मेंढी पालन

(मेंढपाळ या पानावरून पुनर्निर्देशित)

मेंढी पालन हे मेंढ्या पाळून त्यांची लोकर, कातडे व मांस विकण्याचा व्यवसाय आहे. या व्यवसायास जास्त जमीन लागत नाही. हा व्यवसाय एखाद्या घराच्या शेडमध्ये देखील करता येते. कोरड्या जमिनीवर शेती करण्यासाठी हा एक फार महत्त्वाचा घटक आहे. फार थोडी गुंतवणूक करून मेंढी पालन हा किरकोळ, लहान शेतकऱ्यासाठी आणि भूमिहीन श्रमिकांसाठी एक फायदेशीर उद्यम ठरू शकतो. जगातील अनेक देशांत हा व्यवसाय प्रचंड मोठ्या विस्तारातील जमिनीवर केला जातो. भारताशिवाय न्यू झीलँड, अमेरिका, मध्य आशिया आणि आर्जेन्टिनामध्ये हा व्यवसाय केला जातो.

मेंढपाळ व्यवसाय

स्थानीय जाती: क्षेत्रांप्रमाणे बदलते परकीय जाती

  1. मेरीनो – लोकरीसाठी
  2. रॅम बुलेट – लोकर आणि मांस
  3. शेविएट – मांस
  4. साउथ डाउन – मांस
 
शेतात मेंढ्या चारा खातांना

भारतीय मेंढ्यांच्या जाती

संपादन

पूंछ : पूंछ भागात आढळणाऱ्या या जातीच्या मेंढ्या थोराड आणि आखूड कानाच्या असून रंगाने पांढऱ्या असतात. शेपटी आखूड असून तिचा बुंधा जाड असतो. यातील बहुसंख्य मेंढ्यांना शिंगे नसतात. उन्हाळ्यात चराऊ रानामधील गवत खाऊन व हिवाळ्यात बंदिस्त मेंढवाड्यामध्ये खाद्य देऊन त्या वाढविल्या जातात. वर्षातून दोन किंवा तीन कातरणींमध्ये एका मेंढीपासून सरासरीने १.६ किग्रॅ. लोकर मिळते.

करनाह : काश्मीरमध्ये १,२०० ते ४,६०० मी. उंचीवरील करनाह भागात या जातीच्या मेंढ्या आढळतात व केल हे त्यांचे माहेरघर आहे. या जातीतील मेंढ्यांचे नाक उठावदार असून शिंगे मोठी व वळलेली असतात. वर्षाला दोन कातरणींत ०.९ ते १.३ किग्रॅ. उत्तम प्रतीची तलम पण आखूड धाग्याची लोकर यांच्यापासून मिळते.

भाकरवाल : काश्मीरमध्ये डोंगराळ भागात व पीर पंजालच्या पर्वतराजीवरील पठारावर या जातीच्या मेंढ्या आढळतात. त्या काटक आणि थोराड असून त्यांचे कळप स्थानांतर करीत काश्मीर दरीमध्ये लिद्दार, पहलगामपर्यंत पोहोचतात. काही उपजातींच्या मेंढ्यांच्या शेपटीवर बरीच चरबी साठलेली असते. यांचे कान लांब, रुंद व लोंबते असून त्यांच्या डोळ्यांच्या व तोंडाच्या भोवती विटकरी रंगाचे वलय असते. वर्षातून एका मेंढीपासून तीन कातरणींमध्ये सरासरीने १.६ किग्रॅ. जाड धाग्याची रंगीत लोकर मिळते. स्थानिक लोक तिचा जाडीभरडी ब्लॅंकेटे बनविण्यासाठी उपयोग करतात.

