[][] पोलीस पाटील

पोलीस पाटील म्हणजे काय ?

शिवरायांच्या काळात गाव पातळीवरील मुख्य व्यक्ती म्हणुन  "पाटील" हे पद अस्तित्वात होते , प्राचीन काळापासुन गावचा कारभार सांभाळण्यासाठी गाव प्रमुखाची महत्त्वाची भूमिका असायची त्या भुमिकेतील व्यक्ती कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच सामाजिक समस्या सोडवण्यातही सहभागी असायची. महाराष्ट्रात या पदावर सहसा कर्तृत्त्ववान, शुर व धाडसी व्यक्तीच असायची, गावगाडा चालवत असताना न्यायपूर्ण वर्तणुकीमुळे अनेक पाटील हे इतिहासात नावारूपास येऊन अजरामर झाले आहेत.

इंग्रजांच्या काळात गाव पातळीवरील कायदा व सुव्यवस्था व महसूल यावर देखरेख करण्याचे कार्य पाटील करत असे ब्रिटिश काळात प्रथमता “मुंबई ग्राम पोलीस अधिनियम 1867” अमलात आणला गेला या कायद्याच्या तरतुदीनुसार पोलीस पाटील हे पद वंशपरंपरागत होते साधारण त्या काळातील पाटील हा एकटाच सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक व पोलीस यांचे कार्य गाव पातळीवर करत असे तसे त्यांना अधिकार ही होते या कामात त्यांना कोतवाल किंवा नेमलेल्या व्यक्ती मदत  करत असत. 15 ऑगस्ट 1947ला स्वतंत्र झाल्यावर ब्रिटिशांनी नेमलेली वंशपरंपरागत पदे रद्द  करण्यात आली. त्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम  1962 पासून वंशपरंपरागत पदे रद्द  केली.  17 डिसेंबर 1967  रोजी पोलीस पाटील ह्या पदाला कायदेशीर मान्यता देण्यासाठी  ग्राम पोलीस अधिनियम 1967 कायदा करून पोलीस पाटील ह्या गाव  पातळीवरील शेवटच्या घटकाची निर्मिती झाली. त्यावेळी पाटलांना शेतसारा,वसूल करणे, सामान्य तक्रारी न्यायनिवाडा करणे साठी  गावपातळीवर पंच कमिटी स्थापन करण्याचे कार्य पाटील करत असे.

17 डिसेंबर 1967  महाराष्ट्र पोलीस अधिनियम  हा कायदा संमत करण्यात आला व त्यानुसार स्वतंत्र महसुली गावांना पोलीस पाटील नेमण्यात आले. त्यांचा उपयोग गावपातळीवर महसूल व पोलीस प्रशासनाला नियमित होत गेला. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 अधिनियम 86 नुसार  पोलीस पाटील गाव पातळीवर कार्यकारी दंडाधिकारी यांच्या आदेशान्वये कार्य करत असतात. त्यामध्ये कार्यकारी दंडाधिकारी गावपातळीवरील जी माहिती पत्रके मागतील ती पुरवणे, गावातील अपराधांचे प्रमाण व समाज स्वास्थ या बाबत माहिती पुरवणे, पोलीस अधिकाऱ्यांना आवश्यक ती माहिती देणे ,सार्वजनिक शांततेला बाधा  पोहोचणार नाही यासाठी आवश्यक माहिती अधिकाऱ्यांना पुरवणे, गावच्या हद्दीत गुन्हा घडू नये, लोकांचा उपद्रव होऊ नये म्हणून बंदोबस्त करणे व आपल्या हद्दीतील  गुन्हेगारांचा शोध घेऊन न्यायालयासमोर हजर करण्यास मदत करणे इत्यादी कामे पोलीस पाटील करतात. कायदा व सुव्यवस्था राखणे, गावपातळीवर किंवा त्यांच्या कार्यक्षेत्रातील गुन्ह्याची माहिती पोलीस ठाण्यास देणे, विनापरवाना शस्त्र बाळगणेस मनाई करणे,नैसर्गिक आपत्ती व रोगराई या गोष्टींचा अहवाल वरिष्ठांना देणे.गावात अनैसर्गिक किंवा  संशयास्पद मृत्यू झाला असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांना देणे.

