परमहंस परिव्राजक उपनिषद

हे उपनिषद् अथर्ववेदाशी संबंधित आहे. हे गद्यात्मक असून याच्यात पाच मोठे अनुच्छेद आहेत. यामध्ये परमहंस परिव्राजकाची लक्षणे, परिव्रजनाचे अधिकारी, परिव्रज्या प्राप्तीचे विधी इत्यादींचे विवेचन केलेले आहे.

या उपनिषदात त्यागाची आणि सतत भ्रमंती करणाऱ्या संन्याशांच्या जीवनाची चर्चा केलेली आहे.

उपनिषदाचा शुभारंभ पितामह ब्रह्माजींनी आपले पिता आदिनारायण यांना परमहंस परिव्राजकाविषयी केलेल्या प्रश्नाने झालेला आहे. नारायणांनी उत्तर देताना म्हणले आहे की आधी व्यक्तीने वर्णाश्रमधर्माच्या मर्यादांचे पालन केले पाहिजे. त्यानंतर क्रमशः संन्यास ग्रहण केला पाहिजे. संन्यास ग्रहणाच्या विधीचा उल्लेख करून नारायणांनी पुढे संन्यासाच्या जीवनचर्येवर प्रकाश टाकलेला आहे. ब्रह्माजींनी पुन्हा विचारल्यावर नारायणांनी ब्रह्म-प्रणवाचे रहस्य समजावताना म्हणले आहे की हा ब्रह्म-प्रणव षोडशमात्रात्मक असतो. याला चांगल्या प्रकारे जाणून घेऊन त्याची उपासना करणारा परमहंस शेवटी विदेह मुक्ती प्राप्त करून घेतो. ही स्थिती एकदा प्राप्त झाल्यावर शिखा, यज्ञोपवीत अशा उपचारांची गरज उरत नाही. त्याला अन्य मंत्र-तंत्र, उपासना, ध्यान यांचीही आवश्यकता असत नाही. तो ब्रह्म-प्रणवाच्या अनुसंधानाने सच्चिदानंद, अद्वैत, चिद्घनस्वरूप ‘मीच ब्रह्म आहे’ अशा भावनेने आपले जीवन कृतकृत्य करून घेतो.