भादरवाह (गद्‌दी) : जम्मूमधील किश्तवार व भद्रवाह भागांत या मेंढ्या आढळतात. या जातीच्या नरांना शिंगे असतात; पण माद्यांना नसतात. यांचा रंग पांढरा असतो व चेहऱ्यावर तपकिरी रंगाचे केस असतात. हिवाळ्यामध्ये यांचे कळप कुलू व कांग्रा खोऱ्यांमध्ये राहतात, तर उन्हाळ्यात पीर पंजालच्या सर्वांत उंच टेकड्यांवर चराईसाठी जातात. वर्षातून तीन कातरणींमध्ये सरासरीने एका मेंढीपासून १.१३ किग्रॅ. तलम,

रामपूरबशीर : हिमालयाच्या पायथ्याशी सर्व दूर आढळणारी ही मेंढ्यांची प्रसिद्ध जात आहे. या मेंढ्या मध्यम चणीच्या असून त्‌यांची शिंगे मागे वळून पुन्हा खाली वळलेली असतात. कान मोठे असून शेपटी बारीक व आखूड असते. यांचे कळप उन्हाळ्यात तिबेटच्या सीमेपर्यंत चरत जातात व पुन्हा यमुना, टॉन्स व सतलज दरीतील शिवालिक टेकड्यांमध्ये परततात. देहरादून जिल्ह्याच्या चक्राता भागात या जातीच्या मेंढ्यांचे काही प्रकार आढळतात. प्रत्येक मेंढीपासून वर्षाला १.३६ ते १.८ किग्रॅ. चांगल्या प्रतीची लोकर मिळते. तिबेटच्या सीमेवर शेळ्यांबरोबर या मेंढ्या सामानाची ने-आण करण्यासाठी वापरतात.

लोही : डोक्याचा तपकिरी रंग, उठावदार उंचावलेले नाकाचे हाड (रोमन नोज), मऊ व लांबसडक कान ही या जातीची वैशिष्टये आहेत. यांच्या चेहऱ्यावर लोकर नसते. ल्यालपूर, झांग व मंगमरी या पाकिस्तानातील जिल्ह्यांत या जातीच्या जातिवंतर मेंढ्या आढळतात. तथापि या जातीतील काही प्रकार राजस्थान व गुजरातमध्ये आहेत. लोकर, मांस व दूध या तीनही प्रकारचे उत्पादन या जातीच्या मेंढ्यांपासून मिळते. प्रत्येक मेंढीपासून वर्षाला १.८ किग्रॅ. जाड, लांब धाग्याची लोकर व दररोज ३.६ लिटरपर्यंत दूध मिळू शकते. राजस्थानमध्ये या जातीच्या मेंढ्यांच्या उपजातींना निरनिराळी नावे आहेत. जोधपूर व जैसलमीर जिल्ह्यांत जैसलमीरी; जयपूर, टोंक व सवाईमाधवपूर जिल्ह्यांत मालपुरी; उदयपूर जिल्ह्यांत सोनाडी अशी नावे आहेत; तर गुजरातमधील बडोदे जिल्ह्यात या मेंढ्या चारोथ्री या नावाने ओळखल्या जातात.

बिकानेरी : पूर्वीच्या बिकानेर संस्थानातील भाग व त्या लगतच्या उ. प्रदेश, पंजाब आणि राजस्थानमधील भागात या जातीच्या मेंढ्या प्रामुख्याने आढळतात. या मेंढ्या मध्यम चणीच्या असून त्यांचे डोके लहान असते व कान सुरळीसारखे असतात. भारतातील सर्वांत जास्त प्रमाणात लोकर देणारी ही मेंढ्यांची जात आहे. प्रत्येक मेंढीपासून वर्षाला १.८ ते ४ किग्रॅ. लोकर मिळते. माग्रा, चोकला किंवा शेरबवटी व नाली या उपजातीही या भागात आढळतात. चोकला या राजस्थानमधील उपजातीपासून चांगल्या प्रतीची गालिचे करण्याला उपयुक्त लोकर मिळते.

