पर्यावरणपूरक किंवा परिमैत्रीपूर्ण ही संज्ञा परिसंस्थापूरक या अर्थाने मानवी वर्तनाला, कृतीला किंवा उत्पादनांना लावली जाते. या संज्ञेतून पृथ्वीवरील सजीवांना अपाय होणार नाही, परिसंस्थेतील कोणत्याही घटकावर दुष्परिणाम होणार नाही, असे मानवी वर्तन किंवा कृती असणे अभिप्रेत आहे. ही संज्ञा प्रामुख्याने ऊर्जा, जल व मृदा अशा नैसर्गिक संसाधनांच्या संधारणाच्या कृतीसाठी वापरली जाते.

मुळात पर्यावरणपूरक (environment friendly) आणि परिसंस्थापूरक किंवा परिमैत्रीपूर्ण (eco friendly) हे दोन वेगवेगळे विषय असून बहुतेक वेळा या दोन्हींचा पर्यावरणपूरक असाच अर्थ घेतला जातो. पर्यावरण (environment) हे आपल्या भोवताली असलेले सर्व सजीव (सर्व जीव) आणि निर्जीव (हवा-हवामान, पाणी, जमीन, सूर्यप्रकाश) घटकांच्या मिश्रणातून बनते. तर परिसंस्था (ecology) म्हणजे अजैविक आणि जैविक घटक यांचा एकमेकांसोबत असलेला सबंध आणि त्यांच्यातील आंतर्क्रिया होत. या दोन्ही घटकांच्या एकत्रीकरणातून जैवविविधता, अन्नसाखळी ईत्यादिंची निर्मिती होते. यातून सजीवसृष्टीस पोषक असे पर्यावरण तयार होते. प्राचीन काळातील मानव हा निसर्गाचे नियम पाळत होता, ज्यामुळे निसर्ग तसेच पर्यावरण सुरक्षित होते.[१]

परिमैत्रीपूर्ण उत्पादन पर्यावरणपूरक असते. अशा उत्पादनांमुळे जल, भूमी आणि मृदा यांच्या प्रदूषणास प्रतिबंध होतो. संसाधनांच्या वापरासाठी योग्य जाणीव ठेवून तसे कार्य करणे अशा कृतींची सवय असणे, हे परिमैत्रीचे वर्तन होय.

पर्यावरण व मानवी जीवन यांची सुरक्षा लक्षात घेऊन परिमैत्र उत्पादने तयार केली जातात. ही उत्पादने विषारी नसतात. शाश्वत रीत्या वाढणारे, वाढविल्या जाणाऱ्या घटकांचा वापर करणे आणि परिसंस्था टिकून राहतील अशा रीतीने उत्पादने घेणे, हे परिमैत्रीमध्ये घडते. यात सेंद्रिय घटक किंवा पदार्थांची वाढ ही विषारी कीटकनाशके व तणनाशके यांचा वापर न करता केलेली असते. काही उत्पादने काच, लाकूड, धातू किंवा प्लॅस्टिक ही पुनर्चक्रीकरणाने तयार होतात. त्यांच्या अपशिष्टापासून नव्या वस्तू वापरासाठी तयार केल्या जातात. स्वतःजवळील असलेल्या संसाधनांचा कमीत कमी वापर करून परिमैत्रीपूर्ण सवयी जोपासता येतात.[२][३]

संदर्भ संपादन

  1. ^ "पर्यावरण आणि परिसंस्था". महाराष्ट्र टाइम्स. २० ऑक्टोबर २०२३ रोजी पाहिले.
  2. ^ "परिमैत्रीपूर्ण". मराठी विश्वकोश. २० ऑक्टोबर २०२३ रोजी पाहिले.
  3. ^ "पर्यावरण पूरक विकासाकडे ..." २० ऑक्टोबर २०२३ रोजी पाहिले.