बाळ बापट ऊर्फ श्रीकृष्ण बापट हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक गाजलेले छायाचित्रकार होते. त्यांचा जन्म यवतमाळ येथे १७-८-१९२३ला झाला होता. मॅट्रिक झाल्यावर बाळ बापट पुण्याला आले आणि विविध छायाचित्रकारांकडे त्यानी छायाचित्रणाचे शिक्षण घेतले. आणि नंतर, चलचित्र छायालेखन व चित्रपट तंत्र या क्षेत्रांत प्रवेश केला. पुण्यातील नवयुग स्टुडिओमध्ये त्यांनी, ’गरिबांचे राज्य’, ’शादीसे पहिले’ व ’साजन का घर’ या चित्रपटांचे छायालेखन केले. त्यांशिवाय ’अखेर जमले’, ’चिमणी पाखरे’,’ चाळ माझ्या पायांत’, ’मी तुळस तुझा अंगणी’ इत्यादी सुमारे ३२ चित्रपटांचे छायाचित्रण बाळ बापट यांनी केले. राजा परांजपे यांच्या ’आधी कळस मग पाया’, ’ऊन पाऊस’, ’जगाच्या पाठीवर’, ’पेडगावचे शहाणे’, ’लाखाची गोष्ट’ आदी चित्रपटांचे कॅमेरामन, बाळ बापट होते. रा्जा परांजपेंखेरीज राजा ठाकूर, दत्ता धर्माधिकारी यांसारख्या दिग्दर्शकांकडे बाळ बापट यांनी काम केले.

भारत सरकारच्या फिल्म डिव्हिजनमध्येही बाळ बापट यांनी काही काळ नोकरी केली होती. नंतर भारतीय लष्कराचे जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करताना त्‍यांनी १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धात रणभूमीवर जाऊन भारतीय सैन्याबरोबर छायाचित्रण केले होते. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या दौऱ्यांबरोबर ते अनेकदा जात असत. पुण्यातील कबीर बाग मठ या संस्थेचे ते अनेक वर्षे अध्यक्ष होते.

बाळ बापट २९-७-२०१२ रोजी निधन पावले. ज्ञानप्रबोधिनीचे संचालक डॉ. गिरीश बापट हे त्यांचे चिरंजीव आहेत.

लेखन संपादन

  • माझी चित्रफीत (चित्रपटक्षेत्रातील अनुभवांचे आत्मकथन)


पहा : बाळ (नाव/ आडनाव)