भाई छ्न्नुसिंह चंदेले

भाई छ्न्नुसिंह चंदेले (जन्म : ६ ऑगस्ट १९०६; मृत्य : ?) हे स्वातंत्र्यसैनिक, कामगार पुढारी आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील नेते म्हणून परिचित होते. स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतल्याबद्दल तुरुंगात शिक्षा भोगत असतानाच पुन्हा एकदा जोमाने स्वातंत्र्यचळवळीत भाग घेण्यासाठी येरवड्याच्या तुरुंगातून त्यांनी यशस्वीपणे पलायन केले होते. व्यायामाची गोडी असल्यामुळे त्यांनी कसून बलदंड शरीरसंपदा प्राप्त केली होती. [१]

१९२० साली सोलापुरात झालेल्या राष्ट्रीय परिषदेत लोकमान्य टिळकांचे भाषण ऐकून प्रभावित झालेल्या छ्न्नुसिंहानी दारूच्या दुकानासमोर निदर्शने केली, तसेच परदेशी मालावर बहिष्कार टाकावा म्हणून प्रचारही केला. १९२३ ते १९२५ या काळात निर्माण झालेला हिंदू-मुस्लिमातील तणाव निवळावा म्हणून शहरात शांतता राखण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न यशस्वी झाले. १९२८ साली डॉ. कृ. भी. अंत्रोळीकरांच्या नेतृत्वाखाली झालेल्या गिरणी कामगारांच्या संपात भाई छ्न्नुसिंह कृतिशील होते.

तरुणांमध्ये स्वातंत्र्याची प्रेरणा जागृत राहावी यासाठी संपूर्ण देशभर सुरू झालेल्या 'युथ लीग' या चळवळीत त्यांनी स्वतःला झोकून दिले. तसेच ते राष्ट्रीय कॉग्रेसचे सभासदही झाले. ९ मे १९३० रोजी महात्मा गांधीजींच्या अटकेच्या निषेधार्थ सोलापुरात उत्पन्न झालेल्या प्रक्षोभात चंदेले क्रियाशील होते. सेशन कोर्ट जाळण्याच्या प्रकरणात त्यांना अटक झाली आणि सात वर्षाच्या कठोर कारावासाची शिक्षा झाली. विजापूर जेलमध्ये शिक्षा भोगत असताना बॅरिस्टर नरीमन, उमाशंकर दीक्षित, माताप्रसाद मिश्रा अशा त्यावेळच्या नामवंत स्वातंत्र्यसैनिकांचा सहवास त्यांना लाभला. त्यांच्याबरोबरील चर्चांतून आणि वादविवादांतून त्यांची समतावादी विचारसरणी घडत गेली. ते जेलमध्ये असतानाच १९३३मध्ये त्यांच्या पत्नीचे आणि वडिलांचे निधन झाले. मुलीच्या लग्नाच्या वेळीही ते तुरुंगातच होते.

संदर्भसंपादन करा

  1. ^ येळेगावकर, श्रीकांत. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सोलापूरचे दीपस्तंभ.