चित्रपट हे फक्त लोकरंजनाचे माध्यम नसून ते लोकशिक्षणाचे माध्यम आहे ,ही धारणा मनात ठेवून गेल्या चार दशकाहून अधिक काळ ज्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत एखाद्या व्रतस्थाप्रमाणे कार्य केले ते जेष्ठ दिग्दर्शक म्हणजे राजदत्त[].

राजदत्त
जन्म दत्तात्रय अंबादास मायाळू
१९३२
धामणंगाव,जि.अमरावती ,महाराष्ट्र
शिक्षण बी.कॉम. वर्धा
ख्याती

दिग्दर्शक - चित्रपट,मालिका,माहितीपट,लघुपट आणि महानाट्य.

चित्ररत्न,स्वातंत्र्य सैनिक.

जीवन परिचय

संपादन

मूळ नाव दत्तात्रय अंबादास मायाळू, चित्रपटासाठीचे नाव राजदत्त. चित्रपट क्षेत्रातील त्यांचे गुरू राजा परांजपे यांच्या नावातील 'राज 'आणि स्वतःच्या नावातील 'दत्ता' घेऊन राजदत्त झाले .

अमरावती जिल्ह्यातील धामणंगाव इथे त्यांचा जन्म झाला. वर्धा येथे जी.एस. कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये बी. कॉम. पर्यंत शिक्षण घेतले. शिशु अवस्थेपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जात. तृतीय वर्ष शिक्षित स्वयंसेवक संघ बंदीच्या काळात २ महिने १८ दिवस कैद भोगली. सत्याग्रहात भाग घेऊन लहानपणा पासून गणेश उत्सव,मेळा,शाळा व कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये नाटकात भूमिका केल्या. त्यांच्या कुसुमाग्रजांचे 'दूरचे दिवे ',आचार्य अत्रे यांचे 'उद्याचा संसार ','साष्टांग नमस्कार'मधील भूमिका चांगल्या झाल्या. विशेषतः 'साष्टांग नमस्कर' मधली कवीची भूमिका खूप छान जमली होती. शिवाय बाळ कोल्हटकरांच्या 'वाहतो ही दुर्वांची जुडी' मध्येही काम केले .

सदुभाऊ डांगे नावाचे केरळमधले संघाचे प्रचारक होते. ते नाटिका लिहीत. त्यांच्या सगळ्या नाटिकांमधून राजदत्तांनी भूमिका केल्या. प्रत्यक्ष राजाभाऊ परांजपे यांच्या हस्ते त्यांना पारितोषिकही मिळाले. महाविद्यालयात असतांना दर रविवारी सेवाग्राम जवळच्या गोपुरीतील कृष्ठधाम केंद्रात शुश्रूषा पथकांत सहभागी होत. समाजसेवेची आस आजही त्यांच्या कलाकृतीतून दिसते. सुप्रसिद्ध लेखक ग.त्र्य माडखोलकर यांच्या प्रोत्साहनाने दैनिक तरुण भारत नागपूर येथील 'युनिव्हर्सिटी 'सदरात लिखाण सुरू केले.त्यांच्यातील पत्रकारितेचा हा श्रीगणेशा होता.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुण्यातील दैनिक भारत या वृत्तपत्रात नोकरी केली.त्यानंतर मद्रास येथील चांदोबा या मुलांच्या मासिकांत संपादकीय विभागात दोन वर्ष काम केले. त्यांची मुलगी भक्ती मायाळू प्रसिद्ध मालिका संकलक आहेत.

गोवा मुक्ती संग्राम

संपादन

श्री. जगन्नाथराव जोशी यांच्या प्रेरणेतून गोवा मुक्ती संग्रामात सहभाग घेतला. सुरुवातीला केसरीच्या ऑफिसमध्ये असलेल्या प्रत्यक्ष सत्याग्रहातील कार्यालयात काम केले. त्यानंतर प्रत्यक्ष सत्याग्रहात भाग घेतला. एकदा बेळगांवहून रात्री १०-१२ तास चालत कुणकुणभी हे ठिकाण गाठले. सुरत्याच्या सत्याग्रहात भाग घेतला. पोलीस स्टेशन समोरचा पोर्तुगीज झेंडा काढून तिरंगा फडकावला. त्यावेळी झालेल्या गोळीबारात सोनवणे नावाच्या सहकाऱ्याच्या पायाला गोळी लागली. तेव्हा त्याला तराफ्यावर बसवून तराफा ढकलत नदी पार केली आणि त्याला वैद्यकीय मदत मिळवून दिली. याचवेळी राजदत्त यांना अटक झाली व शिक्षाही झाली. पंचवीस माणसेही बसू शकणार नाही अशा जागेत १०० माणसे कोंबली. अशा प्रसंगांतून तापून सुलाखून निघालेले राजदत्त हे सच्चे स्वतंत्र सैनिक आहेत. म्हणूनच 'विनायक दामोदर सावरकर' या मालिकेतून बारीक सारीक तपशिलासह त्यांनी तरुणांना देशभक्तीचा संदेश दिला.

