बिब्बा

झाडाच्या प्रजाती

बिब्बा (शास्त्रीय नाव: Semecarpus anacardium) बिब्बा, भिलावा, बिबवा, इंग्रजीमध्ये मार्किंग नट ट्री इत्यादी नावाने ओळखला जाणारा व ॲनाकार्डिएसी या कुळातला हा पानझडी प्रकारचा वृक्ष आहे. भारतीय प्राचीन ग्रंथांमध्ये आलेल्या उल्लेखांवरून हा मूळचा भारतीय असावा असे वाटते. भारतासहित ऑस्ट्रेलिया व ईस्ट इंडीज येथे हा वृक्ष आढळतो.

बिब्बा वृक्ष
बिब्ब्याची पाने व फळे यांचे चितारलेले चित्र

अन्य भाषांतील शब्द :

संपादन
  • कानडी - केरू. गेरकायी
  • गुजराती - भिलामू किंवा भिलामो
  • पफारसी - हब्बुल्कल्ब
  • संस्कृत - अग्निमुखी, आरुष्क, भल्लातक, वातारी, वीरवृक्ष, शैलबीज.
  • हिंदी - भिलावा, भेला, बिलारन

बिब्बा हा मध्यम उंचीचा वृक्ष असून याची उंची ५ ते ८ मीटरपर्यंत असते. पाने वरून चिवट व गुळगुळीत आणि पाठीमागून थोडेसे केस असल्याने खरबरीत असतात. पानांचे आकारमान मोठे म्हणजे लांबी १५ ते ४० सेंटीमीटर असून ती टोकाकडे गोलाकार असतत. फुले लहान हिरवट पांढरी व पिवळसर असतात. त्यास डेख फारच छोटे असते. बिब्याच्या झाडाला काजूप्रमाणे बोंडफळे येतात. ती पिकल्यावर पिवळ्या रंगाची दिसतात. या बोंडाला बिंपटी, बिबुटी किंवा बिंबुटी म्हणतात. बोंडामध्ये खाद्य गर असतो, त्याला गोडांबी म्हणतात. गोडांबीत काजूप्रमाणेच तेल असते, मात्र ते बिब्ब्यात असते तसे झोंबरे नसते.

औषधी उपयोग

संपादन

प्राचीन काळापासून महाराष्ट्रातील ग्रामीण भागात विशेषतः कोकणात विविध रोगांसाठी तात्काळ गुण देणारे बिब्ब्यासारखे दुसरे रसायन, औषध नाही, अशी सर्वाचीच परम श्रद्धा आहे. औषधात बिबुट्या, गोडांब्या व बिब्बे वापरतात.

बिब्ब्याच्या वरच्या भागात अत्यंत दाहक पण विलक्षण गुणकारी तेल असते, ते खूप दाहजनक आहे. बिब्ब्याच्या आतल्या बीमध्ये असलेल्या गोडांबीत खूप पौष्टिक द्रव्ये आहेत. त्याच्या वापराने पुरुषांचे वीर्य चटकन वाढते. बिब्बा हा कटाक्षाने उष्ण प्रकृतीच्या माणसाने कदापि वापरू नये. जेव्हा त्याल नाइलाजाने बिब्बा किंवा बिब्बा घटकद्रव्य असलेले औषध वापरायचे असेल, त्याने आदल्या दिवशी, त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी जेवणातील मीठ संपूर्णपणे टाळावे, म्हणजे बिब्ब्यातील दाहक तेलाचे दुष्परिणाम होत नाहीत, त्रास होत नाहीत. बिब्ब्याचे औषध घेत असताना कटाक्षाने तूप योग्य प्रमाणात घेतले तर बिब्बा चांगला मानवतो.

एखाद्या रुग्णाला डोक्यात चाई झाल्यास त्या भागाच्या बाजूला सभोवताली भरपूर तूप लावून चाई असलेल्या भागास बिब्ब्याचे तेल लावल्यास दोन ते चार दिवसांत खात्रीने नवीन केस येतात. ज्या मंडळींना शौचास चिकट होत असेल, त्यांच्यासाठी मिठाचे पथ्यपाणी पाळून सेवन राती केलेले भल्लातकहरीतकी चूर्ण गुण देते. ज्यांना कायम दूषित पाणी नाइलाजाने प्यावे लागते, ते भोजनोत्तर भल्लातकासव घेतात. पावसाळय़ात खराब पाणी नाइलाजाने प्यावे लागल्यास बिब्बा हे घटकद्रव्य असलेल्या संजीवनी गोळ्या भोजनोत्तर घेतात..

बिब्ब्याची फुले

संपादन

बिब्बा दाभणास टोचून गोड्या तेलाच्या दिव्यावर धरल्याने जी पेटलेल्या तेलाची टिपे पडतात, त्यास बिब्ब्याची फुले म्हणतात. ही टिपे दुधात धरून हळद व खडीसाखर मिसळून पिण्यास देतात. प्रारंभी एक फूल व मग दोन-चार दिवसांनी दोन फुले रात्री निजताना देतात. हा प्रकार फुफ्फुसाच्या रोगात देतात. दम्यात याने फार चांगला गुण येतो.

बिब्बा वापरून बनलेली आयुर्वेदिक औषधे

संपादन

संजीवनीवटी, भल्लातकहरीतकी, भल्लातकासव ही बिब्ब्यापासून बनलेली आयुर्वेदिक औषधे आहेत.


बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत