रानी की वाव

(राणी नी वाव या पानावरून पुनर्निर्देशित)

गुजरात राज्यात 'बावडी' किंवा 'वाव' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अनेक विहिरी आहेत. या विहिरींना पाण्यापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या असतात तसेच विश्रांतीसाठी मजले, छत आणि हे ठिकाण रमणीय व्हावे म्हणून कोरीव काम केलेले असते. गुजरातमधील पाटण या जिल्ह्याच्या गावी असणारी अशी विहीर 'राणीनी वाव' या नावाने प्रसिद्ध आहे. २२ जून २०१४ मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत या स्थळाचा समावेश झाला.[१]

इतिहास संपादन

अहमदाबादपासून साधारण दीडशे किलोमीटर अंतरावर असणारे पाटण हे शहर जुन्याकाळी अन्हीलवाड या नावाने राजधानी म्हणून प्रसिद्ध होते. सोळंकी वंशाची ही राजधानी होती. इसवी सन १०६३ मध्ये राणा भीमदेव (प्रथम) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांची पत्नी राणी उदयमती हिने ही वाव बांधली.

पाटण गावाजवळून पुरातन अश्या सरस्वती नदीचा प्रवाह जातो. ही नदी आता आटलेली असली तरी बाराव्या शतकात या नदीला मोठा पूर आला. या पुरामुळे आलेल्या गाळात विहीर पूर्णपणे भरून गेली. त्या नंतर लोक विहिरीचे पाणी वापरत असत. पण या विहिरीच्या बाजूच्या बांधकामाचा सर्वाना विसर पडला. विहिरीभोवती शेती केली जाऊ लागली. १९८०च्य सुमारास काही कारणाने शेतकऱ्यांनी खोदकाम केले असता त्यांना विहिरीचे अवशेष दिसू लागल्यावर भारतीय पुरातत्त्व खात्याने उत्खनन करून ही वाव प्रकाशात आणली.

पाटण पटोला साड्यांसाठी प्रसिद्ध असणारे हे गाव आता 'राणीनी वाव' (राणीची विहीर)साठी पण प्रसिद्ध आहे.

वास्तू विशेष संपादन

६४ मीटर लांब आणि २० मीटर रुंद असणारी ही वाव साधारण २७ मीटर खोल आहे. सात स्तर असणाऱ्या या विहिरीत काही मजले आहेत, आजूबाजूच्या भिंतीवर अतिशय सुरेख शिल्पे बनवलेली आहेत. अजूनही विहिरीला पाणी आहे परंतु सुरक्षेच्या कारणाने चौथ्या स्तरापेक्षा खाली जाता येत नाही. चौथ्या स्तरावरून विहिरीच्या समोरील भिंतीकडे पहिले असता एक शेषशायी विष्णूची अतिशय सुरेख मूर्ती दिसते. प्रेक्षक आणि विष्णू मूर्ती यांच्यामध्ये एका मजल्याचे बांधकाम येत असल्याने छोट्याश्या फटीतून ही मूर्ती बघावी लागते.

गुजरातमधील वाव या फक्त पाणी भरण्याच्या जागा नव्हत्या तर सामाजिक अभिसरणाचे केंद्र होत्या. पाणी भरायला येणारे लोक विसावण्यासाठी बसतील तेव्हा त्यांना या मूर्ती दिसून उत्तम विचार आणि इतिहास याची माहिती मिळेल असा विचार या बांधकामात होता.

दशावतार, चामुंडा, कल्की, महिषासुरमर्दिनी, हनुमान, शिव पार्वती, मातृका, सूर सुंदरी अशा अनेक कोरीव मूर्ती 'राणीनी वाव' येथे पाहायला मिळतात.

  1. ^ http://whc.unesco.org/en/list/922