मधुसूदन कालेलकर

मराठी नाटककार कथाकार व कवी

मधुसूदन कालेलकर (जन्म : २२ मार्च १९२४; - वांद्रे, मुंबई, १७ डिसेंबर १९८५) हे साहित्यातील आणि चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज नाव. कालेलकरांचा जन्म २२ मार्च १९२४ रोजी झाला.  वेंगुर्ले येथे शालेय शिक्षण झाल्यावर ते मुंबईत आले.  सुरुवातीस ते गिरगावात रामचंद्र बिल्डिंग (आताचे सुंदर भवन)मध्ये राहण्यास आले.  तिथे गणेशोत्सवाचा निमित्ताने त्यांनी त्यांचे पहिले नाटक लिहिले आणि आपल्या लिखाणाचा श्रीगणेशा केला.  मग त्यांनी आपला निवास वांद्रे पश्चिममध्ये येवले भवन येथे हलवला. तेथे त्यांनी कित्येक वर्षे विपुल साहित्यसंपदा निर्मिली, आणि तदनंतर वांद्रे पूर्व येथील साहित्य सहवास वसाहतीत त्यांचे शेवटपर्यंत वास्तव्य राहिले.  ते मराठी नाटककार, कथाकार आणि कवी म्हणून प्रसिद्ध झालेच पण त्याचबरोबर मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत ते गीतकार आणि पटकथाकार म्हणूनही प्रथितयश झाले.  कालेलकरांनी एकूण २९ नाटके आणि मराठी व हिंदी मिळून १११ चित्रपटांसाठी लिखाण केले.  त्यात त्यांनी कौटुंबिक, गंभीर, विनोदी, सामाजिक असे अनेक विषय हाताळले आहेत.  त्यांचे काही प्रमुख हिंदी चित्रपट ‘बात एक रात की,’ ‘ब्लफ मास्टर,’ ‘झुमरू,’ ‘फरार,’ ‘दुल्हन वही जो पिया मन भाये,’ ‘अखियों के झरोखों से,’ ‘गीत गाता चल,’ इत्यादी होते.  त्यांनी चार नाटकांची निर्मिती केली.  अनेक नाटकांचे गुजराती भाषेत प्रयोग झाले आणि होत आहेत, तर तीन ते चार नाटकांवर हिंदी व मराठीत चित्रपटही झाले आहेत.

फिल्म फेअर १९७८चा सर्वोत्तम पटलेखनाचा पुरस्कार ‘दुल्हन वही जो पिया मन भाये’ या चित्रपटासाठी त्यांना देण्यात आला.  महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवात त्यांना एकूण नऊ वेळा सर्वोत्तम कथा, पटकथा व संवाद यांसाठी ‘आम्ही जातो आमुच्या गावा’ (१९६४/६५ – दुहेरी पुरस्कार), ‘पाहू रे किती वाट’ (१९६५/६६), ‘अपराध’ (१९६९/७०), ‘जावई विकत घेणे आहे’ (१९७३/७४), ‘अनोळखी’ (१९७४/७५), ‘गुपचूप गुपचूप’ (१९८३/८४), तसेच ‘बाळा गाऊ कशी अंगाई’ (१९७७/७८) या चित्रपटातील “निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई” या आजतागायत अंगाई म्हणून घरांघरांत सुपरिचित असलेल्या गीतासाठी सर्वोत्कृष्ट गीत लेखनाचे पारितोषिक देण्यात आले. त्यांच्या ‘अपराध मीच केला,’ ‘सागरा प्राण तळमळला’ व ‘शिकार’ ह्या नाटकांना महाराष्ट्र शासनाचे सर्वोत्कृष्ट साहित्यिक कलाकृतीचे पारितोषिक मिळाले.  “हा माझा मार्ग एकला” या त्यांनी लिहिलेल्या चित्रपटाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे.  ह्या व्यतिरिक्त त्यांना तीन वेळा रसरंग फाळके गौरवचिन्ह पुरस्कार देण्यात आला.  गदिमा प्रतिष्ठानतर्फे उत्कृष्ट लेखक म्हणून खास गौरव व परितोषकाने सन्मानित करण्यात आले. गुजरात सरकारने त्यांच्या कथेवर निर्माण झालेल्या ‘जन्मदाता’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट कथेचे पारितोषिक देऊन त्यांना मरणोत्तर पुरस्कृत केले.  दिनांक १७ डिसेंबर १९८५ रोजी त्यांचे साहित्य सहवासातील राहत्या घरी निधन झाले.

मधुसूदन कालेलकर यांची पुस्तके

संपादन
  • नाते युगायुगाचे (नाटक)
  • पेइंग गेस्ट (नाटक)
  • मधुघट (व्यक्तिचित्रणे)

मधुसूदन कालेलकार यांच्यावरील, त्यांच्या काव्यावरील आणि एकूण कारकिर्दीवरील पुस्तक

संपादन