परभणीचे प्रभाकर देशपांडे साखरेकर (जन्म : इ.स. १९४२) हे शेक्सपियरच्या साहित्यावर प्रेम करणारे एक मराठी लेखक आहेत. बी.ए झाल्यानंतर ते महाराष्ट्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागात काम करू लागले. आता निवृत्त झाले आहेत.

प्रभाकर देशपांडे यांचे शेक्सपियर-प्रेमसंपादन करा

शेक्सपियरची ३७ नाटके, पण त्यात ओळी किती? ७३ वर्षांच्या प्रभाकरराव देशपांडे यांच्याकडे यांसह अशा सर्व बाबींची नोंद आहे. शेक्सपियरच्या अशा अनेक गोष्टींसह त्यांच्या नाटकाचा कथानुवाद सोप्या पद्धतीने केलेल्या या 'शेक्सपियर'वेडय़ा माणसाचे साडेबाराशे पानांचे पाच खंड जागतिक ग्रंथदिनी (२३ एप्रिल २०१५ रोजी) प्रकाशित झाले. शेक्सपियरने झपाटलेल्या परभणीच्या देशपांडे यांना नाटकातील म्हणींपासून ते पात्रांचे गाजलेले संवादही तोंडपाठ आहेत.
इंग्रजीतून कला विषयाची पदवी घेताना त्यांनी अभ्यासलेली मर्चंट ऑफ व्हेनिस व मॅकबेथ ही दोन नाटके त्यांना अस्वस्थ करीत होती. त्यानंतर प्रभाकर देशपांडे यांनी आणखी चार नाटके अभ्यासली व पुढे एक कथा लिहिली. त्यानंतर जनशक्ती वाचक चळवळीच्या श्रीकांत उमरीकर यांनी शेक्सपियरचा पूर्ण अभ्यासच करा, असा आग्रह धरला. देशपांडे एक एक नाटक वाचू लागले. शेजारी डिक्शनरी असे. प्रत्येक शब्दाचा अर्थ नव्याने तपासायचा. बाजूला टिपणे काढायची. नंतर प्रभाकर देशपांडे यांनी शेक्सपियरच्या नाटकांची कथानके मराठीतून लिहायला सुरुवात केली. या नाटकांच्या कथानकांचा पहिला खंड ७ शोकांतिकांचा होता. पुढे देशपांडे 'शेक्सपियर'मय होऊन गेले. आणि शेक्सपियरच्या नाट्यकथानकांचे ५ही खंड लिहून झाले.

पहिल्या खंडात रसाळ, ओघवत्या शब्दांमध्ये कथन केलेल्या शेक्सपियरच्या सात नाट्यकृतींतील गोष्टी असे या पुस्तकाचे वर्णन करता येईल. या कथाखंडात शेक्सपियरच्या रोमिओ ॲन्ड ज्युलिएट, हॅम्लेट, ऑथेल्लो, किंग लियर, मॅकबेथ, ज्युलियस सीझर व ॲन्टनी ॲन्ड क्लिओपात्रा या सात शोकान्तिकांचा समावेश होता. आता पाचही खंड प्रकाशित झाले आहेत.

ते खंड असे :-

 • खंड १ :
  • रोमिओ ॲन्ड ज्युलिएट, हॅम्लेट, ऑथेल्लो, किंग लियर, मॅक्बेथ, ज्यूलियस सीझर, ॲंटनी ॲन्ड क्लिओपात्रा.
 • खंड २ : सात सुखान्तिका
  • अ‍ॅज यू लाईक इट, ट्वेल्फ्थ नाईट, मच अ डू अबाऊट नथिंग, अ मिड समर नाईट्स ड्रीम, द कॉमेडी ऑफ एरर्स, टेमिंग ऑफ श्ऱ्यू, द मर्चंट ऑफ व्हेनिस.
 • खंड ३ : सात नाटके
  • ऑल इज वेल दॅट एन्ड्ज वेल, मेझर फॉर मेझर, ट्रॉयलस अ‍ॅड क्रेसिडा, द मेरी वाईव्हज ऑफ विंडसर, लव्ह्ज लेबर्स लॉस्ट, द टू जंटलमन ऑफ व्हेरोना, टायटस ॲन्ड्रॉनिकस
 • खंड ४ : आठ नाटके
  • टायमन ऑफ अथेन्स, कोरिओलेनस, सिंबेलिन, पेरिक्लीज (द प्रिन्स ऑफ टायर), द विंटर्स टेल, द टेम्पेस्ट, किंग जॉन, हेन्री द एड्थ.
 • खंड ५ : आठ ऐतिहासिक नाटके
  • हेन्री द सिक्स्थ भाग १, हेन्री द सिक्स्थ भाग २, हेन्री द सिक्स्थ भाग ३, रिचर्ड द थर्ड, रिचर्ड दि सेकंड, हेन्री द फोर्थ भाग १, हेन्री द फोर्थ भाग २, हेन्री द फिफ्थ.

प्रभाकर देशपांडे यांची अन्य पुस्तकेसंपादन करा

 • जीवनसरिता (व्यक्तिचित्रण)
 • हेही नसे थोडके (माहितीपर)