महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा

मराठीभाषी प्रदेशात हिंदीचा प्रचार करण्याच्या उद्देशाने व महात्मा गांधींच्या प्रेरणेने आचार्य काका कालेलकरांच्या अध्यक्षतेखाली २२ मे १९३७ रोजी पुणे शहरात, महाराष्ट्रातील विधायक कार्यकर्ते, राजकीय आणि सांस्कृतिक नेते वगैरेंचे एक संमेलन भरले होते. या संमेलनाद्वारे ’महाराष्ट्र हिंदी प्रचार समिती’ या नावाने एक संघटना बनवली गेली. पहिली आठ वर्षे ही समिती वर्ध्याच्या राष्ट्रभाषा प्रचार समितीशी संलग्न होती. वर्ध्याच्या समितीचे ’हिंदी भाषेत अरबी आणि फार्शी शब्दांचा वापर असावा’ हे धोरण ’महाराष्ट्र हिंदी प्रचार समिती’ला मान्य नव्हते, म्हणून त्यांनी त्यांच्या संघटनेचे वर्धा समितीशी असलेले संबंध तोडून, १२ ऑक्टोबर १९४५ या दिवशी महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेची स्थापना केली. अशा प्रकारे हिंदीचा प्रसार करण्यासाठी न.वि.गाडगीळ, मामा देवगिरीकर आदी नेत्यांकडून महाराष्ट्रात एका स्वतंत्र संस्थेची निर्मिती झाली.

महाराष्ट्र भाषा सभा' ही भारतातील प्रमुख स्वयंसेवी हिंदी प्रचार संस्थांमध्ये अग्रगण्य आहे. संस्थेची स्वतःची इमारत, छापखाना, ग्रंथालय आणि अध्यापन मंदिर आहे. महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेतर्फे प्रबोध, प्रवीण, पंडित आणि प्राज्ञ या हिंदीच्या परीक्षा घेतल्या जातात. या अनुक्रमे एस्‌एस्‌सी, बारावी, बी.ए. आणि एम.ए. या परीक्षांच्या दर्जाच्या समजल्या जातात.

महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेने दोनशेहून अधिक पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यांतली मुख्य पुस्तके हिंदी पुस्तकांचे मराठी आणि मराठी पुस्तकांचे हिंदी अनुवाद आहेत. सभेने प्रकाशित केलेले प्रमुख ग्रंथ :

  • कवीन्द्र चन्द्रिका
  • जगनामा
  • पर्वताख्यान
  • फूलबन
  • बृहद् हिंदी मराठी शब्दकोश

मासिक पत्रिका संपादन

महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेतर्फे प्रकाशित पत्रिका : राष्ट्रवाणी (मासिक ), संपादक : प्रा.सु.मो.शाह.

पत्ता संपादन

महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणे, ३८७, नारायण पेठ, पुणे-४११०३० (महाराष्ट्र )