फेसाटी (कादंबरी)
ग्रामीण भागातील वास्तव जीवनाचे वर्णन तसेच जीवन मरणाचा संघर्ष अतिशय सोप्या भाषेत मांडला आहे. ग्रामीण जीवन व त्यातही वाट्याला आलेले दारिद्र्य याचे वर्णन अतिशय मार्मिक उदाहरणे देऊन मांडले आहे.
"फेसाटी"
भूक, गरिबी, अन्याय, दुष्काळ, अंधश्रद्धा, भ्रष्ट नोकरशाही, अवैध सवकारी, बेरोजगारी यातून होत असलेली होरपळ आणि त्याविरुद्ध मेंढपाळ समूहातील अल्पभूधारक बेरोजगार तरुण आणि त्याच्या परिवाराचा चाललेला संगर म्हणजे मा. नवनाथ गोरे यांची सन २०१८चा युवा साहित्य आकादेमी पुरस्कारप्राप्त कादंबरी “फेसाटी”.
निसर्गाची अवकृपा अन् येथील व्यवस्थेनं कादंबरीचे नायक नाथा आणि त्याची आई ‘काकू’ व कुटुंबातील संपूर्ण सदस्यांच्या जीवनाची माती केली, संसाराचा फुफाटा केला, स्वप्नांची राखरांगोळी केली; इतकं होऊनही काहीतरी चांगलं होईल, हेही दिवस जातीलच या आशेने संघर्ष करत जीवन जगत असलेले काका आणि काकू त्यांना सोबत देणाऱ्या बहिणी ‘आक्का’ आणि दादा यांचा संयम, आशावाद अन् इच्छाशक्ती आणि नाथा-जया यांच्या भावनिक हृदयस्पर्शी प्रेमाचं ‘सुंबरान’ म्हणजे नाथाभाऊंची फेसाटी.
"फेसाटी" वाचतांना प्रकर्षानं जाणवतं ते ग्रामीण भागातील शेतकऱ्याचं हलाखीचं जगणं.. त्यांच्या जीवनात अकस्मात येणारी संकटं अन् त्याला तोंड देताना जीवाची होणारी फरफट.. इतकं होऊनही एखाद्या साली वावरात डोलणारी पीक मोठ्या तोऱ्यात फुलतात पण कुठलाही मागमूस न लागू देता पुन्हा निसर्ग होत्याचं नव्हतं करून जातो वैऱ्यासारखा.... शेतकऱ्याचं जगणं म्हणजे संघर्षच... घराचा रहाटगाडा चालवणं सोप्प नसतं.. दोन वेळच्या खाण्याची भ्रांत.. त्यात पुन्हा डोईवर वाढत असलेला कर्जाचा डोंगर.. सावकाराचा तगादा.. पोरीची लग्न.. पोराचं शिक्षण.. दवाखाना.. ह्या जबाबदाऱ्या पेलताना आई बापाच्या तोंडाला फेसाटी येते.. त्याचच हे विदारक वास्तव.
ह्या कादंबरीत कुठलाही कल्पनाविलास नाही, जे काही आहे ते सर्वसामान्य शेतकऱ्याचं जगणं, त्यांची होणारी फरफट, मूलभूत गरजांसाठीसुद्धा त्यांना रक्ताचं पाणी करायला लावणारी इथली षंढ झालेली व्यवस्था.. अन्याय अत्याचार.. पैसा असेल त्यालाच न्याय या धोरणांनी चालत असलेली भ्रष्ट नोकरशाही..वाढत्या बेरोजगारीच भयान वास्तव !
लेखकाची शब्दमांडणी इतकी प्रवाही आणि आशयघन आहे की वाचकाच्या समोर प्रसंग उभा राहतो.. यात मंडलेले वास्तव मन सुन्न करणारे आहे, कादंबरी वाचून झाल्यावर त्यातील प्रसंग अन् पात्र डोळ्यासमोर येत राहतात.. त्यांचा संघर्षच इतका आहे की संवेदनशील वाचकाच्या डोळ्याच्या कडा ओलावल्याशिवाय राहणार नाहीत..! ॲड. शिवाजी खाडे