महाश्वेता (मराठी कादंबरी)

(महाश्वेता या पानावरून पुनर्निर्देशित)

महाश्वेता ही डॉ. सुमती क्षेत्रमाडे यांनी लिहिलेली मराठी कादंबरी आहे.[१]

विषयवस्तू संपादन

कोड या त्वचारोगामुळे नवऱ्याकडून नाकारल्या गेलेल्या स्रीच्या जीवनाची गोष्ट या कादंबरीत मांडली आहे.

कथावतू संपादन

सुधा ही या कादंबरीतील प्रमुख पात्र आणि नायिका आहे. पेशाने शिक्षक असलेल्या वडिलांच्या कुटुंबातील ती मोठी मुलगी आहे. सनातनी वळणाच्या परंतु इनामदार असलेल्या शिरवळ येथील देशपांडे कुटुंबातील माधव हा धाकटा मुलगा रूपवान असलेल्या सुधाच्या सौंदर्यावर भाळतो. माधवच्या कुटुंबियांना मान्य नसताना माधव सुधाशी विवाह करण्याचे ठरवितो . इनामदार कुटुंबातील सर्व निर्णय माधवची धाकटी काकू घेत असते. संपूर्ण घरावर तिची सत्ता असते . माधवसाठी आपली भाची लग्न करून आणावी असे तिच्या मनात असते . माधव सुधाशी लग्न करायच्या निर्णयावर ठाम राहतो .माधवच्या या हट्टामुळे काकुला हा विवाह स्वीकारावा लागतो . माधव इनामदार कुटुंबातील असला तरीही त्याचे घरच्या व्यवहारात मन रमत नसते. तो शेतीतील बी- बियाणे यांच्या प्रयोगात रमलेला असतो. कलेची त्याला आवड असते.तो सौंदर्याचा विशेष भोक्ता असतो.कुरूपता त्याला सहन होणारी नसते. शिपुरली येथील धनगोंडा पाटील हे त्याला यासाठी कायम प्रोत्साहन देत असतात. लग्नाला दोन वर्ष झाल्यानंतर एके रात्री माधवला सुधाच्या अंगावरील कोडाचा डाग दिसतो. तो त्याबद्दल तिला उपेक्षित वागणूक देत तिने त्याला फसविले आहे असे म्हणतो. यामुळे दुःखी झालेल्या सुधाला पुढील संकटाची कल्पना येते . माधव तिचा सहानुभूतीने विचार करण्यापेक्षा माधव घरात सर्वांना ही गोष्ट सांगतो . घरातील धार्मिक कर्मठ वातावरण असल्याने माधवची काकू सुधाला दोषी ठरविते आणि तिला माहेरी पाठवली जाते.
या सर्व प्रकाराने भांबावलेला आणि माधव मुंबईत जातो. तिथे त्याची भेट योगायोगाने त्याचा मित्र पंडित यांच्याशी होते .पंडित हा चित्रकार असतो आणि चित्रपट सृष्टीतील महिलांशी त्याचा संपर्क असतो. पंडितच्या संपर्कांतील महिलांशी सौंदर्य भोक्ता असलेला माधवसुद्धा संपर्क वाढवितो . त्याच्या आयुष्याला वेगळे वळण मिळते. सुधा आपल्या माहेरी राहून नवस, देवाची पूजा करीत आपला संसार सुरू होण्याची वाट पाहत असते . तिची मोठी मावशी अनेक वर्षांनी तिच्या आईकडे रहायला येते. आर्थिकदृष्ट्या संपन्न मावशी आणि तिचे यजमान तीर्थयात्रा करायला जाणार असतात सुधाची आई तिला त्यांच्याबरोबर पाठवते. दिल्ली येथे सुधाला त्वचारोग निष्णात डॉक्टरांना दाखविले जाते पण ते आता हा रोग बरा होण्याची शक्यता नसल्याचे सांगतात .
हरिद्वार येथे पोहोचल्यावर सुधा आजारी पडते .तेथे ती अचानक आजारी पडते त्यावेळी तिच्या धर्मशाळेच्या समोर असलेल्या राम मंदिरातील माताजी तिची काळजी घेतात . दुःखाने व्यथित सुधा त्यांच्या प्रेमाने भारावून जाते आणि कमला असे नाव घेऊन त्यांच्यासह मंदिरात रहायचे ठरवते . तिच्या माहेरी तिचा पत्राद्वारे संपर्क सुरू असतो . या मंदिरात एक दिवस अचानक एक स्वामीजी त्यांनी सांभाळलेल्या अनाथ मुलांसह येतात. सुधा त्या मुलांचा आईप्रमाणे सांभाळ करते. दानशूर व्यापारी कुटूंबाकडून आर्थिक मदत मिळाल्याने या अनाथ मुलांसाठी एक आश्रम सुरू केला जातो आणि त्याची पूर्ण जबाबदारी स्वामीजी आणि सुधा घेतात. कालांतराने स्वामीजी आणि सुधा यांच्यात आत्मीयता वाढू लागते. या दरम्यान माधवचा चित्रकार मित्र पंडित या परिसरात येतो आणि अत्यवस्थ होतो. सुधाच्या आश्रमात त्याला आणले जाते आणि तिथेच त्याला बरंही वाटू लागतं. सौंदर्यासक्त पंडित देखील कोड आलेल्या सुधाच्या मनाच्या सौंदर्याने भारावला जातो. मुंबईत परतल्यावर तो माधवला एका स्रीबद्दल म्हणजेच सुधाबद्दल सांगतो पण माधव किंवा पंडित यांना कल्पना नसते की ती स्री म्हणजे माधवची पत्नी सुधाच आहे. मुंबईच्या गलक्यात कंटाळलेला माधव घरी परत येतो. त्याच्या काकूने आता त्याचा विवाह तिच्या भाचीशी करण्याचा खटाटोप सुरू केलेला असतो. पण याकाळात दिवाळीसाठी पंडित माधवसह त्याच्या घरी येतो.

