मंडी हाऊस हे दिल्लीच्या मध्यभागात असलेले एक प्रमुख सांस्कृतिक आणि नाट्य केंद्र आहे. हे ठिकाण भारताच्या सांस्कृतिक जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे, जिथे नाटक, नृत्य, संगीत, साहित्य, आणि इतर विविध कलाप्रकारांचे प्रदर्शन होते. मंडी हाऊस हा परिसर अनेक प्रतिष्ठित नाट्यगृहं, सांस्कृतिक संस्थां, आणि कला केंद्रांनी सजलेला आहे. यामुळे दिल्लीतील हे ठिकाण कलाकार, विद्यार्थी, आणि कलाप्रेमी यांच्यासाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे.

इतिहास[]

मंडी हाऊसचा इतिहास ब्रिटिश कालखंडापासून सुरू होतो. हे नाव 'मंडी हाऊस' एका ऐतिहासिक इमारतीवरून पडले आहे, जी मंडीच्या राजघराण्याची होती. १९४० च्या दशकात, मंडी राज्याचे १८ वे राजा, राजा सर जोगिंदर सेन बहादूर यांनी त्यांचे निवासस्थान, जे आता हिमाचल भवनच्या शेजारी आहे, बांधले. ही मालमत्ता नंतर १९७० मध्ये विकली गेली आणि विभागली गेली. १९९० च्या दशकात, या परिसरात मोठ्या, आधुनिक कार्यालयांची बांधणी सुरू झाली, ज्यामुळे जुना राजवाडा पाडण्यात आला. हिमाचल प्रदेशचे राज्य घर, हिमाचल भवन, आता येथे स्थित आहे. राष्ट्रीय दूरदर्शन प्रसारक दूरदर्शनचे मुख्यालय,[] दूरदर्शन भवन, देखील येथे आहे. आज ऑफिस कॉम्प्लेक्सच्या नावाने जुन्या राजेशाही निवासस्थानाची तसेच मंडी हाऊस मेट्रो स्टेशनची आठवण होते. आजूबाजूचा मोठा परिसर अजूनही मंडी हाऊस म्हणून ओळखला जातो.

मुख्य सांस्कृतिक संस्था

  1. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD): नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा हे भारतातील एक प्रतिष्ठित नाट्य शिक्षण संस्था आहे, जिथे देशातील सर्वोत्तम नाट्य कलाकार तयार केले जातात. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मुळे मंडी हाऊसला देशातील नाट्यकलेच्या पंढरीचे महत्त्व प्राप्त झाले आहे.[]
  2. श्रीराम सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स: श्रीराम सेंटर हे दिल्लीतील आणखी एक प्रमुख नाट्यगृह आहे. येथे दरवर्षी अनेक नाटकं, नृत्य कार्यक्रम, आणि संगीताचे कार्यक्रम आयोजित केले जातात.[]
  3. साहित्य कला परिषद: साहित्य कला परिषदेचे कार्यालय देखील मंडी हाऊस परिसरात आहे. या संस्थेमार्फत साहित्य, कला, आणि संगीताच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

कार्यक्रम आणि उत्सव

मंडी हाऊस परिसरात वर्षभर विविध सांस्कृतिक आणि नाट्य महोत्सव आयोजित केले जातात. या महोत्सवांमध्ये अनेक नामांकित कलाकार आणि नाट्यसंस्था सहभागी होतात. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा द्वारा आयोजित 'भारत रंग महोत्सव' हा सर्वात प्रसिद्ध नाट्य महोत्सव असून, यात देशभरातील आणि आंतरराष्ट्रीय नाट्य संस्थांचे नाटक सादर केले जातात.

संस्कृतीचा केंद्रबिंदू

मंडी हाऊस हे दिल्लीतील आणि संपूर्ण भारतातील कलाकारांसाठी एक प्रेरणास्थान आहे. येथे येणारे विद्यार्थी आणि कलाकार विविध कलांमध्ये प्राविण्य मिळवण्यासाठी या ठिकाणी येतात. मंडी हाऊस परिसरातील संस्थांमुळे दिल्लीच्या सांस्कृतिक जीवनाला नवा आयाम प्राप्त झाला आहे. मंडी हाऊस हे दिल्लीचे सांस्कृतिक हृदय आहे. या ठिकाणाच्या माध्यमातून भारतीय कला, संस्कृती, आणि नाट्यकलेला एक नवा ओळख मिळाला आहे.

संदर्भ

  1. ^ https://archive.org/details/in.ernet.dli.2015.211481/page/n43/mode/2up?q=
  2. ^ https://prasarbharati.gov.in/doordarshan/
  3. ^ https://nsd.gov.in/delhi/
  4. ^ https://www.srcpa.in/