पाटणादेवी मंदिर हे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यातील एक आदिशक्ती चंडिकादेवी चे पवित्र मंदिर आहे. चाळीसगाव शहरापासून अवघ्या 18 किमी अंतरावर नैऋत्येला असणारे हे शक्तीपीठ गौताळा अभयारण्यच्या कुशीत वसलेले आहे. वर्षभर येथे भक्तांचा राबता असला तरी नवरात्रीच्या पर्वणीवर अलोट गर्दी होते. निसर्गाच्या सान्निध्यात आदिशक्तिचा जागर मनात साठविण्यासाठी परराज्यातूनही भाविक येथे आवर्जून हजेरी लावतात.

पाटणादेवी मंदिर

मध्य रेल्वेच्या मुंबई-नासिकरोड-भुसावळ मार्गावर मनमाडनंतर चाळीसगाव हे रेल्वे स्थानक येते. चाळीसगाव एस्‌टी स्टॅन्डवरून सकाळी साडेसातपासून दर तासाला पाटणादेवीच्या बसेस सुटतात. चाळीसगाव-पाटणादेवी हे अंतर १८ किलोमीटर आहे. पाटणादेवीच्या या मंदिरात आदिशक्ति चंडिकादेवीची मूर्ती आहे.

आख्यायिका

संपादन

शके ११५० (इ.स. १२२८) मध्ये आषाढी अमावास्येला सूर्यग्रहण होते. त्या दिवशी पितरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ यादवराव खेऊणचंद्र व गोविंदराज मौर्य यांनी हे मंदिर लोकांसाठी खुले केले असा उल्लेख संत जनार्दन चरित्रात आहे. त्या काळात यादव सम्राट व त्यांचे मांडलिक राजे यांचे येथे राज्य होते.

माता सतीचे वडील दक्षप्रजापती यांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला होता. सती मुलगी असूनही तिच्यासह तिचे पती महादेव यांना त्यांनी निमंत्रण दिले नाही. असे असूनही नारदमुनींच्या सूचनेवरून माता सती यज्ञ सोहळ्यास येतात. मात्र येथे तिचा पुन्हा अपमान केला जातो. तेव्हा माता सती अपमान झाला म्हणून स्वतःच्या शरिरातील प्राण काढून घेते त्यामुळे तिचे शव यज्ञ मंडपात पडते. ही गोष्ट महादेवांना समजताच ते क्रोधीत होतात आणि तिचे शव हातात घेऊन तांडव नृत्य करु लागतात. त्यावेळी त्यांचा तिसरा नेत्रही उघडल्याने सर्वत्र थरकाप उडतो. अशावेळी त्यांना शांत करण्यासाठी भगवान विष्णू सुदर्शन चक्राने सतीच्या शवाचे तुकडे करतात. उजव्या हाताचा तुकडा पाटणा येथे पडल्याने येथे आदिशक्तिचीचे जागृत वरदहस्त शक्तिपीठ निर्माण झाल्याची आख्यायिका सांगितली जाते. देवीचे आद्य उपासक गोविंद स्वामी यांनी तपस्या करून चंडिकेला प्रसन्न केले. भक्तांसाठी उंच कड्यावरून खाली यावे अशी विनंती गोविंद स्वामींनी भगवतीला केली. यावर भगवतीने होकार देतांना गोविंद स्वामींना मागे न पाहता पुढे चालण्यास सांगितले. धवलतीर्थाजवळ त्यांना विचित्र आवाज येतो. भगवती मागे आहे की नाही हे पाहण्यासाठी ते मागे पाहतात. त्याचवेळी ती अदृश्य होते. गोविंद स्वामी पुन्हा तपश्चर्या करतात. भगवती प्रसन्न होते. कुंडात स्नान कर तेव्हा माझी स्वयंभु मुर्ती तुझ्या हातात येईल असे भगवती सांगते. पाटणादेवीच्या मंदिरात त्याच पाषाणाच्या स्वयंभु मूर्तीची स्थापना गोविंद स्वामी यांनी केली आहे. []

मंदिराची रचना

संपादन

आदिशक्तिचे मंदिर 12 व्या शतकात उभारले गेले आहे. राज्यातील हेमाडपंथीय मोठ्या मंदिरांमध्ये त्याची गणना होते. 10 ते 12 फूट उंच चौथ-यावर त्याची रचना पुर्वाभिमुख करण्यात आली आहे. गाभारा चंद्राकृती असून त्याल 28 कोपरे आहेत. 75 बाय 36 फूट मंदिराची लांबी-रुंदी तर 18 फूट उंची आहे. गाभा-यात सभामंडपामध्ये एक पुरातन शिलालेखही आहे. पाटणादेवीच्या या पुरातन मंदिरात देवीची भव्य मूर्ती आहे. देवळासमोर दोन भल्यामोठ्या दगडी दीपमाळा आहेत. मंदिरपरिसरात असलेल्या अनेक प्राचीन शिल्पाकृती पहाण्यासारख्या आहेत. शून्याचा आविष्कार करणाऱ्या प्रसिद्ध गणिती भास्कराचार्यांनी आपला लीलावती नामक ग्रंथ येथेच बसून लिहिला असा एक शिलालेख भारतीय पुरातत्त्वखात्याला मिळाला आहे. वनखात्याने [[१]] स्मरणार्थ मंदिराजवळच भास्कराचार्य निसर्ग केंद्र उभारले आहे. हे केंद्र सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत पर्यटकांसाठी खुले असते.

पाटणादेवीच्या आसपास कन्हेरगड, पितळखोरे लेणी, हेमाडपंती महादेव मंदिर, सीता न्हाणी नामक लेणे, शृंगारचौरी लेणी, धवलतीर्थ धबधबा, जैनांची नागार्जुन लेणी आणि गौताळा अभयारण्य आहे.

स्रोत संदर्भ

संपादन
  1. ^ "Patnadevi Info". 21 Sep 2017 रोजी पाहिले.