मराठवाड्यातील विस्थापितांचे साहित्य
`विस्थापन` ही संकल्पना व्यापक असल्यामुळे मराठी कादंबरी साहित्यात या संदर्भातील विविध प्रश्नांची चर्चा कमी अधिक प्रमाणात झालेली आहे. परंतु एकूण मराठी कादंबरी साहित्य प्रकारचा इतिहास पाहताना १९६० पूर्वी हा विषय केंद्रभूत मानून फारसे कादंबरी लेखन झालेले नाही. या विषयाच्या अनुषंगाने थोड्याफार प्रमाणात विस्थापितांचे जीवन कुठे कुठे आलेले दिसून येते. मात्र त्यांची संपूर्ण जीनानुभूती आविष्कृत करणारी कलाकृती विरळच आहे. यात प्रामुख्याने धरणग्रस्तांच्या प्रश्नाने या संकल्पनेला व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यानंतर मराठी कादंबरीने हा विषय केंद्रभूत मानून नवा आशय व विषय घेऊन एकूण साहित्य विश्वात आपली स्वतंत्र नाममुद्रा उमटविली. विस्थापितांचे भौगोलिक स्थान ,सांस्कृतिक जडण घडण ,समाजरचना,मातीशी जुळलेली घट्टनाळ आणि भावनिकबंध तोडून टाकताना होणारी घुसमट यांचे यथार्थ चित्रण मराठी कादंबरी साहित्य प्रकारातून आलेले आहे .दुष्काळ,धरण,प्रकल्प,देशाची फाळणी,भाषावार प्रांतरचना,धार्मिक व वांशिक छळवाद ,नैसर्गिक आपत्ती ,उदरनिर्वाहासाठी कायमचे किंव्हा अंशकालीन स्थलांतर इ कारणाने विस्थापित झालेले समाजसमूह आणि मुक्त अर्थ व्यवस्थेमुळे देशात येऊ घातलेल्या मोठमोठ्या प्रकल्पामुळे विस्थापित होऊ पाहणारी गावे ही कादंबरी लेखनाचे विषय झालेले आहेत.मात्र मराठी कादंबरीमध्ये प्रामुख्याने धरण्ग्रस्तांचेच विस्थापित्व अधिक लक्ष्य केलेले आढळते.धरण्ग्रस्ताशिवाय इतर कारणांमुळे निर्माण झालेल्या विस्थापित जीवनाचे चित्रण फारसे मराठी कादंबऱ्यामधून झालेले नाही. या भयावह समस्येकडे मराठवाड्यातील दोन-तीन कादंबरीकारांनी प्रामुख्याने लक्ष वेधले आहे.त्यात त्र्यंबक असरडोहकर ,सरदार जाधव,आणि जगदीश अभ्यंकर यांनी अनुक्रमे` काळी आई `कोयता` आणि `धरणग्रस्त` कादंबऱ्यामधून विस्थापितांचे चित्रण केले आहे .काळी आई मधून प्रकल्पासाठी जमिनी दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या हाती प्रचंड पैसा येतो.आणि त्या ठिकाणचा कष्टकरी ,शेतकरी व्यसनाधीनतेचा कसा बळी ठरतो.या पद्धतीचे चित्रण येते.तर कोयता या कादंबरीत उसतोडणी कामगारांची अवहेलना अभिव्यक्त होते.त्यात मुकादमाचा ऊसतोडणी महिला कामगारांकडे पाहण्याचा दृष्टीकोन किती वाईट असतो याचे दर्शन घडते.त्याचबरोबर धरणग्रस्त कलाकृती मधून मराठवाड्यातील पैठण तालुक्यातील बांधलेला पहिला `मातीचा` प्रकल्प म्हणून ओळखला जाणारा नाथसागर अर्थात जायकवाडी या प्रकल्पात एकूण चार तालुक्यातील साधारणपणे १०८ गावांचा समावेश होतो.जमिनी गेल्यानंतर त्या ठिकाणची संपूर्ण संस्कृती ,शेजार,गावगाडा उद्ध्वस्त होऊन जातो.त्यानंतर पाण्याच्या तुंबामुळे अनेक गावे पुन्हा संकटात सापडली जातात.त्यांना सरकारी पातळीवर धरणग्रस्त,पूरग्रस्त,प्रकल्पबाधित म्हणून गणले जात नाही.ही अवस्था अभिव्यक्त होते.हे नवीन आशय ,विषय घेऊन मराठवाड्यातील कादंबरीकारांनी कादंबरी लेखन केलेले आहे.त्यामुळे मराठवाड्यातील साहित्यिक नवीन काहीतरी करू पाहत आहे.याची नोंद घ्यावी लागते.