भूपाळी
भूपाळी हा मराठी पारंपरिक संगीतप्रकार आहे. देवाला पहाटे जागे करण्यासाठी भूपाळी गाण्याची महाराष्ट्रात सांस्कृतिक परंपरा आहे. सहसा भुपाळ्या भूप रागात बांधलेल्या असतात. रात्रीचा अंतिम प्रहर व दिवसाचा पहिला प्रहर या दरम्यानच्या काळामध्ये सृष्टी निर्माता पालनकर्त्याला भूप रागामध्ये पद्य स्वरूपातील स्तुतीची आळवणी करून जगविले जाते त्याला भूपाळी असे म्हणतात.पेशवाई मध्ये नामांकित कवींनी रचलेल्या रचना प्रसिद्धच आहेत त्यापैकीच "घनश्याम सुंदरा..." ही होनाजी बाळाची भूपाळी सर्वांनाच माहित आहे त्यांचेच समकालीन शाहीर सगनभाऊ यांची श्रीखंडेरायावर अपार श्रद्धा आणि या श्रद्धेतूनच त्यांनी हिंदुस्थानातील पवित्र तीर्थक्षेत्र व देव देवतांना आपल्या काव्यामध्ये गुंफले, हीच रचना खंडेरायाच्या भूपाळी मध्ये म्हंटली जाते.श्रीक्षेत्र जेजुरी येथील मंदिरांमध्ये रोज पहाटे भूपाळी म्हंटली जाते,या भूपाळीतील पदे वेगवेगळ्या कालावधीत( १८व्या / १९व्या शतकात ) वेगवेगळ्या कवींनी (शाहीर सगनभाऊ, बापू वाघ्या, रामभाऊ, हरिभाऊ, नामा परीट इ.) रचलेली आहेत
गणपतीची भूपाळी
संपादनउठा उठा सकळीक | वाचे स्मरावा गजमुख |
ऋद्धी-सिद्धीचा नायक | सुखदायक भक्तांशी | सुखदायक दासांसी || धृ ||
अंगी शेंदुराची उटी | माथा शोभतसे किरीटी |
केशर कस्तुरी लल्लाटी | हार कंठी साजिरा || १ ||
कानी कुंडलांची प्रभा | चंद्र-सूर्य जैसे नभा
माजी नागबंदी शोभा | स्मरता उभा जवळी तो || २ ||
कांसे पीतांबराची घटी | हाती मोदकांची वाटी |
रामानंद स्मरता कंठी | तो संकटी पावतो || ३ ||
श्रीकृष्णाची भूपाळी
संपादनउठी गोपाळजी! जाई धेनूकडे | पाहती सौंगडे वाट तूझी || धृ ||
लोपली हे निशी मंद झाला शशी | मुनिजन मानसी ध्याती तुजला || १ ||
भानु-उदयाचळी तेज पुंजाळले | विकसती कमळे जळामाजी || २ ||
धेनुवत्से तुला बाहती माधवा | ऊठ गा यादवा! उशीर झाला || ३ ||
उठ पुरुषोत्तमा! वाट पाहे रमा | दावी मुखचंद्रमा सकळिकांसी || ४ ||
कनकपात्रांतरी दीपरत्ने बरी | ओवाळिती सुंदरी तूजलागी || ५ ||
जन्मजन्मांतरी दास होऊ हरी | बोलती वैखरी भक्त तुझे || ६ ||
कृष्णकेशव करी चरणाम्बुज धरी | ऊठ गा श्रीहरी मायबापा || ७ ||