समीक्षा लिहिणारे ते मराठीतील पहिले पत्रकार म्हणून ओळखले जातात.[१] ते 'तात्या' या नावाने परिचित होते. आजचे अनेक नामांकित पत्रकार बाक्रे यांचे विद्यार्थी आहेत.

जन्मकथा संपादन करा

रामकृष्ण बाक्रे यांचा जन्म पंढरपूर येथे झाला. तेथेच त्यांचे लहानपण गेले. त्यांचे वडील धोंडो बाक्रे हे कट्टर सनातनी आणि व्यवसायाने पुराणिक होते. रामकृष्ण बाक्रे यांच्या बालपणाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. 'मराठी वृत्तपत्रांचा इतिहास' या श्री. रा. के. लेले कृत ग्रंथातही त्यांचे दोन ओझरते उल्लेख वळगता सविस्तर माहिती उपलब्ध नाही.[५]

घरचे कर्मठ वातावरण पाहून "आपल्याला नवीन काही शिकावयास मिळणार नाही" हे लक्षात आल्यानंतर ते पुण्याला पळून गेले. तेथे त्यांनी माधुकरी मागून, वारावर राहून बी.ए.टी.डी. ही शिक्षणातील पदविका मिळविली. या काळात ते कोठे, कसे, कोणत्या हालात राहिले, त्याची माहिती त्यांनी पत्‍नी सुशीला यांनाही दिली नाही, असे रामकृष्ण बाक्रे यांचे पुतणे अ.वि. बाक्रे यांनी 'तपस्वी संगीत समीक्षक' या लेखात [६] नमूद केले आहे. बाक्रे यांचा जन्म पंढरपुरात झाला असला तरी त्यांचे कायमचे वास्तव्य ठाणे येथे होते. तेथे त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला.

कारकीर्द संपादन करा

रामकृष्ण बाक्रे हे आधी शिक्षक होते. नंतर त्यांचा संबंध साने गुरुजी यांच्याशी आला. ते राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते बनले. गुरुजींच्या 'कर्तव्य' या वृत्तपत्रातून त्यांनी पत्रकारितेस सुरुवात केली. नंतर 'लोकमान्य' या दैनिकात, 'साधना' या साप्ताहिकात आणि 'नवाकाळ' या दैनिकात काम केले. 'लोकमान्य' मधून त्यांनी संगीत विषयक लेखनास सुरुवात केली. आणि मराठीतील पहिले संगीत समीक्षक म्हणून नावारूपास आले.

कौटुंबिक माहिती संपादन करा

बाक्रे कुटुंबियांची परिस्थिती हलाखीची होती, त्यांची गुजराण केवळ पुराणिकपणावरच होत असे. 'मुलानेही पुराणिक व्हावे' अशी वडिलांची इच्छा होती, असेही या लेखात म्हंटले आहे. त्यांच्या वडिलांनी त्यांना तत्कालीन प्रसिद्ध गायक थिटेबुवा यांच्या शास्त्रीय संगीताच्या वर्गात घातले होते. पुढे नामवंत सिने-नाट्य अभिनेत्री झालेल्या शांता आपटे ह्या बाक्रे यांच्या सहाध्यायी होत्या, अशी माहिती या लेखात दिली आहे. रामकृष्ण बाक्रे यांचा सेवादल कार्यकर्त्या सुशीला जोशी यांच्याबरोबर विवाह झाला. हा प्रेमविवाह होता. त्यांना एक कन्या आहे. त्यांना एक लहान बंधू होते. अ.वि. बाक्रे हे या लहान बंधूंचे पुत्र आहेत. या लहान बंधूंचे निधन झाल्याने साऱ्या कुटुंबाची जबाबदारी बाक्रे यांनी घेतली. प्रसिद्ध संगीत समीक्षक 'घरंदाज गायकी' या पुस्तकाचे लेखक वामनराव देशपांडे हे रामकृष्ण बाक्रे यांचे पुतणे अ.वि. बाक्रे यांचे सासरे आहेत. त्या नात्याने या विवाह संबंधातून श्री. देशपांडे हे रामकृष्ण बाक्रे व्याही म्हणून जोडले गेले.[७]

सुशीला बाक्रे यांचे निधन २०१५ साली झाले. त्यावेळी त्यांचे वय ८७ वर्षे होते.[८][ दुजोरा हवा][ संदर्भ हवा ]

