बाबा भिडे पूल हा पुण्यातील लकडी पुलाच्या (संभाजी पुलाच्या) बाजूला असलेला एक पूल आहे.

पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातल्या मुठा नदीवर एकेकाळी, लकडी पुलाच्या दोनही बाजूला प्रत्येकी दोन, असे चार साकव (काॅजवे) होते. एम.ई.एस. (गरवारे) काॅलेजजवळ, पांचाळेश्वरजवळ, सध्याच्या (बाबा) भिडे पुलाच्या जागी आणि पुलाची वाडी येथे, असे ते चार पूल होते. या पुलांचा उपयोग सायकलस्वार आणि पादचारी करीत. हे साकव पुण्यातील तरुणांच्या आवडीचे होते. संध्याकाळच्यावेळी उगाच चक्कर मारण्यासाठी लोक येथे येत.

सन १९९२-९३च्या सुमारास संभाजी पुलाच्या दोन्ही बाजूंस दुचाकी वाहनांसाठी आणखी दोन पूल बांधण्यात आले, एक पूना हाॅस्पिटलजवळ आणि दुसरा डेक्कन जिमखाना बस स्टॅंडच्या बाजूस. हे बांधल्यावर लकडी पूल दुचाकी वाहनांसाठी बंद करण्यात आला. काही काळानंतर जिमखाना परिसरातील वर्दळ प्रमाणाबाहेर वाढू लागली, म्हणून महापालिकेने उर्वरित तीन साकव पाडून टाकले.

पुढे नारायण पेठेतून डेक्कन जिमखान्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांची गर्दी वाढू लागल्यामुळे महापालिकेने डेक्कन जिमखाना बस स्टॅंडच्या बाजूचा दुचाकी पूल पाडून त्याजागी सन १९९६ साली एक नवाच सर्वोपयोगी पूल बांधला. हा पूल तयार झाल्यावर त्याला जनसंघाचे नेते बाबा भिडे यांचे नाव दिले. हाच तो भिडे पूल. मुठेला पूर आल्यावर पाण्याखाली जातो, आणि पूर ओसरल्यावर वाहतुकीसाठी पुन्हा सज्ज होतो.

ना.सी. फडके, सुहास शिरवळकर यांच्या कादंबऱ्यांतून भिडे पुलाचा अनेकदा उल्लेख झाला आहे.