मराठीतील एकंदर कोशांची संख्या अदमासे हजाराच्या घरात जाईल. शब्दकोश, ज्ञानकोश/विश्वकोश, तत्त्वज्ञानकोश, चरित्रकोश, समाजविज्ञानकोश, तिथिकोश, संख्यासंकेतकोश, सुविचारकोश, ग्रंथसूची, जंत्री आणि शकावली, निदेशपुस्तके, निर्देशिका, वार्षिके व पंचांगे, भौगोलिक कोश-ग्रामसूची, गॅझेटियर्स असे कोशांचे निरनिराळे प्रकार मराठीत आढळतात.

शब्दकोश

संपादन

संख्येने सर्वाधिक, उपप्रकारांत सर्वाधिक आणि सर्वांच्या परिचयाचा कोशप्रकार म्हणजे शब्दकोश होय. मराठीतील निव्वळ शब्दकोशांची संख्या ४०० च्या घरात जाईल. मराठी भाषेत स्वातंत्र्यपूर्व काळात १३४ तर स्वातंत्र्योत्तर काळात २७० पेक्षा अधिक शब्दकोश निर्माण झाले.

मराठीतील पहिला शब्दकोश म्हणजे विल्यम कॅरे यांनी १८१० मध्ये प्रकाशित केलेला 'मराठी-इंग्रजी कोश' (अ डिक्शनरी ऑफ दी मऱ्हाटा लॅंग्वेज). हा कोश पंडित विद्यानाथ (वैजनाथ शर्मा) यांच्या मदतीने तयार केल्याचे प्रस्तावनेत म्हटले आहे. वैजनाथ शर्मा हे कलकत्त्याच्या फोर्ट विल्यम कॉलेजमधील मराठीचा प्रमुख पंडित होते. या कोशाची पृष्ठसंख्या ६५२ असून यात मराठी शब्द मोडी लिपीत व अर्थ इंग्लिश भाषेत दिला आहे.

दुसरा कोश लेफ्टनंट कर्नल व्हान्स केनेडी या लष्करी अधिकाऱ्याने मुंबई येथे इ. स. १८२४ मध्ये प्रसिद्ध केला. या कोशाचे दोन भाग असून पहिल्या भागात मराठी शब्दांना इंग्लिश प्रतिशब्द देऊन दुसऱ्या भागात इंग्लिश शब्दांचे मराठी अर्थ दिलेले आहेत. कोशातील शब्दसंख्या आठ हजारपर्यंत आहे.

वरील कोशांपेक्षा खूप मोठा आणि आजही पुनर्मुद्रणे होत असल्याने सहज उपलब्ध असलेला शब्दकोश म्हणजे मोल्सवर्थ-कॅंडी यांनी संपादित केलेली मराठी ॲन्ड इंग्लिश डिक्शनरी. हा कोश इ.स. १८५७मध्ये प्रकाशित झाला. अरबी-फार्सी-तुर्कीमधून आलेले शब्द देवनागरीबरोबर उर्दू लिपीतही लिहून दाखवले आहेत. हा चमत्कार यानंतर करायला कुणीही धजले नाही. या कोशाच्या ३०-पानी प्रस्तावनेत मराठी शब्दांच्या बनावटीबद्दल विद्वत्तापूर्ण भाष्य आहे. कोकणी, राजापुरी, वाडी जिल्ह्यातले शब्द, उत्तर महाराष्ट्रातले शब्द, पोर्तुगीज, अरबी, फारसी, तुर्की आणि हिंदुस्तानी शब्द वगैरे देताना हे शब्द कुठून आले ते सांगितले आहे. काही खास शब्दांबाबत त्यांचा वाक्यांतला आणि वाक्प्रचार-म्हणीतला वापर स्पष्ट केला आहे. या कोशात डेमी आकारातली ९२० पाने आहेत. शब्दांची जंत्री तीन स्तंभात असून कोठेही जागा वाया घालवलेली नाही. टंकाचा आकारही खूप लहान घेतला आहे. मराठी-इंग्रजी डिक्शनरीबरोबरच मोल्सवर्थने अर्धवट लिहून ठेवलेला इंग्रजी-मराठी कोशही कॅंडीने पूर्ण केला.