सेवादलातील सहभाग संपादन करा

राष्ट्र सेवादलातील त्यांचा सहभाग महाराष्ट्रातील मराठी पत्रकारितेत महत्त्वाचा मानला जातो. समाजवादी कार्यकर्त्यांमधील एस.एम. जोशी, ना.ग. गोरे, मधू दंडवते, मृणाल गोरे यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. एस.एम. जोशी यांचे मी एस.एम." हे आत्मवृत्त केवळ बाक्रे यांच्यामुळे लिहिले गेले. एसेम यांनी ते लिहावे यासाठी बाक्रे यांनी त्यांच्यामागे हट्ट धरला. त्यांनी सांगितलेल्या हकीकतीशी जुळणारी तत्कालीन जुनी वृत्तपत्रे काढून, त्यांतील संबंधित कात्रणे वेगळी करून बाक्रे यांनी मी एस.एम."चे शब्दांकन केले.

पत्रकारितेतील योगदान संपादन करा

रामकृष्ण बाक्रे हे साने गुरुजींच्या 'कर्तव्य' या दैनिकात नोकरीस होते. तसेच 'साधना' साप्ताहिकात ते स्तंभलेख आणि 'नवाकाळ' मध्ये अग्रलेख लिहीत असत. मुंबईतील दत्तोपंत सावरकर यांच्या 'लोकमान्य' या दैनिकातही त्यांनी काही काळ नोकरी केली. त्यावेळी प्रसिद्ध पत्रकार पां.वा. गाडगीळ हे नवाकाळचे संपादक होते. गाडगीळ हे नेहरूप्रेमी आणि काँग्रेसप्रेमी होते. तथापि त्यांनी वृत्तपत्र एकांगी होऊ नये, या हेतूने समाजवादी रामकृष्ण बाक्रे यांना दैनिकात सामावून घेतले. तेथे वि.स. बापट, शं.वि. सालये, र.ना. लाटे, द.पां. खांबेटे, चंद्रकांत ताह्माणे, अंबादास अग्निहोत्री, अ.ना. परांजपे, जयवंत दळवी हे बाक्रे यांचे सहकारी होते. 'लोकमान्य' मध्ये बाक्रे यांनी संगीत विषयक गंभीर लेखन करून संगीत समीक्षक अशी प्रसिद्धी मिळवली.[९]

मुंबईत एकदा वाहतूक बंद पडल्याने कार्यालयात जाण्यासाठी कोणतेही वाहन मिळत नसल्याने रामकृष्ण बाक्रे हे ठाणे (घर) ते ऑफिस (फोर्ट) चक्क चालत गेले. त्यांची पत्रकारितेवरील निष्ठा व प्रेम लक्षात घेऊन त्यांना 'आचार्य अत्रे' पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

मुंबईच्या एसएनडीटीमध्ये त्यांनी अंशकालीन पत्रकारिताविद्या हा अभ्यासक्रम सुरू केला. तेथे व्याख्याता व संयोजक म्हणून काम करीत. यातले अनेक विद्यार्थी आज पत्रकार म्हणून नावारूपाला आले आहेत.

संगीतविषयक ग्रंथलेखन संपादन करा

रामकृष्ण बाक्रे यांच्या संगीत विषयक लेखनातून आणि व्यासंगातून त्यांची कुमार गंधर्व, किशोरी आमोणकर, सुरेश हळदणकर, श्रुती सडोलीकर व त्यांचे वडील गायक वामनराव, देवकी पंडित, प्रभाकर कारेकर, पद्मा तळवलकर इत्यादी अनेक नामवंत शास्त्रीय गायकांशी घनिष्ठ मैत्री झाली. बाक्रे यांनी अनेक संगीतकार, गायक, गायिका यांची मराठीतून चरित्रे लिहिली. त्यांनी लिहिलेले "बुजुर्ग', "भिन्नषड्ज" "सुरीले" हे महत्त्वाचे ग्रंथ आहेत.

