महादेवशास्त्री गोविंद कोल्हटकर

महादेवशास्त्री गोविंद कोल्हटकर हे एक मराठी ग्रंथकार आणि प्रभावी वक्ते होते. सातारा जिल्ह्यातील वाई येथे जन्म. शिक्षण वाई, पुणेमुंबई येथे. सरकारी शिक्षणखात्यात त्यांनी अधिकारपदांवर कामे केली. इंग्रजी, मराठी, संस्कृत, ज्योतिष आणि व्याकरण या विषयांचा त्यांचा अभ्यास चांगला होता. शेक्सपिअरच्या ऑथेल्लोचे त्यांनी केलेले भाषांतर त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध होऊन मान्यता पावले (१८६७). इंग्रजी नाटकाचा मराठीतील हा पहिलाच अनुवाद. याशिवाय शिक्षणखात्यासाठी कोलंबसाचा वृत्तांत हे अनुवादित पुस्तकही त्यांनी प्रसिद्ध केले (१८४९) व काही शालोपयोगी कवितांची भाषांतरे-रूपांतरे (उदा., प्राकृत कवितेचे पहिले पुस्तक, १८६०) केली.