शब्दकोशांची विभागणी एकभाषिक, द्विभाषिक आणि बहुभाषिक अशी करता येते. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने उर्दू-मराठी (श्रीपाद जोशी, एन.एस. गोरेकर), कन्नड-मराठी (पुंडलिकजी कातगडे), गुजराती-मराठी (भाऊ धर्माधिकारी), पाली-मराठी (बाबा भारती), मराठी-कन्नड (गुरुनाथ दिवेकर), मराठी-गुजराती (भाऊ धर्माधिकारी), मराठी-सिंधी (लछमन हर्दवाणी), तमिळ-मराठी (रमाबाई जोशी, पु. दि. जोशी), मराठी-रशियन-जर्मन कोश (सुनंदा महाजन, अनघा भट, योगेंद्रकुमार) यांसारखे कोश प्रकाशित केले आहेत.

मराठी शब्दकोश

संपादन
 • मराठी शब्दरत्नाकर (मराठी शब्दांचा मराठी अर्थ देणारा कोश) लेखक कै. वासुदेव गोविंद आपटे संपादक-य.गो. जोशी, आनंद कार्यालय ३३ सदाशिव पेठ पुणे, लिपी-देवनागरी, चौथी आवृत्ती १९५६,शब्दसंख्या ८० हजार, वैशिष्टे-
 • १९४६पर्यंत १८ मराठी शब्द कोश झाले
 • युरोपियन लष्करी शब्दांची परिभाषा (गोविंदराव काळे-पेशव्यांचे वकील)
 • १८१० केरीचा शब्द कोश (१८१०)
 • के ते डी चा कोश (१८२४)
 • शास्त्राचा मराठी -मराठी शब्द कोश (१८२९)
 • रघुनाथ भास्कर गोडबोले यांचा हंस कोश (१८६३)
 • माधव चंद्रोबांचा संस्कृत शब्दरत्नाकर (१८७०)
 • संस्कृत- प्राकृत कोश (१८६७)
 • रखमाजी देवजी मुळेकृत हिंदुशास्त्रातील संख्याबोध-दुर्बोध
 • संक्षिप्त मराठी वाङ्मय कोश वाङ्मयीन संज्ञा आणि संकल्पना कोश (वसंत आबाजी डहाके)
 • शालेय मराठी शब्दकोश (वसंत आबाजी डहाके)

ज्ञानकोश/विश्वकोश

संपादन

श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी तयार केलेला 'ज्ञानकोश' ही मराठी कोशवाङ्मयातील अत्यंत महत्त्वाची, ऐतिहासिक स्वरूपाची अद्वितीय कामगिरी आहे. ज्ञानकोश याचा अर्थ सर्व विद्याशाखांतील माहितीचा पद्धतशीरपणाने केलेला संग्रह. तो इथे नेमकेपणी पाहायला मिळतो.

मराठीतील ज्ञानकोशांची संख्या आता शंभरच्या घरात गेली आहे. तीत मुलांचे ज्ञानकोश, सर्वसंग्राहक कोश, विषयज्ञानकोश अशी भरपूर विविधता आहे. हा ज्ञानकोश आंतरजालावर मोफत वाचता येतो.

स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली 'मराठी विश्वकोशा'ची निर्मिती सुरू केली. 'विश्वकोश' हा मराठी माणसाला जागतिक पातळीवरचे ज्ञान आत्मसात करायला मदत करणारा ज्ञानकोश आहे. माणसाच्या व्यक्तिमत्त्वविकासाशी, त्याच्या प्रगल्भतेशी साहित्याचा व संस्कृतीचा संबंध असतो याचे भान राखून विश्वकोशाची निर्मिती झाली आहे. १९७६मध्ये विश्वकोशाचा पहिला खंड प्रसिद्ध झाला. इ.स.२०१६मध्ये विसावा खंड पूर्ण होऊन विश्वकोशाची मूळ योजना मार्गी लागेल. हाही ज्ञानकोश आंतरजालावर पहाता येतो, आणि तो सीडीरूपातही विकत मिळतो.

संस्कृतिकोश

संपादन

महादेवशास्त्री जोशी यांनी १९६२ ते १९७९ या काळात दहा खंडांचा 'भारतीय संस्कृतिकोश' ही महत्त्वाची कोशनिर्मिती केली. संस्कृतीचे विविध घटक लक्षात घेऊन केलेल्या सुमारे बारा हजार नोंदी या कोशात आहेत. या कोशाप्रमाणेच दोन हजार पृष्ठांचा, चार खंडांतील मुलांचा संस्कृतिकोशही महादेवशास्त्रींनी निर्माण केला.