मारवाडी : या जातीच्या मेंढ्यांपासून पांढरी, केसमिश्रित, जाडीभरडी गालिच्याची लोकर मिळते. काळ्या रंगाचा चेहरा, लांब पाय व उठावदार नाक ही या जातीची वैशिष्टये आहेत. या मेंढ्यांना गळ्याखाली गलूली आढळतात. जोधपूर व जयपूर भागांत या मेढ्या आढळत असल्या, तरी भटक्या जातींनी पाळलेले या जातीच्या मेंढ्यांचे कळप उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश तसेच उत्तर महाराष्ट्रात दूरवर येतात. प्रत्येक मेंढीपासून वर्षाला ०.९ ते १.८ किग्रॅ. लोकर मिळते.

कच्छी : उत्तर गुजरात व सौराष्ट्राच्या वाळवंटी प्रदेशात या जातीच्या मेंढ्या आढळतात. काळसर बदामी रंगाच्या या मेंढ्या चणीने लहान पण बांधेसूद असतात. यामुळे त्यांच्यापासून बऱ्यापैकी मांस उपलब्ध होते. विविध प्रकारची लोकर या जातीच्या मेंढ्यांपासून मिळते व तिचा उपयोग लष्करामध्ये लागणाऱ्या फेल्टच्या कपड्यासाठी करतात.

काठेवाडी : काठेवाड व त्याच्या लगतचा कच्छचा भाग, दक्षिण-राजस्थान व उत्तर गुजरात व भागांतील मेंढ्यांची ही जात आहे. मेंढ्या मध्यम बांध्याच्या, पांढऱ्या रंगाच्या पण चेहरा व पाय यांवर काळे अगर तपकिरी रंगाचे केस असतात. सरासरीने प्रत्येक मेंढीपासून वर्षाला दीड किग्रॅ. जाड व लांब धाग्याची लोकर मिळते.

दख्खनी : राजस्थानातील लोकर देणाऱ्या मेंढ्या आणि आंध्र प्रदेश व तमिळनाडूमधील केसाळ मेंढ्या यांच्या संकरापासून ही मेंढ्यांची जात निपजलेली आहे. महाराष्ट्राच्या दक्षिण भागात व कर्नाटक राज्याच्या काही भागांत या मेंढ्या आढळतात. प्रत्येक मेंढीपासून वर्षाला सरासरीने ४५० ग्रॅ. लोकर मिळते व ती काळ्या व करड्या रंगाची आणि केसाळ असते. तिचा कांबळी करण्यासाठी उपयोग करतात. या मेंढ्या मुख्यत्वे मांसासाठी पाळल्या जातात. निकृष्ट चराऊ रानावर या मेंढ्या आपली उपजीविका करू शकतात.

नेल्लोर : या जातीच्या मेंढ्या भारतातील सर्वात उंच मेंढ्या आहेत. लांबोळा चेहरा, लांब कान व सर्वांगावर दाट पण आखूड केस यामुळे या शेळीसारख्या दिसतात. नराला पीळदार शिंगे असतात, तर मादीच्या डोक्याला मध्यभागी उंचवटा असतो. यांचा रंग पिवळट तांबूस हरिणासारखा असून शेपटी आखूड असते. शेपटीच्या टोकला केसांचा झुबका असतो. सामान्यपणे जंगली भाग, नद्यांची पात्रे, डोंगरांचे उतार व पीक काढलेली शेते या ठिकाणी मिळेल त्या खाद्यावर या मेंढ्या आपली उपजीविका करू शकतात. मंड्या, यलाग व तेंगुरी हे या जातीच्या मेंढ्यांचे प्रकार आहेत. या मेंढ्यांपासून जवळ जवळ काहीही मिळत नाही. मात्र मांसोत्पादनासाठी या जाती प्रसिद्ध आहेत. बन्नूर ही कर्नाटकातील आणखी एक जात मांसाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.