‘सुरीले’विषयी संपादन करा

‘सुरीले’ हे रामकृष्ण बाक्रे यांच्या वेगवेगळ्या वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेल्या, मात्र पुस्तकरूपाने न आलेल्या लेखांचे संकलित पुस्तक आहे. ते इंडस प्रकाशनाने मोठ्या आकर्षक रूपात २०१४ साली प्रकाशित केले आहे. त्याच संस्थेचे मुख्य संपादक मनोज आचार्य यांनी पुस्तकाला ‘सुरीले’ हे नाव सुचवले.रामकृष्ण बाक्रेंचा आणि त्यांचा खूप चांगला परिचय होता. ह्या पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणातल्या बाळकृष्ण बुवा इचलकंरजीकरांच्या लेखातले फोटो आणि गणपतीबुवा भिलवडीकर व पंडित मिराशी यांचे फोटो हे श्री. आचार्य यांच्या खासगी संग्रहातील आहेत.[१०]

या पुस्तकाची ओळख श्री. शांताराम कांबळे यांनी 'नवशक्ति' या दैनिकात करून दिली आहे.[११] त्या लेखात श्री. कांबळे म्हणतात, "या पुस्तकात रामकृष्ण बाक्रे यांनी आपल्या गायनकलेबद्दलच्या प्रेमामुळे आणि बुजुर्ग गायकांविषयी असलेल्या आदराने त्यांच्या अनेक महत्त्वाच्या नोंदी, आठवणी लिहिल्या आहेत, ज्या त्याआधी कोणा संगीत-समीक्षकाने लिहिल्या नव्हत्या. बाळकृष्णबुबा इंचलकरंजीकरांचे पहिले दोन शिष्य गणपतीबुवा भिलवडीकर आणि पंडित मिराशी यांच्याविषयी रसिकांना माहीत नसलेली आणि त्यांनी आपले गुरू ग्वाल्हेर घराण्याचे गायनाचार्य बाळकृष्णबुबा इंचलकरंजीकरांकडून गाणे शिकताना घेतलेल्या अपार कष्टाची माहिती या पुस्तकात मिळते. त्या वेळच्या कलाकारांची गायनाविषयीची आस्था किती अंतरमनापासून होती याची जाणीव होते.तसेच पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर, पंडित लक्ष्मणप्रसाद जयपूरवाले, बडे गुलाम अली, कुमार गंधर्व, पंडित यशवंतबुवा जोशी, पंडित नारायणराव व्यास यांच्या सारख्या संगीत क्षेत्रात अफाट कर्तृत्व गाजवलेल्या गायकांच्या अंगी थोर कलाकार बनण्याची सुप्त बीजे कशी होती, त्यांनी डोळसपणे आपापल्या घराण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण गायनशैलीने परंपरेनुरूप किंवा वेळप्रसंगी विशिष्ट परंपरेला बंडखोर वृत्तीने झुगारूनही स्वतःची आणि रसिकांची सांगीतिक जाण समृद्ध करण्याचा कसा प्रयत्‍न केला याचा अभ्यासपूर्ण आलेख मांडण्यात रामकृष्ण बाक्रे यशस्वी झाले आहेत. रामकृष्ण बाक्रे यांची भाषाशैली अतिशय साधी, ओघवती आणि रसीली असल्याने गायनाशी नाते न जुळलेल्या व्यक्तीचेही नाते संगीताशी चटकन जुळेल अशा पद्धतीची आहे.

भीमसेन जोशीफिरोज दस्तुर या किराणा घराण्याच्या गायकांची गायन कलेविषयीची आस किती पराकोटीची होती, हे रामकृष्ण बाक्रे आपल्या विश्लेषणात्मक दृष्टीने पटवून देतात व त्यासंबंधीच्या आठवणी परिणामकारकपणे मांडतात. गोविंदराव टेंबे, माणिक वर्मा, पंडित जसराज, मालिनीताई राजूरकर यांनी गानविद्या मिळवण्यासाठी घेतलेले परिश्रम, त्या कलाकारांच्या मैफिली आणि कार्यकर्तृत्व यांविषयी इतक्या बारकाव्याने रामकृष्ण बाक्रे यांनी लिहिले आहे की, ते नवीन कलाकारांसाठी विशेष उद्‌बोधक आहे. हे पुस्तक म्हणजे त्या थोर गायक-गायिकांनी स्वरांपलीकडे जाऊन संगीतविश्वावरोबरच रसिकांनाही कसे घडवले, अशा गायक-गायिकांचा अभ्यासपूर्ण आणि रसाळ आलेख आहे."