तत्त्वज्ञानकोश

संपादन
 • देवीदास दत्तात्रय वाडेकर यांचा त्रिखंडात्मक 'मराठी तत्त्वज्ञान महाकोश'
 • ह.श्री. शेणोलीकर यांचा 'मराठी संत-तत्त्वज्ञान संज्ञा कोश' (१९९४). हा कोश मध्य युगीन मराठी वाङ्मयाच्या आधारे लिहिलेला तत्त्वज्ञान संकल्पाना विषयक कोश आहे. या कोशासाठी इ.स. ११८८मध्ये प्रकाशित झालेल्या विवेकसिधूपासून ते इ.स. १७५० मधल्या सोहिरोनाथांच्या महद् अनुभवेश्वरी पर्यंतचे २० ग्रंथ, ९ साहाय्यक ग्रंथ, मराठी तत्त्वज्ञान महाकोश (संपादक प्रा. दे.द. वाडेकर) आदी पुस्तकांचा आधार घेतला आहे.
 • रघुनाथ भास्कर गोडबोले यांनी १८७६ मध्ये रचलेला 'भारतवर्षीय ऐतिहासिक कोश'
 • गं.दे. खानोलकररचित 'अर्वाचीन मराठी वाङ्मय सेवक' (भाग १ ते ७)
 • सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांचा 'भारतवर्षीय प्राचीन, मध्ययुगीन व अर्वाचीन चरित्रकोश' खंड १, २ व ३.
 • श्रीराम पांडुरंग कामत यांनी 'विश्वचरित्रकोशा'ची सहा खंडांत रचना केली आहे. या कोशात मानवी संस्कृतीच्या आरंभकाळापासून विसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंतच्या काळातील विविध देशांतील, विविध क्षेत्रांतील पायाभरणीचे कार्य करणाऱ्या जवळपास बारा हजार व्यक्तींच्या चरित्रांची नोंद आहे.
 • प्र.न. जोशी यांचा प्राचीन काळापासून अंतराळयुगापर्यंतच्या सुमारे २००० प्रमुख शास्त्रज्ञांचा, तंत्रज्ञांचा, संशोधकांचा नेटका परिचय करून देणारा ‘जागतिक शास्त्रज्ञकोश’.
 • बा.द. सातोस्कररचित 'गोमंतकीय मराठी साहित्याचे आधुनिक शिल्पकार' हा दोन खंडी कोश
 • सुहास कुळकर्णी व मिलिंद चंपानेरकर यांचा 'यांनी घडविले सहस्रक' (२००९)
 • अनंत जोशी यांचा द्विखंडात्मक 'मराठी सारस्वत' कोश.
 • भारत वर्षीय अर्वाचीन चरित्र कोश, लेखक -सिद्धेश्वरशास्त्री चित्राव, प्रकाशक - भारतीय चरित्र कोश मंडळ, आवृत्ती १९४६. वैशिष्ट्ये : कोणत्याही क्षेत्रात विशेष चमकलेल्या व्यक्तींची चरित्रे यात आहेत. अट्टल चोर मंगलदास गांधी ते रामकृष्ण परमहंसपर्यंत व जन्माने परकीय पण ज्यांनी भारत ही कर्मभूमी पत्करली त्यांचाही अंतर्भाव यात आहे. महाराष्ट्रीयांची अधिक चरित्रे यात आली आहे. १-६-१९२९ ते इ.स. १९४६ मिळून २२०० पृष्ठांत एकूण १९ हजार चरित्रे आली आहेत.
 • गे यांनी संपादित केलेला सहा-खंडी 'भारतीय समाजविज्ञान कोश'. या कोशात समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र हे तीन विषय व त्या विषयास पूरक अशा नोंदी आल्या आहेत.

समाजविज्ञानकोश

संपादन
 • स.मा. गर्गे यांनी संपादित केलेला सहा-खंडी 'भारतीय समाजविज्ञान कोश'. या कोशात समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र हे तीन विषय व त्या विषयास पूरक अशा नोंदी आल्या आहेत.
 • राजेंद्र व्होरा व सुहास पळशीकर यांनी निर्मिलेला राज्यशास्त्रातील संज्ञा-संकल्पनांचा, मतमतांतरांचा व राज्यशास्त्राच्या प्रगत अभ्यासाचा 'राज्यशास्त्र कोश'.