विदेशी मेंढ्यांच्या जाती

संपादन

मेरिना : ही मूळची स्पेनमधील जात असून अतिशय तलम लोकरीच्या उत्पादनासाठी जगप्रसिद्ध आहे. बाराव्या शतकापासून ही जात अस्तित्वात आहे. मूर लोकांनी ती स्पेनमध्ये आयात केली असावी. समशीतोष्ण जलवायुमान असलेल्या रुक्ष प्रदेशात स्थानांतर करीत जगण्याची क्षमता या जातीच्या मेंढ्यांच्या अंगी असल्यामुळे जगातील कित्येक देशांमध्ये या जातीचा प्रसार झाला आहे. त्या त्या देशात या जातीच्या मेंढ्यांचे अनेक विभेद निर्माण झाले. उदा., ऑस्ट्रेलियन मेरिनो, रशियन मेरिनो, अमेरिकन मेरिनो इत्यादी. या जातींच्या नरांना शिंगे असतात, माद्यांना ती नसतात. डोके व पाय यांवरही भरपूर व दाट लोकर असते. या मेंढ्या शुभ्र पांढऱ्या रंगाच्या असून त्यांच्या लोकरीचे धागे बारीक व लवचिक असतात. कातड्यातील तैल ग्रंथीमधून पुष्कळ चरबी या धाग्यामध्ये मिसळली गेल्यामुळे लोकर कुरळी, मऊ, तलम व तजेलदार असते. वरच्या बाजूच्या चरबीवर धूळ साचून एक काळपट आवरण तयार होते व त्यामुळे आतील स्वच्छ पांढरी लोकर आयतीच सुरक्षित राहते. मानेवर जाडजूड वळ्या असलेल्या नेग्रेटी मेरिनो या मेंढ्यांपासून एकोणिसाव्या शतकामध्ये इंग्लिश मेरिनो ही जात इंग्लंडमध्ये तयार करण्यात आली. एका मेंढीपासून वर्षाला ५ ते ७ किग्रॅ. लोकर मिळते. या जातीच्या मेंढ्यांच्या संकरापासून निपजलेल्या प्रजेची लोकरही उत्कृष्ट दर्जाची असते.

रॅम्ब्युलेट : फ्रान्सच्या सोळाव्या लूई या राजाच्या रॅम्ब्युलेट येथील मेंढवाड्यावर स्पेनमधून १७८६ मध्ये व पुन्हा १७९९ मध्ये निवडक मेरिनो जातीच्या मेंढ्या आयात केल्या गेल्या. या मेंढ्यांपासून हिची पैदास करण्यात आली. या मेंढ्यांच्या अंगावर दाट, तलम लोकर भरपूर असते. चेहरा व पाय यांचा रंग पांढरा असून चेहऱ्यावर पुष्कळ लोकर इतकी असते की, त्यामुळे काही मेंढ्यांना आंधळेपणा येण्याचा संभव निर्माण होतो. नराला शिंगे व डोक्यावर मध्यभागी उंचवटा असतो; माद्यांना फक्त उंचवटा असतो. या जातीच्या मेंढ्यांच्या लाकरीबरोबरच त्यांचे मांसोत्पादन वाढविण्याचे प्रयत्न जर्मन मेंढपाळांनी केले. उत्तर अमेरिकेत या जातीच्या मेंढ्या १८४० मध्ये प्रथमतः आयात केल्या गेल्या व पश्चिम किनाऱ्यावरील प्रांतात निवड पद्धतीने प्रजनन करून त्यांचे संगोपन मोठ्या प्रमाणावर करण्यात आले. चेव्हिऑट : मध्यम प्रतीची लोकर उत्पादन करणाऱ्या ह्या मेंढ्यांच्या जातीची स्कॉटलंडमध्ये पैदास करण्यात आली. यांच्या चेहऱ्याचा रंग पांढरा असून डोके, कान आणि पायावर कोपराखाली व ढोपराखाली लोकर नसते, त्यामुळे त्या डौलदार दिसतात. प्रत्येक मेंढीपासून वर्षाला २.५ ते ३.५ किग्रॅ. लोकर मिळते. लिंकन जातीच्या मेंढ्यांशी संकर प्रजनन करून मांसोत्पादनासाठी संकरित प्रजा उपयोगात आणतात.

