तोरणा
तोरणा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सह्याद्री पर्वतरांगांमधील डोंगरी किल्ला आहे.
तोरणा | |
गुणक | 18°16′34″N 73°36′47″E / 18.276°N 73.613°E |
नाव | तोरणा |
उंची | १४०३ मीटर/४६०४ फूट |
प्रकार | गिरिदुर्ग |
चढाईची श्रेणी | मध्यम |
ठिकाण | वेल्हे तालुका, पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
जवळचे गाव | वेल्हे |
डोंगररांग | सह्याद्री |
सध्याची अवस्था | चांगली |
स्थापना | १४७० ते १४८६ |
तोरणा अथवा प्रचंडगड हा पुणे जिल्ह्यातला दुर्गकोटातील अतिदुर्गम व अतिविशाल म्हणून हा गड प्रसिद्ध आहे.
पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत, त्यापैकी एका पदरावर तोरणा व राजगड आहेत. दुसऱ्या पदराला भुलेश्वर रांग असे म्हणतात. पुण्याच्या नैर्ऋत्येस असलेल्या पर्वतराजीमध्ये १८.२७६ उत्तर अक्षांश व ७३.६१३ पूर्व रेखांशावर हा किल्ला आहे. या गडाच्या दक्षिणेला वेळवंडी नदी असून उत्तरेला कानद नदीचे खोरे आहे. या गडाच्या पश्चिमेला कानद खिंड, पूर्वेला बामण व खरीव खिंडी आहेत. पुण्यापासून रस्त्याने तोरण्यापर्यंतचे अंतर ६० कि.मी. आहे.
इतिहास
संपादनछत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करीत असताना इ.स. १६४७ मध्ये सर्वप्रथम घेतलेला हा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून या किल्ल्याचे नाव तोरणा किल्ला[१] असे ठेवण्यात आले.[२] महाराजांनी गडाची पाहणी करताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे नाव बदलून 'प्रचंडगड' असे ठेवले. या किल्ल्यावर सापडलेल्या धनाचा उपयोग शिवाजी महाराजांनी राजगडाच्या बांधणीसाठी केला.[३]
तोरणा किल्ला कधी आणि कोणी बांधला याचा पुरावा आज उपलब्ध नाही. येथील लेण्यांच्या आणि मंदिरांच्या अवशेषांवरून हा शैवपंथाचा आश्रम असावा. इ. स. १४७० ते १४८६ च्या दरम्यान बहामनी राजवटीसाठी मलिक अहमद याने हा किल्ला जिंकला. पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला. नंतर तो शिवाजी महाराजांनी घेतला व याचे नाव प्रचंडगड ठेवले आणि गडावर काही इमारती बांधल्या. महाराजांनी आग्र्याहून आल्यावर अनेक गडांचा जीर्णोद्धार केला. त्यात ५ हजार होन इतका खर्च त्यांनी तोरण्यावर केला. संभाजी महाराजांची निर्घृण हत्या झाल्यावर हा किल्ला मोगलांकडे गेला. शंकराजी नारायण सचिवांनी तो परत मराठ्यांच्या ताब्यात आणला. पुढे इ. स. १७०४ मध्ये औरंगजेबाने याला वेढा घातला व लढाई करून आपल्या ताब्यात आणला व याचे नाव फुतुउल्गैब म्हणजे दैवी विजय ठेवले. पण परत चार वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला व यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच राहिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये तोरणा महाराजांकडेच राहिला होता. विशेष म्हणजे औरंगजेब बादशहाने लढाई करून जिंकलेला असा हा मराठ्यांचा एकमेव किल्ला होय. तोरणा गडावर मेंगाई देवीचे प्राचीन मंदिर आहे.
छायाचित्रे
संपादन-
मुख्य दरवाजा
-
तोरणजाई देवी
-
गडावरील मंदिर
-
बुधलामाची
-
तोरण्यावरून दिसणारा राजगडावरील सूर्योदय
-
झुंझारमाची
-
तोरणा ते राजगड मार्ग
-
गडावरील ध्वजस्तंभ
गडावर जाण्याचा मार्ग
संपादनपुणे जिल्ह्यातील वेल्हे हे तालुक्याचे गाव तोरणाच्या पायथ्याशी आहे. पुणे-वेल्हे अंतर ६० कि.मी आहे. पुणे-नसरापूर-वेल्हे, पुणे-पानशेत-वेल्हे व पुणे-खानापूर-पाबे मार्गे वेल्हे अशा मार्गांनी तोरणा गडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते. शिवाजी महाराजांच्या काळातील वेल्हे-वेग्रे आळीमार्गे पाऊलवाटेने दीड-दोन तासात बिनी दरवाजातून तोरण्यावर जाता येते. हा मार्ग इतर मार्गांपेक्षा सोपा आहे. अवघड ठिकाणी पुरातत्त्व खात्याने लोखंडी संरक्षक कठडे बसवले आहेत. त्यामुळे सहज चढउतार करता येते. दुसरा मार्ग वेल्ह्यापासून ५ कि.मी अंतरावर असलेल्या भट्टी या गावातून आहे. गावाच्या पश्चिमेकडून वाळणजाई दरवाजातून बुधला माचीवर थेट वाट जाते. या वहिवाटीच्या वाटांशिवाय चोरवाटेने येणारे अन्य मार्ग अडचणीचे आणि धोकादायक बनले आहेत. वेल्हे गावातून चढताना दिसणारा तोरणा आणि गुंजवण्याकडून दिसणारा राजगड यात बरेच साम्य आहे.
- ^ "एक उल्लेखनीय किल्ला | Torna Fort Information In Marathi | Fort Trek". 2021-01-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-01-23 रोजी पाहिले.
- ^ Desāī, Rameśa (1987). Shivaji, the Last Great Fort Architect (इंग्रजी भाषेत). Maharashtra Information Centre, Directorate-General of Information and Public Relations, Government of Maharashtra.
- ^ Kale, Rohit Pralhadrao (2018-05-24). Rajwata: Aavishkar Gad Killayacha (इंग्रजी भाषेत). FSP Media Publications.