मुक्त शिक्षण
जगातील शिक्षण व्यवस्था ३० ते ३५ वर्षांपासून खूप बदलते आहे. पारंपारिक शिक्षण व्यवस्था लोकसंख्येच्या फ़ार मोठ्या भागा पर्यंत अद्याप पोचलेलीच नव्हती. त्यामुळे उच्च दर्जाचे शिक्षण ही फ़क्त उच्च वर्गातील लोकांचीच मक्तेदारी झाली होती. मुक्त शिक्षण व्यवस्था हे उच्च दर्जाचे शिक्षण सर्वांसाठी मुक्त करण्याचा प्रयत्न करते. ह्या व्यवस्थेत शिक्षणासाठी प्रवेशावर कमीतकमी निर्बंध असतात. परंतु परिक्षा पद्धतीत मात्र गुणवत्तेची तीच पारंपारिक मानदंड वापरली जातात.
ऐतिहासिक पार्श्वभूमी
संपादनमुक्त शिक्षण ही आता बरीच जुनी संकल्पना झाली आहे. जगातील प्रथम मुक्त विद्यापीठ इंग्लंडमध्ये सन १९६९ मध्ये स्थापन झाले. आजही ते अत्यंत प्रतिष्ठित आणि गुणवत्तेसाठी नावलौकिक असलेले मुक्त विद्यापीठ आहे. आता तर जगातील २० पेक्षा अधिक देशांमध्ये मुक्त विद्यापीठे स्थापन झाली आहेत.
मुक्त शिक्षणाचे तत्त्वज्ञान
संपादनप्रत्येक व्यक्ति जीवनाच्या प्रत्येक क्षणी नवीन ज्ञान, क्षमता किंवा कौशल्य आत्मसात करीत असतो किंवा त्याचा वापर तरी करीत असतो. वापर करीत असतांना मिळ्णाऱ्या अनुभवातून शिक्षण हे सखोल होत असते. एका अर्थाने जीवन हे एक निरंतर शिक्षणाची प्रक्रिया असते. चांगल्या शिक्षकाची उपस्थिती ह्या निरंतर शिक्षणाच्या प्रक्रियेला जास्त सोपी, आनंददायक, वेगवान व सखोल करू शकते. परंतु शिक्षण घेण्याची मूळ प्रक्रिया ही नेहमीच विद्यार्थ्याच्या आंतरिक इच्छेवर आणि प्रयत्नावर अवलंबून असते. ह्याच कारणाने कुठलीही व्यक्ति शिक्षकाच्या उपस्थितीत किंवा अनुपस्थितीत देखील सतत शिकू शकते.
मुक्त शिक्षणाची व्याख्या
संपादनमुक्त शिक्षणाची सर्वमान्य अशी एकच व्याख्या नाही. वेगवेगळ्या पद्धतीने मुक्त शिक्षणाची व्याख्या करतात. परंतु सर्व व्याख्यांमध्ये पुढील वैशिष्ट्ये आढळतात :
- मुक्त शिक्षणात शिक्षक व विद्यार्थ्यात वेळ 'अथवा / व' स्थळात अंतर असते.
- एखादी शैक्षणिक संस्था मुक्त शिक्षण प्रमाणित करते. स्वयं प्रेरणेने घेतलेल्या परंतु शैक्षणिक संस्थेने प्रमाणित न केलेल्या शिक्षणास मुक्त शिक्षण म्हणत नाहीत.
- मुक्त शिक्षणात वेगवेगळ्या व एकापेक्षा अधिक माध्यमांचा वापर केला जातो.
- शैक्षणिक साहित्य अगोदरच वापरून त्याची गुणवत्ता तपासून पाहिलेली असते.