साऊथ डाऊन : इंग्लंडमध्ये सर्वप्रथम अस्तित्वात आलेली ससेक्स टेकड्यांतील ही मेंढ्यांची जात बांध्याने लहान आहे. त्यांच्या चेहऱ्याचा रंग फिकट तपकिरी असून त्यांना शिंगे नसतात. एका मेंढीपासून वर्षाला २ ते ३ किग्रॅ. उत्कृष्ट प्रतीची पांढरी पण आखूड धाग्याची लोकर मिळते.

इंग्लिश लीस्टर : रॉबर्ट बेकवेल या शास्त्रज्ञांनी १७५५ मध्ये स्थानिक मेंढ्यांपासून निवड पद्धतीने प्रजनन करून ह्या जातीची इंग्लंडमध्ये पैदास केली. चेहरा व पाय यांवर लोकर नसते. सर्वांगावर पिळ्यासारखी झुबकेदार लोकर असते. ही लोकर जाड व लांब धाग्याची असते.

फायदे

संपादन
  • पर्यावरण आणि अयोग्य प्रबंधन पद्धतींशी चांगले अनुकूलन
  • दिवसेंदिवस मांसाची किंमत वाढत आहे.
  • मेंढ्यांपासून दूध आणि लोकर मिळते.
  • एक मेंढी एका वेळेस 1 ते 2 करडू देते
  • मांसापासून सरासरी मिळकत 22-30 कि.ग्रा/मेंढी
  • खतामुळे जमिनीची चांगली किंमत

मेंढ्यांपासून मिळणारे उत्पन्न

संपादन

मेंढ्यांपासून लोकर, मांस, कातडी व खत हे पदार्थ मुख्यत्वे मिळतात. मेंढ्यांपासून मिळणाऱ्या लोकरीसंबंधीची माहिती ‘लोकर’ या नोंदीत दिलेली आहे. लोकरीच्या जोडीला त्यांच्यापासून मांसही मिळते. साधारणपणे जास्त लोकर देणाऱ्या मेंढ्यांत मांसाचे प्रमाण कमी, तर कमी लोकर देणाऱ्यांमध्ये ते जास्त असते. भारतातील निरनिराळ्या राज्यांतील खाटिकखान्यात सु. पन्नास लाख मेंढ्यांची दर वर्षी कत्तल होते व त्यांपासून सु. १.५८ लाख टन मांस मिळते. [→मांस उद्योग]. भारतातील मेंढ्यांच्या कातड्याचे उत्पादन दर वर्षी सु १.५५ कोटी कातडी इतके आहे. यांपैकी सु. चौदा लाख कातडी राजस्थानातून मिळतात. त्यांपासून पाकिटे, हातपिशव्या, बूट, वाद्ये इ. बनवितात. [→चर्मोद्योग]. शेळ्यांच्या तुलनेत मेंढ्यापासून दूध जवळजवळ मिळत नाही, असे म्हणले तरी चालेल, काश्मीरमधील पूंछ, पंजाबातील लोही आणि उत्तर गुजरातमधील कच्छी मेंढ्यांपासून इतर मेंढ्यांच्या मानाने खूपच जास्त प्रमाणात दूध मिळते. मेंढीपासून लेंडी खत व मूत्र खत मिळते. एक मेंढी वर्षाला सु. ०.२५ टन खत देते. याकरिता शेतामध्ये मेंढ्या बसविण्याची पद्धत भारतभर रूढ आहे

संदर्भ

संपादन