पडौक (वनस्पती)
पडौक हा एक पानगळीचा महाकाय वृक्ष असून तो १०० फूट उंच वाढू शकतो. त्याचा बुंधा ६-७ फूट इतका तर त्याची आधारामुळे २० फुटापर्यंत पसरलेली असतात.याच्या विलोप्रमाणे झुकलेल्या फांद्या प्रकर्षाने नजरेत भरतात.संपूर्ण वृक्ष ६-१२ पर्णिका असलेल्या संयुक्त पानांनी डंबरलेला असतो.प्रत्येक पर्णिका लंबगोल असते.
हिवाळ्यात पानगळीचा मोसम संपला की वसंतात वृक्ष नव्या पालवीने भरून जातो.पोपटी,हिरव्या पानांच्या संगतीने फांद्यांच्या टोकावर काळ्यांचे घोस लहडतात.दिवसागणिक या कळ्या वाढत जातात.परंतु पूर्ण पक्व झाल्यावरही या कळ्या न फुलता स्तब्धच रहातात,जोपर्यंत या वृक्षाला येणाऱ्या पावसाची संवेदना होत नाही तोपर्यंत कळ्या उमलून संपूर्ण वृक्ष नाजूक,सुगंधी,पिवळ्या फुलांनी बहरून जातो.हा बहर केवळ एक दिवस टिकतो आणि दुसऱ्या दिवशी वृक्षाखाली असंख्य फुलांचा सडा पडतो.बहर येऊन गेल्यानंतर यशस्वी परागण झालेल्या थोडक्यात फुलांपासून टोकावर फळे येतात.मध्ये एक बी आणि सभोवती कागदी पापुद्रा अशी रचना असल्यामुळे त्यास 'pterocarpus' हे नाव प्राप्त झाले आहे.
या वृक्षाचे गाभ्याचे लाकूड लाल असते म्हणून त्याला रेडवूड म्हणतात.ते अतिशय कणखर असते.त्याचा उपयोग उत्तम दर्जाचे फर्निचर बनवण्यासाठी होतो.पडौक हा वृक्ष एक उत्तम औषधी वृक्षही असून तोंड येणे,व्रण,उष्म्याचे विकार,ताप,आमांश इ.वर त्याचा उपयोग विविध देशांत करण्यात येतो.तसेच या वृक्षापासून 'इंडियन किनो'या नावाने ओळखला जाणारा डिंकही मिळतो.
संदर्भ
संपादन- वृक्षराजी मुंबईची - डॉ.मुग्धा कर्णिक