चित्रपट क्षेत्र

संपादन

मद्रास इथला कालखंड त्यांच्या जीवनाची दिशा ठरवणारा होता. राजाभाऊ परांजपे मद्रासला चित्रपटासाठी आले असतांना त्यांच्या ओळखींमुळे येथील AVMच्या स्टुडिओतून राजदत्त यांना मनसोक्त फिरता आले आणि चित्रपट या क्षेत्राशी त्यांचे नाते जोडले गेले. राजाभाऊ परांजपे यांच्याकडे AVMच्या 'बाप बेटे' चित्रपटादरम्यान उमेदवारी सुरू झाली. जवळ जवळ १३ चित्रपटांसाठी राजाभाऊंचे सहाय्यक म्हणून काम केले. त्यात प्रामुख्याने 'देवघर','जगाच्या पाठीवर','आधी कळस मग पाया ','हा माझा मार्ग एकाला','पाठलाग','पडछाया' इ. चित्रपटांचा उल्लेख करता येईल. १९६७ मध्ये स्वतंत्रपणे चित्रपट दिग्दर्शनाला सुरुवात केली. पहिला चित्रपट 'मधुचंद्र' आणि या पदार्पणातच यांनी एक यशस्वी प्रयोग केला; हिंदीत संगीतकार असलेले एन.दत्ता यांना मराठी चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शन करायला लावले.     

पहिला चित्रपट झाल्यानंतर पुन्हा काहीच काम नाही. अशावेळी भालजी पेंढारकर व लता मंगेशकर यांनी मदत केली आणि चित्रपट तयार झाला - 'घरची राणी'. राजदत्त यांनी या मदतीचे चीज केले. महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आणि मग राजदत्त यांनी मागे वळून पाहिलेच नाही.१९६९ साली 'अपराध'चित्रपटाला पुन्हा एकदा 'राज्य शासनाचा प्रथम पुरस्कार'मिळाला. त्यानंतर सतत २८ चित्रपटाचे दिग्दर्शन केले []त्यापैकी ९ चित्रपटांना प्रथम, ३ चित्रपटांना द्वितीय, २ चित्रपटांना तृतीय आणि एका चित्रपटाला विशेष असे राज्य शासनाचे एकूण १४ पुरस्कार मिळाले आहेत. एवढे पुरस्कार मिळवणारे मराठीतले 'राजदत्त' हे एकमेव दिग्दर्शक आहेत.

राष्ट्रीय पातळीवरही राजदत्त यांची कामगिरी अशीच आहे. त्यांच्या 'शापित','पुढचं पाऊल' आणि 'सर्जा' या तीन चित्रपटांना 'रजतकमळ'मिळालंय . चित्रपटसृष्टीतला मानाचा फिल्मफेर पुरस्कारही राजदत्त यांना मिळाला.

राजदत्त यांनी प्रामुख्याने राष्ट्रभक्ती, सामाजिक प्रश्नांची तळमळ आणि चिंतनाला चालना देणारे चित्रपट दिग्दर्शित केले म्हणूनच अनेक विषय प्रेक्षकांपर्यंत पोहचले.

संत गाडगेबाबा यांच्या जीवनावरचा 'देवकी नंदन गोपाला' हा चित्रपट महाराष्ट्रबरोबर कर्नाटक, तामिळनाडू मध्येही प्रदर्शित झाला. इतकेच नव्हे तर इंग्लंड आणि अमेरिकेतही प्रदर्शित झाला.ताश्कंद फेस्टिव्हलमध्येही तो दाखवण्यात आला.'शापित' चित्रपटासाठी रशियन कौन्सिलने त्यांचा सत्कार केला. राजदत्त यांच्या तीन चित्रपटांना ताश्कंद, व्हेनिस आणि कॉर्क फेस्टिव्हलमध्ये स्थान मिळाले. राजदत्त यांनी 'इरिया' हा हिंदी चित्रपटही केला. त्यात शर्मिला टागोर, मार्क जुबेर यांच्या भूमिका होत्या .

 
चित्ररत्नाचे सामाजिक चिंतन व राष्ट्रभक्ती

मालिका क्षेत्र

संपादन

चित्रपटाच्या बरोबरच दूरदर्शन मालिका आणि अनेक टेलिफिल्मचे दिग्दर्शनहि त्यांनी केले आहे.. 'एक कहाणी' ही हिंदी मालिका त्यातील 'गोकुळ' ही मधू मंगेश कर्णिक यांची कथा ही मालिका युनेस्कोच्या लायब्ररीत आहे. समाजातल्या प्रश्नांबाबत चर्चा करणारी 'इन सर्च ऑफ सोल्यूशन' ही सुद्धा हिंदीतील मालिका. ही मालिका करण्यास माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी राजदत्त यांना सांगितले होते .

