महाराष्ट्रीय कलोपासक (नाट्यसंस्था)

(महाराष्ट्रीय कलोपासक या पानावरून पुनर्निर्देशित)

महाराष्ट्रीय कलोपासक या संस्थेची स्थापना पुणे शहरातील नूतन मराठी विद्यालय या शाळेच्या शिक्षकांनी केली. या शाळेतील शिक्षक संध्याकाळच्या वेळी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका फरसबंद पारावर बसून, नुकत्याच पाहिलेल्या नाटकांवर टीका-टिप्पणी करीत बसायचे. पुण्यातील सर्वकालिक विद्वान गृहस्थ आणि इतिहासकार महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांनी एकदा पाराजवळून जाता जाता शिक्षकांच्या गप्पा ऐकल्या. ते म्हणाले, ’दुसऱ्यांच्या नाटकांवर एवढी टीका करण्यापेक्षा तुम्हीच एखादे निर्दोष नाटक बसवून आणि करून का दाखवत नाही?’ त्या शिक्षकांनी ही सूचना खरोखरच मनावर घेतली आणि ३ ऑगस्ट १९३६ रोजी महाराष्ट्रीय कलोपासक ही हौशी आणि प्रायोगिक नाट्यसंस्था सुरू केली. दत्तो वामन पोतदार या संस्थेचे पहिले अध्यक्ष झाले.

सुरुवातीच्या काळात संस्थेने आंतरशालेय नाटयवाचन स्पर्धा सुरू केली, आणि शिवाय काही नव्या-जुन्या नाटकांचे प्रयोग रंगमंचावर सादर करण्यास आरंभ केला. पुढे महाराष्ट्र सरकारने आंतरशालेय नाटय स्पर्धा चालू केल्यानंतर ‘महाराष्ट्रीय कलोपासक‘ने ही नाट्यवाचन स्पर्धा बंद केली.

महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेचे चिटणीस पुरुषोत्तम रामचंद्र ऊर्फ अप्पासाहेब वझे(पु.रा.वझे) यांचे १ ऑगस्ट १९६२ रोजी निधन झाले त्यांच्या स्मरणार्थ इ.स.१९६३पासून संस्थेने आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा चालू केल्या आणि त्या स्पर्धांमधून विजयी होणाऱ्या संघाच्या कॉलेजला पुरस्कार म्हणून, पुरुषोत्तम करंडक देण्यास सुरुवात केली.


हे सुद्धा पहा संपादन