कायद्यात तरतुद असलेल्या या कामांबरोबरच गावातील सण,उत्सव,यात्रा, राजकारण, निवडणुका या सर्वच घडामोडीवर पोलीस पाटील लक्ष ठेवून असतात. ग्रामपंचायत व वेगवेगळ्या निवडणुकांच्या काळात पोलीस पाटील गावपातळीवरील हालचालींबाबत पोलीस प्रशासनाला माहीती उपलब्ध करून देत असतो. पोलीस पाटील या नेमणुकीवरील व्यक्ती ही त्याच गावची असल्याने सर्वाना ओळखत असते. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक ,बेकायदेशिर व्यवसाय करणारे, अवैध धंदेवाले, याबद्धल पूर्ण माहीती ही पोलीस पाटलांना असते, ती तात्काळ पोलीस प्रशासनाला दिल्याने अवैध धंद्यावर कारवाई करणे सोपे जाते. त्यामुळे भविष्यातील निर्माण होणाऱ्या संघर्षाला वा गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यास उपयोग होतो. बरेचदा परप्रांतातुन गुन्हा करून गुन्हेगार अगदी गावापर्यंत फरार होऊन लपण्यासाठी येतात व बिनबोभाट राहत असतात. पोलीस पाटील गावातच रहात असल्याने अशा स्वरूपाचे भाडेकरू म्हणुन राहत असलेल्या व्यक्तींचा तपास लावून बरेच गुन्ह्यांचा शोध लावण्यास प्रशासनास मदत करतो. पूर,भूकंप अतिवृष्टी या सारख्या नैसर्गिक आपत्तीच्या कालावधीत माहितीगार म्हणून  पोलीस पाटलांचा उपयोग होतोच त्याबरोबर जातीय धार्मिक तेढ, गुंडप्रवृत्ती,  या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस पाटील उपयोगी ठरले आहेत. गावच्या तंटामुक्त समितीचे निमंत्रक म्हणून देखील  पोलीस पाटील काम पाहतात.

पाटील आणि पोलीस पाटील यामध्ये फरक आहे.पोलीस पाटील पदासाठी महिलांना व विविध इतर जातीधर्मातील सर्व घटकांना आरक्षण देण्यात आलं. यामुळे अनेक अनुसूचित जातीच्या उमेदवारांना व महिलांना पोलीस पाटील होण्याची संधी मिळाली आहे. पोलीस पाटील भरतीमध्ये लेखी परिक्षा आणि मुलाखतीच्या माध्यमातून निवड करण्यात आली. यामुळे उच्चशिक्षित युवक व गुणवत्तापूर्ण पोलीस पाटलांची मोठ्या प्रमाणात निवड झाली आहे. नवीन पोलीस पाटील भरतीमध्ये बी.ए., एम.ए., इंजिनिअर , डीएड झालेले उमेदवार पास झालेले असून त्यांना फक्त 100 रुपये रोजंदारीवर २४ तास काम करावे लागत आहे. पोलीस पाटील पद स्वीकारल्यास खाजगी नोकरी करता येत नाही,२४ तास गावामध्ये राहावे लागते, गाव सोडून जाता येत नाही. पोलीस पाटलांच्या मानधनात अपेक्षित वाढ व्हावी, तसेच शासनाच्या इतर भरतीमध्ये पोलीस पाटलांसाठी काही जागा राखीव ठेवण्यात याव्यात.पोलीस पाटील हा प्रशासन व गावकरी यांच्यातील दुव्याचे महत्त्वपूर्ण काम करत आलेला आहे व यापुढेही प्रामाणिकपणे करत राहील.

  1. ^ "महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967" (PDF).
  2. ^ महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967.