मार्गम ही भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्यशैलीत कार्यक्रम करताना विशिष्ट क्रमाने रचना सादर करण्याची पद्धत आहे. त्या क्रमाला ' मार्गम' असे म्हणतात. नृत्यकलेचे अंतिम साध्य हे रसनिर्मिती आहे व त्यासाठी मार्गम ही एक संकल्पना, एक आराखडा, एक मूलभूत कल्पना आहे. नृत्याचा अपेक्षित परिणाम साधण्यासाठी मार्गम ही योजना आहे.[]'

भरतनाट्यम नृत्यातील नृत्त आणि अभिनयाचा समतोल ,रती ,वात्सल्य आणि भक्ती या तिन्ही भावनांचा परिपोष या तत्त्वांचा विचार करून मार्गम मध्ये विविध नृत्य रचनांचा समावेश केलेला असतो.

'मार्गम ' ही संकल्पना १८ व्या शतकात तंजावूर बंधू नावाने प्रसिद्ध असलेल्या चेन्नया,पोनैया,शिवानंद आणि वडिवेल्ल बंधूंनी निर्माण केली. मराठी राजे सरफोजीराजे भोसले यांच्या दरबारातील हे बंधू नृत्य संरचनाकार आणि वाग्येकार होते.त्यांनी नृत्याला एक आकृतीबंध दिला. नियम घालून दिले आणि दासीअट्टम किंवा सदीरअट्टम हे नाव बदलून भरतनाट्यम हे नाव दिले.

मार्गम मध्ये सुरुवातीला शुद्ध नर्तनाच्या रचना केल्या जातात. त्यानंतर नृत्तामध्ये सुरांचा,शब्दांचा समावेश होत जातो.पारंपारिक पद्धतीनुसार नर्तकी सुरुवातीला नमस्कार करते. पुष्पांजलीतून देवतांना आणि रंगमंचावर फुले अर्पण करण्याचा प्रघातही आहे. त्यानंतर क्रमाने येणाऱ्या रचना या प्रमाणे-

अलारिपु

संपादन

अलारू या तमिळ शब्दाचा अर्थ आहे उमलणे.फूलजसे हळूहळू पाकळीने उमलत जाते त्याच प्रमाणे डोळे ,भुवया,मान,खांदे ,हात आणि पायांच्या नाजूक हालचालीतून हे नृत्त फुलत जाते.एकाच बोलावर विलंबित,मध्य आणि द्रुत लयीत हस्तक्रिया आणि पदन्यास केले जातात.त्यामुळे पुढील नृत्यासाठी स्फूर्ती मिळते.प्रथम अंजली हस्त शिरोभागी,कपाळवर आणि मग उरोभागी ठेवून नर्तकी नटराज,गुरू ,साथीदार ,रंगमंच आणि रसिकांना वंदन करते.तिश्र,चतुश्र,खंड,मिश्र आणि संकीर्ण जातींमध्ये अलारिपु केला जातो.कधीकधी तालातील कौशल्य दाखवण्यासाठी पंचजाती अलारिपु करतात.

जतिस्वरम

संपादन

मार्गम मधील दुसरी रचना.या शुद्ध नर्तनाच्या रचनेत स्वरांचा समावेश होतो. विशिष्ट रागाच्या स्वरावलींवर पल्लवीची ओळ गायली जाते.सुरुवातीला शोल्ल(नृत्ताचे बोल) असलेला एक तिरमाणम केला जातो.मग पल्लवीच्या ओळींवर विविध जातीमध्ये नृत्त केले जाते.जणू काही नर्तकी उभ्या आडव्या हस्तरेषा आणि पदन्यासातून स्वरांचे आकृतीबंध रेखाटते.पल्लवी नंतर,अनुपल्लवी आणि एक किंवा दोन चरण स्वर येतात. यात भावनांची अभिव्यक्ती नसते तर जतिस्वरमचा उद्देश, केवळ कलात्मक आनंदासाठी वेगवेगळ्या सुंदर स्वरूपाची रचना करणे हा आहे.

