बाला सरस्वती

(बालसरस्वती या पानावरून पुनर्निर्देशित)

बाला सरस्वती ह्या प्रख्यात भरतनाट्यम् नर्तकी होत्या. त्यांचा जन्म मद्रास येथे नृत्यकलेचा आनुवंशिक वारसा लाभलेल्या देवदासी घराण्यात झाला. त्यांची आई जयम्मा ही कर्नाटक संगीतातील नामवंत गायिका, तर आजी वीणाधनम् ही प्रख्यात वीणावादक होती.

बालासरस्वती यांचा नृत्याभिनय


त्यांची पणजी तंजावरच्या राजदरबारात राजनर्तकी होती. त्यांच्या नृत्य शिक्षणाची सुरुवात वयाच्या अवघ्या चवथ्या वर्षापासून कंडप्पा नुट्टवनार (नृत्यगुरू) यांच्या हाताखाली झाली.वयाच्या सातव्या वर्षी कांचीपुरममधील अम्मानाक्षी अम्मा मंदिरात त्यांचा ‘अरेंगेट्रम’ (प्रथम नृत्यप्रयोग) झाला. पुढे वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी मद्रास येथे नृत्यप्रयोग करून जाणकारांची वाहवा मिळवली. तदनंतर त्यांनी नृत्यगुरू चिन्नय्या नायडू व गौरी अम्मा ह्यांच्याकडे नृत्याची तालीम घेतली.तसेच कूचिपूडी नृत्यसंप्रदायातील एक ज्येष्ठ अभिनयपटू लक्ष्मीनारायण शास्त्री ह्यांच्याकडे अभिनय व पदम् सादर करण्यातील बारकावे ह्यांचे सखोल अध्ययन केले. पुढे एका विशिष्ट आजारपणामुळे त्यांच्या शरीरयष्टीत बरेच स्थूलत्व आले व काही वर्षे त्यांची नृत्यसाधना खंडित झाली. तरीही त्यावर मात करून त्यांनी नृत्याभिनयात अजोड स्थान संपादन केले. अप्रतिम अभिनय हेच त्यांच्या नृत्यशैलीचे प्रमुख वैशिष्ट्य गणले जाते. अभिनयाच्या विविध अंगोपांगांचा अतिशय नाजुक, सूक्ष्म व प्रभावी आविष्कार त्यांच्या नृत्यातून पहावयास मिळतो. त्यांचा अभिनय अभिजात श्रेणीतील असून त्यात भडकपणा अगर सवंगपणा आढळत नाही.⇨ पदम् पेश करण्यातील बालासरस्वतींचे नैपुण्य अद्वितीय गणले जाते. मानवी भावभावनांच्या विविध सूक्ष्म छटा त्या आपल्या बोलक्या मुद्रेने व प्रत्ययकारी अभिनयाने हुबेहूब जिवंत करतात. अत्यंत साधी वेशभूषा, कमीत कमी अलंकरण व साधेसुधे नेपथ्य यांचा अवलंब करूनही प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्याचे सामर्थ्य त्यांच्या जातिवंत अभिनयात दिसून येते. दक्षिण भारताच्या सीमा ओलांडून सर्व भारतात, तसेच परदेशातही, शुद्ध ⇨भरतनाट्यम् नृत्यपरंपरेचे दैदिप्यमान दर्शन घडविण्याचा अग्रमान बालासरस्वती ह्यांनाच द्यावा लागेल. १९३४ साली बनारस येथे झालेल्या अखिल भारतीय संगीत परिषदेत त्यांच्या नृत्यकौशल्याचा साक्षात्कार त्यांनी भारतीयांना घडविला. ह्याच परिषदेत रवींद्रनाथ टागोरांनी त्यांच्या नृत्यनैपुण्याबद्दल प्रशंसा केली. टोकिओ येथील ‘ईस्ट-वेस्ट एन्काउंटर’ समारोहात नृत्यप्रयोग सादर केल्यावर त्यांनी १९६२ मध्ये अमेरिकेला भेट दिली व तिथे ‘जेकब्स पिलो’ नृत्यमहोत्सवात प्रथम नृत्यप्रयोग सादर केला. एडिंबरो संगीत महोत्सवातही (१९६३) त्यांनी भाग घेतला. तसेच ‘अमेरिकन सोसायटी फॉर ईस्टर्न आर्ट्स’ या संस्थेच्या वतीने सॅनफ्रॅन्सिस्को येथे भरतनाट्यम् नृत्यशिक्षणाचे वासंतिक वर्ग चालवले (१९६५). सर्वेंद्र भुपाळ कुरवंजी या नृत्यनाट्याचे त्यांनी नृत्यलेखनही केले. व्ही. राघवन् यांच्या समवेत त्यांनी भरतनाट्यम् हे तमिळ पुस्तक लिहिले. मद्रास संगीत अकादमीमधील नृत्यविद्यालयाच्या त्या संचालिका आहेत.


त्यांना अनेक मानसन्मान लाभले : संगीत नाटक अकादमीचे भरतनाट्यम्साठी पारितोषिक (१९५५) ‘पद्मभूषण’ (१९५७) रवींद्र भारती विद्यापीठाची सन्मान्य डॉक्टरेट (१९६४) इत्यादी. तमिळनाडू शासन व मुंबई येथील ‘नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स’ यांनी त्यांच्यावर बाला हा अनुबोधपट काढला असून सत्यजित रे हे त्याचे दिग्दर्शक आहेत. त्यांच्या कन्यका लक्ष्मी शण्मुखम् याही त्यांच्या परंपरेतीलच भरतनाट्यम् नर्तकी आहेत.

संदर्भ

संपादन
  1. https://vishwakosh.marathi.gov.in/29299/