जनसामान्यात अतिशय लोकप्रिय झालेली मालिका 'गोट्या' या मालिकेला 'रापा' पुरस्कार मिळाला आहे.

मानवी मनाच्या स्पंदनाची उकल करणाऱ्या थोड्याश्या गूढतेकडे झुकणाऱ्या कथा 'मन वढाय वढाय' मध्ये ऐतिहासिक, कर्तृत्त्ववान स्त्रियांच्या जीवनांचा स्फूर्तिदायक आलेख मांडण्यात आला.

टिळक-आगरकर यांच्या विचारांचा वेध घेणारी मालिका 'मर्मबंध'. तसेच 'विनायक दामोदर सावरकर' यांच्या जीवनावरची मालिका राष्ट्रीय प्रसारणात दाखवण्यात आली. राजदत्त यांनी एकूण १० मालिकांचे दिग्दर्शन केले.

लघुपट / माहितीपट

संपादन

त्याशिवाय माणसाच्या जीवनावर प्रभाव पडणाऱ्या विविध विषयांची हाताळणी लघुपट तसेच माहितीपटाच्या माध्यमातून केली.

  • संत ज्ञानेश्वर महाराजांच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचे तितकच तरल चित्रण 'सखा माझा ज्ञानेश्वर' मध्ये आहे.
  • वरळीच्या जीवनावर आधारित 'काज '
  • छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या शताब्दी जन्मोत्सवा निमित्त 'राजगड'
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ.हेगडेवार यांच्या जंन्मशताब्दी वर्षा निमित्य त्यांच्या जीवनावर आधारित लघु-माहितीपट
  • सुप्रसिद्ध साहित्यिक विदुषि दुर्गा भागवत यांच्या जीवनावरील लघुपट - दूरदर्शनच्या माध्यमातून हा लघुपट ८ भाषांमध्ये प्रसारित करण्यात आला.

अपंग मुलांचे विश्व उलगडून दाखवणारी, त्यांच्या जीवनाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या संस्थेची माहिती देणारे दोन लघुपट .'कथा अरुणोदयाची ' आणि 'एका पाऊलवाटेची स्वर्ण जयंती '

 
In deep thought

रंगमंच

संपादन

चित्रपट, मालिका आणि लघुपटांबरोबरच रंगमंच्यावरही राजदत्त यांनी एक मोठा आविष्कार घडून आणला. 'आनंद वन भू-वनी ' समर्थ रामदासांच्या जीवनावरचे १०० कलाकारांना घेऊन सादर केलेले महाराष्ट्रातले पहिले महानाट्य. याचे एकूण ५० प्रयोग झाले..

राजदत्त यांनी अनेक संस्थांमधून मोलाच्या भूमिका निभावल्या आहेत .

  • मुंबईत झालेल्या जागतिक मराठी परिषदेचे ते निमंत्रक होते .
  • राष्ट्रीय चित्रपट निवड समितीचे सदस्य 'श्वास ' या मराठी चित्रपटाच्या राष्ट्रपती  सुवर्ण पदकासाठी निवडीत यांचा वाटा होता .
  • चित्रपटांना करमुक्ती देणाऱ्या सल्लागार मंडळाचे सदस्य .
  • 'संस्कार भारती' या अखिल भारतीय पातळीवरील क्षेत्रातील अग्रणी संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष.

इतर पुरस्कार[]

संपादन

स्वामी चिन्मयानंद पुरस्कार, सुधीर फडके स्मृतिप्रीत्यर्थ स्वरतीर्थ पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार, लोकमान्य टिळक व्याख्यानमालेचा तेजस पुरस्कार, महाराष्ट्र राज्याचा जीवन गौरव पुरस्कार, दूरदर्शन सह्यांद्रीचा चित्ररत्न पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी 'राजदत्त' यांना सन्मानित करण्यात आले.

आत्यंतिक राष्ट्रप्रेम, सामाजिक प्रश्नांची जाण आणि चित्रपटातून प्रबोधन या त्रिसूत्रीवर जीवनक्रम आचरणारे चित्रतपस्वी म्हणजे राजदत्त. तारुण्यात असताना मुक्ती संग्रामात स्वतःला झोकून देणारे स्वातंत्रसैनिक आणि तोच सेनानीपणा समाजकार्यात जपणारे सच्चे नागरिक म्हणजे राजदत्त.  

संदर्भ

संपादन
  1. ^ "Raj Dutt - Movies, Biography, News, Age & Photos | BookMyShow". BookMyShow. 2018-07-14 रोजी पाहिले.
  2. ^ "Rajdutt". IMDb. 2018-07-14 रोजी पाहिले.
  3. ^ "Pune International Film Festival: Rajdutt bags award for outstanding contribution to Indian cinema". https://www.hindustantimes.com/ (इंग्रजी भाषेत). 2018-01-19. 2018-07-14 रोजी पाहिले. External link in |work= (सहाय्य)