भोकराची भाजी
भोकराच्या पानांची भाजी -
साहित्य - भोकराची कोवळी पाने, भिजवलेली मूगडाळ, हिरव्या मिरच्या, कांदा, तेल, हळद, मीठ इत्यादी. कृती - भोकराची कोवळी पाने निवडून, स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावीत. पानांचे देठ काढून टाकावेत व पाने बारीक चिरून घ्यावीत. तेलात चिरलेला कांदा व मिरच्या परतून तांबूस होईपर्यंत तळून-भाजून घ्यावे. नंतर चिरलेली भाजी व भिजवलेली मूगडाळ घालावी. नंतर हळद, मीठ घालून सर्व भाजी चांगली परतून घेऊन अगदी थोडे पाणी घालून शिजवून घ्यावी.
भोकराच्या फळांची भाजी
साहित्य - भोकरीची हिरवी कच्ची फळे, तीळ, खसखस, ओले खोबरे, आले, लसूण, तेल, तिखट, मीठ, हळद, कांदा इत्यादी. कृती - भोकराची कोवळी फळे धुऊन चिरावीत. बिया काढून टाकाव्यात व परत फळे चिरून घ्यावीत. तीळ, खसखस थोडे भाजावेत. ओले खोबरे किसून घ्यावे. नंतर तीळ, खसखस, खोबरे, लसूण, आले मिक्सरमध्ये बारीक करून ओला मसाला तयार करावा. तेलात चिरलेला कांदा भाजून घ्यावा व त्यात चिरलेली फळे घालावीत. हळद, तिखट, मीठ घालून भाजी परतून घ्यावी व नंतर ओला मसाला घालून परतावी. नंतर भाजी शिजवून घ्यावी.