ज्योतिर्मठ

आदिशंकराचार्यांनी भारताच्या पवित्रभूमीत धार्मिक सामंजस्य आणि अद्वैततत्त्वज्ञानाच्या प्रचार प्रसारासाठी चार दिशेला चार मठांची स्थापना केली. शृंगेरीचा आद्य शारदामठ, पूर्वेचा जगन्नाथपुरीचा गोवर्धनमठ, पश्चिमेचा द्वारकामठ आणि उत्तराखंडातील ज्योतिर्मठ! 'जोशीमठ' म्हणूनही तो ओळखला जातो.

आदिशंकराचार्य बदरीनाथाहून निघाले आणि खाली दक्षिणेला वीस मैलांवर असलेल्या या शांत निसर्गरमणीय ठिकाणी शिष्यांसमवेत येऊन पोचले. गगनाला स्पर्श करणारा,दुर्मीळ जडीबुटींचे ऐश्वर्य बाळगणारा हिरवागार द्रोणागिरी इथे स्थानापन्न झालेला आहे.

ऑक्टोबर ते एप्रिल या काळात बद्रीनाथ मंदिर बंद होते तेव्हा बदरीनाथाची उत्सवमूर्ती आणि इतरही पूजोपचाराचे साहित्य या ज्योतिर्मठात हलविले जाते. रावल नावाचे पुजारी इथे पूजा करीत असतात. बदरीनाथाच्या परिसरात शंकराचार्यांची गादी आहे तसेच स्थान इथे ज्योतिर्मठात आहे. आचार्यांची मूर्तीही आहे आणि विधिवत इथे पूजाअर्चा होत असते.

ज्योतिर्मठाचे प्रथम आचार्य तोटकाचार्य होते व आतापर्यंत शंकराचार्य म्हणून अनेक संन्यासी विद्वान या पीठावर आरूढ झालेले आहेत. याच ज्योतिर्मठात नृसिंहाचे मंदिर आहे. या नृसिंहमूर्तीचा उजवा हात क्षीण झालेला आहे हा हात जेव्हा मूर्तीपासून विलग होईल तेव्हा नर नारायण पर्वत एक होतील आणि बदरीनाथाची पूजा पंचबद्रीपैकी भविष्यबदरीत होईल असे भाकीत आहे.

हिमगिरीच्या पावनभूमीत अलकनंदेच्या जलतुषारांनी प्रोक्षण करीत आदिशंकराचार्यसंस्थापित उत्तरांचलातील हा ज्योतिर्मठ साधकांना आत्मज्योत उजळण्यास प्रेरित करतो.