Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.

भारतात अठराव्या-एकोणिसाव्या शतकांत रयतेची लूटमार व वाटमार करणाऱ्या संघटित टोळ्या. यांपैकी पेंढाऱ्यांच्या सशस्त्र संघटित टोळ्या राजकीय सत्ताधाऱ्यांच्या आश्रयाने उदयास आल्या. ठगांची संघटना ही एक प्रकारे धार्मिक हिंसाचारी गुप्त संघटना होती.

पेंढारीसंपादन करा

मोगल साम्राज्याच्या पडत्या काळात व विशेषत: उत्तर पेशवाईत लुटालूट करून उदरनिर्वाह करणाऱ्या टोळ्यांस ही संज्ञा अठराव्या शतकात रूढ झाली. या शब्दाच्या व्युत्पत्तीबद्दल तज्ञांत मतभेद आहेत. काहींच्या मते ‘पेंढारी’ हा शब्द मराठी असून पेंढ व हारी या दोन शब्दांपासून झाला आहे व त्याचा अर्थ गवताची पेंढी किंवा मूठ पळविणारा असा होतो. उत्तरेत पिंडारी अशीही संज्ञा रूढ आहे. पिंड म्हणजे अन्नाचा घास. तो पळविणारा म्हणजे पिंडारी.

भारतातील पेंढाऱ्यांप्रमाणेच लूटमार करणाऱ्या संघटित टोळ्या पश्चिमी देशांच्या इतिहासकाळातही उदयास आल्याचे दिसते. उदा., ब्रिगांड, फ्रीबूटर, बॅंडिट, फ्रीलान्स, डकॉइट इत्यादी.

अशा प्रकारच्या संघटनांच्या उदयाची कारणे पुढीलप्रमाणे : (१) केंद्रीय राजसत्ता अस्थिर किंवा दुर्बल झाली, की सुभेदार-जहागीरदार व मांडलिक राजे यांच्यात सत्ता संपादनार्थ यादवी युद्धे सुरू होतात व अशा संघटनांना वाव मिळतो. (२) सत्तातंर झाले की पराभूत सत्ताधाऱ्यांचे सैनिक बेरोजगार होऊन लूटमारीस उद्युक्त होतात. (३) गरजू राजे व सरदार इत्यादींच्या आश्रयाने वा उत्तेजनाने दुसऱ्याच्या प्रदेशात लूटमार करण्यासाठी धंदेवाईक संघटना उभ्या राहतात.

पेंढाऱ्यांच्या संख्येबद्दल व एकूण कारवायांबद्दल अनेक अतिरंजित कथा रूढ आहेत. कॅ. सीडनॅम याच्या मते माळव्यात त्यांच्या घोडेस्वारांची संख्या ३०,००० होती; तर कर्नल जेम्स टॉडच्या मतानुसार ती संख्या ४१,००० होती. १८१४ मध्ये त्यांची संख्या साधारणत: २५,००० ते ३०,००० च्या दरम्यान असावी आणि त्यांपैकी निम्म्याहून कमी लोक शस्त्रधारी असावेत, असे बहुतेक इंग्रज इतिहासकारांचे मत आहे. प्रथम ते मराठी सरदारांबरोबर बाजारबुणगे म्हणून आढळात येऊ लागले. पुढे माळवा, राजस्थान, गुजरात, मुंबई इलाखा, मध्य प्रदेश वगैरे प्रदेशांत त्यांचा प्रभाव वाढला. त्यांची कुटुंबे विंध्य पर्वताच्या जंगलात, पर्वतश्रेणींत व नर्मदा नदीच्या खोऱ्यात असत. सुरुवातीला पेंढाऱ्यांमध्ये पठाण लोकांचा अधिक भरणा होता; पण पुढे पुढे सर्व जातिजमातीमधील लोक त्यांत सामील झाले. पुष्कळदा रयतेकडून खंड वसूल करण्याचे काम त्यांच्याकडे सोपविले जाई. त्यातील काही भाग त्यांना मिळे. त्यांना नियमित वेतन नसे. खंडणी वसुलीसाठी ते मारहाण, दहशत, लुटालूट वगैरे मार्ग अवलंबित. त्यामुळे रयतेत त्यांच्याविषयी दहशत असे.

