विकिपीडिया:मराठीत लिहिताना शुद्धलेखनाच्या आणि वाक्यरचनेच्या चुका का होतात?
(मराठीत लिहिताना शुद्धलेखनाच्या आणि वाक्यरचनेच्या चुका का होतात? या पानावरून पुनर्निर्देशित)
मराठीत लिहिताना शुद्धलेखनाच्या आणि वाक्यरचनेच्या चुका का होतात? याची कारणे अशी :-
- मराठी माणसे पुस्तके-वर्तमानपत्रे-नियतकालिके वाचताना त्यांतल्या शब्दांच्या ऱ्हस्व-दीर्घाकडे आणि वाक्यरचनेकडे दुर्लक्ष करतात.
- स्वत: एखादा मजकूर लिहिल्यानंतर तो परत वाचून पहात नाहीत.
- पाहिलाच तर त्यांत झालेल्या चुका दुरुस्त करीत नाहीत.
- लिहिलेले दुसऱ्याला समजतेय ना मग बस्स झाले, ही मराठी माणसाची प्रवृत्ती असते.
- मुळात शाळेत शिकताना मुलांना चांगले मराठी शिकवले जात नाही. ब्रिटिशांच्या काळात असे नव्हते. त्याकाळी मुलांना शिकवायला पंतोजी असत, त्यांच्या देखरेखेखाली चुकीचे मराठी लिहिताच येत नसे.
- हल्ली शाळेत 'शुद्धलेखन घालायची' पद्धत नाही.
- भारतातील (मराठी-गुजराती सोडून) त्यांच्या त्यांच्या भाषेतील लिखाण अचूक लिहितात. अगदी भोजपुरी मातृभाषा असलेला माणूसही हिंदी लिहिताना चुका करीत नाही.
- लिहिताना जर इंग्रजी शब्दांचे स्पेलिंग चुकत नाही, तर मराठी शब्दाचे लिखाण का सदोष असते? कारण शुद्धलेखन ही निव्वळ आवड किंवा गरज न राहता ती सवय असली पाहिजे, हे अंगात न भिनल्यामुळे..
मराठी लिहिताना हमखास होणाऱ्या चुका
संपादन- अस्सल मराठी शब्दांतल्या अंत्य आणि उपान्त्य शब्दातली मात्रा (इ-कार/उकार) दीर्घच असते, ती हमखास ऱ्हस्व (ऱ्हस्व म्हणजे पहिली मात्रा; काढली जाते. (अपवाद : आणि, नि, परंतु, तथापि, यद्यपि. या शब्दांतले अंत्याक्षर दीर्घ असते. कारण - पी म्हणजे पिणारा. मध्यपी म्हणजे दारू पिणारा; तथापी म्हणजे 'तसे' पिणारा! 'तथापि'मध्ये पिणारा हा अर्थ अपेक्षित नाही, म्हणून 'तथापि'तला 'पि' ऱ्हस्व..) त्यामुळेच मी, ही, तू, ऊ या एकाक्षरी शब्दांतला ई-कार/ऊ-कार दीर्घ असतो.
- तत्त्व, महत्त्व या शब्दांची फोड तत्+त्व, महत्+त्व अशी होते. दॊन त शेजारी आल्याने तत्त्व-महत्त्व-सत्त्वमध्ये त्त्व हे अक्षर येते.
- पुरुषत्व शब्दाची फोड पुरुष+त्व. 'त' एकदाच आला, म्हणून पुरुषत्वात त्त्व येत नाही. असेच ममत्व, शूरत्व, स्वत्व, कर्तृत्व, अंधत्व या शब्दांत त्त्व येत नाही.
- उपान्त्य शब्दांतली मात्रा दीर्घ म्हणून करीन, करून, माहीत, बसून, वगैरे. संस्कृत शब्दांना हा नियम लागू नाही. उदा० उपयोजित, गणित, त्वरित, पारंपरिक, भाषांतरित, सामाजिक, वगैरे.
- मराठीतला एक खास नियम - अस्सल मराठी शब्दांतल्या उपान्त्यपूर्व अक्षराची मात्रा ऱ्हस्वच असते. उदा० गरीब, परंतु गरिबाला. (यांतला रि उपान्त्यपूर्व अक्षर). रीत-रितीने (परंतु रीति-रीतीने), धाकधूक-धाकधुकीमुळे, दूध-दुधाची, वगैरे. हा नियम संस्कृत-इंग्रजी शब्दांना लागू नाही. उदा० स्वाधीन-स्वाधीनतेला, शरीर-शरीराचा, क्लोरीन-क्लोरीनमुळे, लीबिया-लीबियात, सल्फाईट-सल्फाईटपासून, वगैरे.
- चा-ची-चे-हून हे प्रत्यय आहेत, आणि पासून, मधून ही शब्दयोगी अव्यये आहेत. त्यांतले इ-कार/उ-कार दीर्घ असतात.