सर्वसामान्य परीचे अद‌्भुतरम्य, चमत्कृतिपूर्ण व स्वप्नरंजनात्मक कल्पनाविश्व ज्यात साकार झालेले असते, असा बालवाङ‌्मयातील एक लोकप्रिय कथाप्रकार. पर म्हणजे पंख असलेली ती परी. परी हा शब्द मूळ फार्सी असून तो इराणी प्रवाशांद्वारे इसवीसनाच्या प्रारंभी भारतात आला. फार्सीतल्या परीला मोराचे पंख, घोड्याचे शरीर व आकर्षक मानवी चेहरा कल्पिलेला असे. भारतीय पुराणांतील अप्सरांच्या वर्णनानुसार पुढे भारतीय परी दिसण्यात, एखाद्या छोट्या, अत्यंत नाजूक व मोहक राजकन्येसारखी पण मनोहर पंख असलेली अशी कल्पिली गेली. परीला ‘फेअरी’ असा इंग्रजी शब्द आहे. त्याचे मूळ लॅटिन ‘fata’ (रोमन देवतानिदर्शक) या शब्दात सापडते. या शब्दाचे जुने फ्रेंच रूप ‘faerie’ असून त्याचा अर्थ जादू, भुरळ वा चेटूक असा आहे.

जगात परीला सामान्यपणे मानवसदृश, सचेतन, अद‌्भुत शक्ती असलेली, चांगल्या मुलांवर माया करणारी अशी कल्पिली आहे. जागतिक परिकथावाङ्मयात पऱ्‍यांची अनेकविध रूपे वर्णिली आहेत. त्यात सुष्ट पऱ्‍या आहेत, तशाच दुष्ट पऱ्‍याही आहेत. आंग्ल परी ही बहुधा उपकारकर्त्या, मातेसारख्या प्रेमळ रूपात भेटते. आयरिश परी छोटी, नाचणारी, मिस्कील असते. फ्रेंच ‘fee’ ही बहुधा सुंदर युवती असते तर जर्मन परी वृद्ध, समजूतदार व शहाणी. स्पॅनिश ‘fada’ ही भुरळ घालणारी परी.ती कधीकधी दुष्ट व कुरूपही असते. इटालियन ‘fata’ ही अशारिरी नियतीचे रूप धारण करते. अशा भिन्नभिन्न परीरूपांमुळे देशोदेशीच्या परीकथांची रूपेही भिन्नभिन्न व वैशिष्ट्यपूर्ण बनली आहेत. परीकथांतून पऱ्‍यांचे त्यांच्या विशिष्ट निवासस्थानांवरून पाडलेले प्रकारही दृष्टोत्पत्तीस येतात. उदा., जलपरी, हिमपरी, वायुपरी, वनपरी इत्यादी. परीकथांमध्ये या पऱ्‍यांच्या अदभुतरम्य कृतींचे व आश्चर्यजनक जादूमय विश्वाचे दर्शन घडते. परीकथा विशेषेकरून लहान मुलांना फार आवडतात कारण त्या मनोरंजन करतात. शिवाय मुलांना प्रत्यक्षात जे हवेहवेसे वाटते पण मिळत नाही, ते एखादी परी त्यांना त्यांच्या स्वप्नसृष्टीत मिळवून देते. त्या दृष्टीने परीकथेतील स्वप्नरंजन रम्य व सुखद असते.

तथापि ‘परीकथा’ ही संज्ञा कित्येकदा काहीशा सैलपणाने व व्यापक अर्थानेही वापरली जाते. काही परीकथांमध्ये निर्जीव वस्तूंना सचेतन रूप दिले जाते, तर काही कथांमध्ये पशुपक्ष्यांना मानवी व्यक्तिमत्त्व कल्पिलेले असते. त्यामुळे कित्येकदा परीकथा या परीविनाही अवतरू शकतात. कार्लो कोल्लॉदीचा ‘पिनोकिओ’ हा लाकडी बाहुला जादू होऊन सचेतन होऊ शकतो पारंपरिक रशियन कथेतील ‘स्नेगुर्का’ ही हिमपुतळी सचेतन होऊन खऱ्‍याखुऱ्‍या छोट्या मुलीसारखी वागते. ⇨हॅन्स किश्चन अँडरसनचे ‘अग्ली डकलिंग’ म्हणजे बदकाचे कुरूप पिलू आणि इतर पात्रे विचार करू शकतात तसेच एकमेकांशी मानवी भाषेत बोलू शकतात. शार्ल पेरोच्या ‘सिंड्रेला’ला प्रेमळ परी व प्राणी मदत करतात. म्हणजे पऱ्‍यांची अद‌्भुत शक्ती अशी विविध रूपांत प्रगट होते. म्हणून या सर्व परीकथाच म्हणता येतील. परीकथांतील मध्यवर्ती प्रसंग गुंतागुंतीचे असले, तरी सामान्यतः शेवट आनंददायी असतो. क्वचितच वेगळा असतो. परीकथेतून बहुधा चांगल्याचाच जय होतो आणि वाईटाचा नाश होतो, हे दाखविले जाते.

मुलांचे मन हळवे व संस्कारक्षम असते. त्या दृष्टीने ज्यांचा व्यापक अर्थाने परिकथांमध्ये अंतर्भाव होऊ शकेल, अशा पंचतंत्र, हितोपदेश, ईसापच्या नीतिकथा त्यांच्या मनावर हलकेच व वेळीच सुसंस्कार करू शकतात. त्यांना व्यवहारज्ञान देऊन चांगल्या वागणुकीचे मार्गदर्शन करू शकतात. समर्थ परीकथा आपल्या कल्पनाविश्वात लहानांइतकेच मोठ्यांनाही गुंगवू शकतात. शिवाय काही परीकथांमागील मानसशास्त्र आणि तत्त्वज्ञान प्रौढांना आकर्षित करते. उदा., अँडरसनच्या ‘द स्नो क्वीन’ (म. भा. ‘हिमराणी’), ‘द लिट्ल मरमेड’ (म.भा. ‘छोटी सागरबाला’) यांसारख्या परीकथा. परीकथांचा उगम कळणे दुरापास्त आहे. पाषाणयुगातही अद‌्भुतरम्य लोककथांच्या साध्या रूपात परीकथा सांगितल्या जात. इ. स. पू. २००० वर्षापूर्वी ईजिप्तच्या पुरातन कबरींच्या उत्खननात परीकथा लिहिलेले पपायरसचे अवशेष सापडले. जगातील वेगवेगळ्या देशांतील मूळ रहिवाशांतही त्या होत्या व आहेत.