कथेतील अनपेक्षित वळण संपादन

पंडित आणि माधव घरी येतात त्यिवेळी माधवच्या काकू घरी नसतात. त्या चार दिवसांनी घरी आल्यानंतर माधव पंडितला त्यांची ओळख करून देण्यासाठी नेतो.त्यावेळी पंडितला पाहिल्यावर काकूंना अचानक चक्कर येते आणि त्या अस्वस्थ होतात. याचे कारण असे असते की पंडितचा चेहरा त्याच्या वडिलांच्या चेहऱ्याशी अगदी मिळताजुळता असतो. पंडितचे वडील आणि काकू हे आधीचे प्रियकर प्रेयसी असतात. पंडितच्या वडिलांपासून काकूंना झालेला मुलगा म्हणजेच हा पंडित असतो. पंडितने लहानपणापासून त्याच्या आईला पाहिलेलेच नसते याचे कारण कुमारी माता म्हणून पडितला जन्म दिल्यानंतर त्याच्या वडिलांशी काकू संबंध तोडते आणि शिरवळच्या श्रीमंत कुटूंबातील मुलाशी लग्न करते.हे कळल्यानंतर माधव अस्वस्थ होतो. धर्मपरायण आणि सदाचरणी असल्याचे भासवत अनेक वर्षे काकूने घरावर आपली सत्ता अबाधित ठेवलेली असते. सुधाच्या अंगावरील कोड हे सुद्धा धर्माचे कारण देऊनच काकूने नाकारलेले असते आणि कोडी मुलगी धर्मपरायण कुटूंबात नको असे सांगून माधवचे वैवाहिक जीवन तिनेच उध्वस्त केलेले असते.परंतु पडितच्या निमित्ताने माधवला आणि संपूर्ण कुटुंबालाच काकूंचा खोटेपणा समजतो.

कथेचा शेवट संपादन

आपल्या पत्नीचा शोध घेण्यास उत्सुक माधव तिच्या माहेरी पोहोचतो. पण तिथे कुणीही राहत नसते. सुधा हरिद्वार येथे एका आश्रमात असल्याचे त्याला शेजारच्या काकू सांगतात. पंडितला भेटलेली कुष्टी महिला म्हणजे सुधाच असणार असे वाटून तो तिला भेटण्यासाठी हरिद्वारला पोहोचतो. आश्रमाचा शोध घेत अनपेक्षितपणे माधव पोहोचलेला पाहून सुधाला धक्का बसतो. दरम्यान स्वामीजी आणि सुधा यांची जवळीक वाढू लागलेली असते आणि ते दोघे सहजीवन स्वीकारून आश्रमाची देखभाल करणार असे चित्र दिसत असताना माधव तिथे येतो. माधवच्या तिथल्या निवासकाळात तो सुधाची क्षमा मागतो. सुधा या नव्या बदलाला स्विकारायला तयार नसते. या सगळ्या प्रसंगाने मानसिक दुःखाने व्यथित स्वामीजी आश्रम सोडून निघून जातात.आणि शेवटी माधव आणि कोडाने संपूर्ण शरीर पांढरे झालेली सुधा यांचे सहजीवन पून्हा सुरू होते.

दूरदर्शन मालिका संपादन

१९९८-९९साली दूरचित्रवाहिनीवर या कथेवर आधारित मालिका महाश्वेता या नावाने प्रसारित झाली. ऐश्वर्या नारकर(सुधा),अविनाश नारकर(माधव) आणि आशालता( काकू) यांच्या यामधे प्रमुख भूमिका आहेत.

संदर्भ संपादन

  1. ^ क्षेत्रमाडे, सुमति (२०१३). महाश्वेता. कोल्हापूर: रिया पब्लिकेशन.