पंचाहत्तरी संपादन करा

रामकृष्ण बाक्रे यांच्या कन्या वीणा व त्यांचे पती श्रीकांत देशपांडे यांनी मुंबईत रामकृष्ण बाक्रे यांचा पंचाहत्तरीनिमित्त समारंभ आयोजित केला होता. इतर अनेक मित्र गाणारे होते. किशोरी आमोणकरांना आमंत्रण होते. पण किशोरी आमोणकरांच्या नावाचा इतका दबदबा होता की 'इतक्या प्रसिद्ध गायिकेला गायक म्हणून कसे बोलवावे, त्यांची व्यवस्था आपण कशी सांभाळू' असा संकोच वाटून देशपांडे यांनी त्यांना बोलावण्याचे टाळले. किशोरीताईंना हे कळल्यावर त्या रागावल्या. "(रामकृष्ण) माझ्या भावासारखा आहे. गाणाऱ्यांत माझे नाव असू दे " असे त्या म्हणाल्या आणि त्या अनौपचारिकपणे तेथे गायल्या.[६]

पुरस्कार संपादन करा

रामकृष्ण बाक्रे यांचे पत्रकारितेतील योगदान आणि निष्ठा यांची नोंद घेऊन मुंबई पत्रकार संघाने त्यांना 'आचार्य अत्रे पत्रकारिता पुरस्कार' देऊन त्यांचा सन्मान केला.

संदर्भ संपादन करा

 1. ^ a b अ. वि. बाक्रे, 'तपस्वी संगीत समीक्षक', लोकसत्ता, दि. १० जुलै २०१६, http://www.loksatta.com/vishesh-news/work-introduction-about-ramakrishna-bakre-1265028/
 2. ^ दि. १० जुलै २०१६ रोजी हा लेख पाहिला. या लेखातील पहिले विधान असे आहे : "पत्रकार व संगीत समीक्षक असे दुहेरी व्यक्तिमत्त्व असलेले रामकृष्ण (तात्या) धोंडो बाक्रे आज हयात असते तर १३ जुलै रोजी १०० वर्षांचे झाले असते. प्रत्यक्षात त्यांच्या वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी इहलोक सोडला." त्यावरून ही जन्म तारीख निष्पादित केली आहे : श्रीनिवास हेमाडे.
 3. ^ INDIANAGE.COM, http://www.indianage.com/eventdate.php/13-July-1916[permanent dead link]
 4. ^ प्राथमिक शिक्षक मंच महाराष्ट्र,http://shikshakm.blogspot.in/2014/12/blog-post_22.html
 5. ^ रा.के. लेले, मराठी वृत्तपत्रांचा इतिहास : दोन महायुद्धांदरम्यान, पान ६५४ व ६५९,कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे ३०, प्रकाशन क्रमांक ९६४, प्रथमावृत्ती १९८४ किमंत १५०/-
 6. ^ a b अ.वि. बाक्रे, 'तपस्वी संगीत समीक्षक', लोकसत्ता, दि. १० जुलै २०१६, http://www.loksatta.com/vishesh-news/work-introduction-about-ramakrishna-bakre-1265028/
 7. ^ अ. वि. बाक्रे, 'तपस्वी संगीत समीक्षक', लोकसत्ता, दि. १० जुलै २०१६, http://www.loksatta.com/vishesh-news/work-introduction-about-ramakrishna-bakre-1265028/
 8. ^ बाक्रे यांच्या स्नेही संध्या जोशी यांनी प्रस्तुत विकीपान वाचल्यानंतर what's up च्या संवादात दि. १३ जुलै २०१६ रोजी दिलेली माहिती : श्रीनिवास हेमाडे
 9. ^ रा.के. लेले, मराठी वृत्तपत्रांचा इतिहास : दोन महायुद्धांदरम्यान, पान ६५४, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे ३०, प्रकाशन क्रमांक ९६४, प्रथमावृत्ती १९८४ किमंत १५०/-
 10. ^ श्री. मनोज आचार्य यांनी फेसबुकवर १३ जुलै २०१६ रोजी दिलेली माहिती : https://www.facebook.com/shriniwas.hemade/posts/10210211315457926?notif_t=like&notif_id=1468399353260677, श्रीनिवास हेमाडे
 11. ^ श्री. शांताराम कांबळे, "बुजुर्ग शास्त्रीय गायकांच्या गायकीचा अभ्यासपूर्ण आणि रसाळ आलेख": स्वागत नव्या ग्रंथांचे!, 'नवशक्ति' http://navshakti.co.in/aisee-akshare/174773/[permanent dead link], दि. १० जुलै २०१६ रोजी पाहिले