पावनखिंड

महाराष्ट्रात पन्हाळगड आणि विशाळगड यांच्यामधील रस्त्यावर असलेली खिंड

पावनखिंड तथा घोडखिंड ही महाराष्ट्रात पन्हाळगड आणि विशाळगड यांच्यामधील रस्त्यावर असलेली खिंड आहे. अतिशय अवघड व अरुंद असलेली ही खिंड या दोन्ही किल्ल्यांमधील अंतर कमी करते.

पावनखिंड
 
पावनखिंडीतील लढाईपूर्वी शिवाजी महाराज आणि बाजी प्रभू देशपांडे यांच्या मधील संभाषण.

दोन उंच डोंगरांच्या मध्ये असलेल्या या खिंडीतील वाट इतकी अरुंद आहे येथून एकावेळी फक्त एक घोडेस्वार पार जाऊ शकतो. हत्ती, मेणे किंवा इतर वाहनांनी ही खिंड पार करणे अशक्य आहे. यामुळे या खिंडीला घोडखिंड असे नाव आहे. १३ जुलै, १६६० रोजी पन्हाळगडाला पडलेल्या वेढ्यातून निसटून निघालेले शिवाजी महाराज विशाळगडाकडे जात असताना सिद्दी मसूदच्या सैन्याने त्यांना येथे गाठले. तेव्हा झालेल्या निकराच्या लढाईत बाजी प्रभू देशपांडे, त्यांचे भाऊ फुलाजी देशपांडे व त्यांच्यासह मोजक्या सैनिकांनी ही खिंड जबरी लढवली व आदिलशाही सैन्याला थोपवून धरले. यामुळे शिवाजी महाराजांना विशाळगड गाठणे शक्य झाले. यात प्रभू देशपांडे भावंडे व त्यांच्यासह मागे थांबून शेवटचा एल्गार (लास्ट स्टॅन्ड) करणाऱ्या त्यांच्या बव्हंश सैन्याने मरण पत्करले. त्यांच्या या बलिदानाची आठवण म्हणून या खिंडीला पावनखिंड असे नाव दिले गेले.

इतिहास

संपादन

इ.स.२ मार्च १६६० रोजी सिद्दी जोहरने पन्हाळयास वेढा दिला होता यावेळी छत्रपती शिवाजीराजे पन्हाळा किल्ल्यावर अडकून पडले होते.मुसळधार पावसात सुद्धा सिद्दी वेढा सोडावयास तयार नव्हता.या कठीण प्रसंगी महाराजांनी सिद्धीस तहाचा निरोप धाडला त्यामुळे सिद्धी गाफील राहिला.शिवा काशीद नावाच्या मावळ्याने छत्रपतींच्या वेशात सिद्दी जौहर यास तहाची बोलणी करण्यात गुंतवून छत्रपतींना पन्हाळ्याहून निसटण्यास पुरेसा अवधी दिला.शिवा काशीदचे खरे रूप कळल्यावर सिद्धीने त्यांस ठार केले,तोवर छत्रपती विशाळगडाच्या वाटेवर होते.

छत्रपती शिवरायांनी पन्हाळ्यावरून,विशाळगडाकडे पलायन केल्याचे समजल्या- नंतर,सिद्दीने,सिद्दी मसूदला छत्रपतींच्या मागावर पाठवले व त्यांचा पाठलाग चालू झाला.मसूदच्या सैन्याने मराठ्यांना घोडखिंडीत गाठले,अशावेळी बाजीप्रभूंनी छत्रपतींना विशाळगडावर पोहोचून तोफानी इशारा करत नाहीत तोवर ही खिंड लढवली जाईल असे सांगितले.घोडखिंडीतील अतिशय चिंचोळ्या वाटेमुळे मराठ्यांनी मसूदच्या सैनिकांची कत्तल आरंभली,शरीराला असंख्य जखमा झाल्या असतानाही बाजीप्रभू,फ़ुलाजी,संभाजी जाधव,बांदल यांनी मोठा पराक्रम गाजविला.

महाराज विशाळगडावर पोहोचल्यानंतर तोफांचा गजर झाला.इकडे घोडखिंडीत बाजीप्रभूने तोफांचा आवाज ऐकल्यानंतरच समाधानाने आपला जीव सोडला.या युद्धात मराठ्यांचे जवळपास सर्वच ३०० मावळे कामी आले तर मसूदचे जवळपास ३००० सैनिक मारले गेले.बाजीप्रभू व इतर मावळ्यांच्या पराक्रमाने घोडखिंड पावनखिंड म्हणून इतिहासात अमर झाली.

पावनखिंडीच्या लढाईचा उल्लेख शिवकालीन ऐतिहासिक कागदपत्रात सापडत नाही. शिवभारतप्रमाणे ही लढाई विशाळगडच्या पायथ्याशी गजापूरच्या घाटात झाली. तरी पण त्यामुळे बाजी प्रभू, फुलाजी आणि बांदल सेनेचा पराक्रम अजिबात कमी होत नाही. त्यांचे शौर्य आणि बलिदान अलौकिक आहे.

स्थान

संपादन

हे सुद्धा पहा

संपादन