घोडा, लांब भाला (सु. ३.५ मी.) व तलवार हा त्यांचा मुख्य संरजाम असे. मोडकी पिस्तुले व बंदुकाही काहीजण वापरीत. दिवसाकाठी ५० ते ६० किमी. पर्यंत ते मजल मारीत. मुक्कामासाठी त्यांच्याजवळ तंबू, राहुट्या, पाले इ. सामान नसे. शत्रूवर पद्धतशीर हल्ला करण्याइतके ते खचितच शूर नव्हते; पण सैन्य जाऊ शकणार नाही, अशा दुर्गम मार्गाने ते जात व अचानक हल्ले करून लूटमार करीत व धनधान्य नेत आणि जे पदार्थ नेता येत नसत, त्यांचा नाश करीत. त्यांच्या टोळ्यांना दुर्रे म्हणत. पेंढाऱ्यांच्या लहान टोळ्या लुटीला सोयीच्या असत. लूट, जाळपोळ, अनन्वित अत्याचार यांबद्दल त्यांची कुप्रसिद्धी होती. कित्येकदा एखाद्या गावास पूर्वसूचना देऊन ते खंड वसूल करीत व खंड न दिल्यास ते गाव जाळून टाकत.

उत्तर पेशवाईत पेंढारी हे मराठी सैन्याचा एक भाग बनू लागले. त्यांत मुसलमान-हिंदू अशा दोन्ही धर्मांचे लोक होते; पण दक्षिणी मुसलमान अधिक होते. त्यांच्या बायका सामान्यत: हिंदू ग्रामदेवतांची उपासना करीत. स्वारीहून परतल्यावर पुष्कळजण शेतीही करीत. चिंगोळी व हुलस्वार हे पेंढारी-पुढारी आपल्या अनुयायांसह पानिपतच्या युद्धात मराठी सैन्यात होते. इंग्रजी अमंलात पदच्युत झालेले संस्थानिक त्यांचे साहाय्य घेत. शिंदे-होळकरांकडील पेंढारी शिंदेशाही व होळकरशाही म्हणून ओळखले जात. टिपू व फ्रेंच यांचा पराभव झाल्यावर त्यांच्या विसर्जित सैन्यातून काही पेंढारी पथके बनली. एकोणिसाव्या शतकात काही संस्थाने खालसा होऊन इंग्रजी राज्य जसजसे दृढ होऊ लागले, तसतसे पेंढाऱ्यांचे आश्रयस्थान हळूहळू नाहीसे झाले. तेव्हा त्यांनी आपली स्वतंत्र पथके बनविली. हेरा व बुरन हे त्यांचे पुढारी होते. दोस्त मुहम्मद व चीतू नावाचे पुढारी पुढे प्रसिद्धीस आले. करीमखान हा पुढारी खानदानी मुसलमान कुटुंबातील होता. तो तरुणपणी प्रथम होळकरांकडे व नंतर शिंद्यांकडे गेला. शिंदे, भोसले व भोपाळचे नबाब यांच्याकडून तो पैसे घेई व लूट मिळवी. त्याच्या ताब्यात अनेक किल्ले होते. पुढे तो शिंद्यांनाही वरचढ झाल्यामुळे त्यांनी चीतूमार्फत त्याचा पराभव घडवून आणला. पुढे तो अमीरखानाकडे गेला. अमीरखान यशवंतराव होळकरांचा उजवा हात होता. वासिल मुहम्मद, नामदारखान, मीरखान इ. पेंढारी पुढारीही प्रसिद्ध होते. चीतूजवळ काही हजार घोडेस्वार, थोडे पायदळ व वीस मोडक्या तोफा होत्या. कादरबक्ष साहिबखान, शेखदुल्ला हे दुय्यम नेते होते. कोकणपासून ओरिसापर्यंतच्या प्रदेशांत त्यांनी धुमाकूळ घातला. मराठ्यांच्या साहचर्यातील पेंढाऱ्यांच्या लुटारूपणामुळे मराठेही लुटारू म्हणून बदनाम झाले. पेंढाऱ्यांचा कायमचा बंदोबस्त लॉर्ड फ्रान्सिस रॉडन हेस्टिंग्जने केला (१८१८). त्याने अमीरखान व करीमखान यांना जहागिरी देऊन फोडले व इतर पेंढाऱ्यांचा बीमोड केला. यातूनच पुढे टोंक संस्थान उदयास आले. काही पेंढारी युद्धात मारले गेले, तर काही कायमचे अज्ञातवासात गेले. त्यामुळे उरलेल्यांनी लुटीचा व्यवसाय सोडला आणि ते मध्य प्रदेशात स्थायिक शेती करू लागले.