शब्दम

संपादन

इथे मार्गम मध्ये शब्द आणि साहित्याचा समावेश होतो.हा एक भावगीतासारखा प्रकार असून परंपरागत शब्दम बहुदा देवदेवतांच्या शृंगारिक लीलांवर आधारित असतात. या साठीचे काव्य साधे सोपे असते.तीन चार कडव्यांच्या काव्यात देवतेच्या लीलांचे वर्णन असते.मध्ये मध्ये जातीयुक्त कोरवाई रचनेचे सौंदर्य वाढवतात. काव्याच्या ओळींवर एखादा प्रसंग खुलवून नाचला जातो. कृष्णाच्या जीवनावर आधारित काम्बोजी रागातील शब्दम प्रसिद्ध आहेत.बहुतेक शब्दम मिश्र चापू तालात असतात आणि त्यांचा शेवट गिणतोम या पाटाक्षरांनी होतो.

वर्णम

संपादन

चौथ्या क्रमांकाची ही रचना भरतनाट्यम नृत्याचा मानबिंदू समजली जाते.या रचनेत नृत्त आणि अभिनयाचा समतोल साधलेला असतो.याची सुरुवात पल्लवीच्या ओळीवर आघात करून करतात.त्यानंतर त्रिकाल तिरमाणम केला जातो.पल्लवी आणि अनुपल्लवीच्या ओळीवर संचारीमधून प्रसंग फुलवला जातो. प्रत्येक ओळीनंतर तिरमाणम केला जातो.चिट्टस्वर करून पहिला भाग संपतो.द्रुत गतीने होणाऱ्या दुसऱ्या भागात पहिला चरण फक्त साहित्याचा असतो,याला यत्तकडै म्हणतात.यानंतर तीन किंवा चार चरण स्वर आणि साहित्य असते आणि पुन्हा शेवटी पल्लवीच्या ओळीवर वर्णम संपतो.नर्तकीच्या तंत्रशुद्धता,ताल ज्ञान आणि अभिनय कुशलतेचा कस पाहणारी वर्णम ही रचना कार्यक्रमाचा कळस गाठते.

ताल लयीतील शुद्ध नर्तन कितीही स्फूर्तीदायक असलं तरी भावनांचा परिपोष करण्यासाठी साहित्याची अभिव्यक्ती आवश्यकच असते.दोन किंवा तीन पदांच्या माध्यमातून रती,वात्सल्य आणि भक्ती या प्रेमाच्या विविध छटांचे दर्शन घडवले जाते.यात सर्व भावभावनांचा आविष्कार अभिनयातून साकार केला जातो. राग आणि तालाची योग्य निवड त्यासाठी केलेली असते.भरतमुनींनी त्यांच्या नाट्यशास्त्र या ग्रंथात अभिनयाचे चार प्रकार सांगितले आहेत.त्यातील आंगिक अभिनयातून पदरचना उलगडली जाते.

तिल्लाना

संपादन

तिल्लाना ही आनंदाची अभिव्यक्ती असणारी शुद्ध नर्तनाची रचना आहे.हिंदुस्तानी संगीतातील तराणा सदृश या रचनेत तनोम,तदारेदाने,दिराना असे नोमतोमचे बोल असतात.पल्लवी.अनुपल्लवी,साहित्य आणि चरण अशी मांडणी असते.सुरुवातीला दृष्टीचे विभ्रम दाखवून मेय अडवू केले जातात. पल्लवीच्या ओळींवर विविध जातीच्या कोरवया कुशलतेने रचलेल्या असतात.शेवटी पेरी अडवूने तिहाई घेऊन सांगता केली जाते. तिल्लाना हा नृत्ताचा मापदंड मानला जातो.

मंगलम

संपादन

नृत्य प्रयोगाच्या शेवटी देवाचे, गुरूंचे, साथीदारांचे आणि रसिकांचे आभार मानून काही चूक झाल्यास क्षमा मागून सर्वांचे मंगल होऊ दे अशी प्रार्थना करण्याची पद्धत आहे. कुशल कलाकराद्वारे या विशिष्ट मार्गमनुसार रचना सादर केल्याने रसनिर्मितीचा मूळ उद्देश सफल झाल्याचा प्रत्यय येतो.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ नृत्यात्मिका -सुचेता भिडे चापेकर
  2. ^ तंजावूर नृत्य प्रबंध - श्री.पार्वतीकुमार