सर फाजली हसन आबेद (२७ एप्रिल, १९३६) हे एक बांगलादेशीय समाजसेवक आहेत.

जन्म आणि शिक्षण

संपादन

फाजली हसन यांचे शिक्षण पौना जिल्हा शाळेत झाले. नंतर ढाका महाविद्यालयातून पदवी घेऊन ते ग्लासगो विद्यापीठात गेले. तेथे त्यांनी जहाजबांधणी विषयाचे शिक्षण घेतले.

व्यवसाय आणि समाजसेवा

संपादन

फाजली हसन यांनी काही काही काळ लंडनमध्ये बर्मा शेल या कंपनीत नोकरी केली. १९७० मध्ये बांगलादेशात वादळामध्ये पाच लाख लोक मरण पावले. त्यानंतर १९७१ च्या बांगलादेश मुक्ती युद्धाची झळ बसली, त्या वेळी लंडनची सदनिका विकून मायदेशी आलेल्या फाजली हसन यांनी निर्वासितांच्या, विस्थापितांच्या व शरणार्थीच्या सेवेसाठी बांगलादेश रूरल ॲडव्हान्समेन्ट कमिटी (बीआरएसी) ही संस्था सुरू केली. या संस्थमुळे आफ्रिकेतील व आशियातील १५ कोटी लोक गरिबीतून बाहेर आले. आणखी १० देशांत त्यांच्या संस्थेचा विस्तार होत आहे.

फाजली हसन आबेद हेे ज्या बांगलादेशचे नागरिक आहेत, तेथे १९९१-९२ मध्ये गरिबीचे प्रमाण ५६.७ टक्के होते ते २०१० मध्ये ३१.५ टक्के इतके खाली आले. बालकांच्या लसीकरणाचे प्रमाण बांगलादेशात २ टक्के होते ते आता ९५ टक्के आहे. अर्थातच आबेद यांच्या प्रयत्‍नांचा यांत मोठा वाटा आहे. बांगलादेशात कॉलरा व डायरियाने मुले मरण्याचे प्रमाण जास्त होते, त्यामुळे बीआरएसी संस्थेतील स्वयंसेवकांनी घरोघरी जाऊन मातांना जलसंजीवनी तयार करण्याचे शिक्षण दिले. अाबेद यांनी महिलांना अर्थव्यवस्थेच्या प्रगतीत सहभागी करून घेण्यावर भर दिला. त्यामुळे बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे, आरोग्य सेवेत सुधारणा करणे, महिलांना सक्षम करणे, कृषी प्रशिक्षण देणे अशी अनेक उद्दिष्टे साध्य झाली.

पुरस्कार

संपादन
  • अडीच लाख डॉलरचा जागतिक अन्न पुरस्कार
  • मॅगसेसे पुरस्कार
  • आलोफ पामे पुरस्कार
  • हेन्‍री क्रॅव्हिस पुरस्कार
  • ब्रिटिश सरकारची नाईटहूड (’सर’की)