डॉ. नरसिंह महादेव जोशी (११ जानेवारी, इ.स. १९३६:गारवडे, महाराष्ट्र - ) हे एक मराठी शिक्षणतज्ज्ञ आणि साहित्यिक आहेत. बालसाहित्य व शिक्षणक्षेत्राविषयक सखोल चिंतन हे न.म. जोशी यांचे वैशिष्ट्य आहे.

जोशी हे मूळचे पाटण तालुक्यातील गारवडे या सातारा जिल्ह्यातील छोट्या दुर्गम गावाचे आहेत. जोशी यांची लहानपणाची पहिली पाच वर्षे या गावात गेली. जोशींचे आजोबा वामन नारायण जोशी हे आनंद संगीत मंडळीत गायक-नट होते. वडील महादेव वामन जोशी हे शाहूनगरवासी नाटक मंडळीत व्यवस्थापक होते. ही कंपनी बंद पडल्यावर ते पुण्याला आले आणि आचाऱ्याचा व्यवसाय करू लागले. न.म. जोशींच्या आईचे नाव अन्‍नपूर्णा महादेव जोशी होते. त्यांनी न.म. जोशींना साताऱ्याला आणले व पहिलीत घातले. पुन्हा गारवड्याला येऊन त्यांचे दुसरीपासूनचे शिक्षण सुरू झाले. चौथीपर्यंत गावात शिकल्यावर ते पाचवी ते सातवी या वर्गांसाठी सोलापूरला आले, आठवीसाठी जळगावला, नववीसाठी सांगलीला आणि दहावीसाठी परत पुण्याला आले. काकांच्या बदल्यांमुळे त्यांचे शालेय शिक्षण अनेक ठिकाणी झाले. त्यांनी या काळात वर्तमानपत्रे टाकली.

पुस्तके

संपादन
  • आंबेडकरांचे चरित्र
  • कथानम (गौतम बुद्ध, कोलंबस, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी यांच्यापासून अगदी सामान्यांशी संबंधित बोधकथांचा संग्रह)
  • काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले? (अनुवादित, मूळ आंबेडकरलिखित What Congress & Gandhi have done to the Untouchables?)
  • चरित्रकथा (काही महान व्यक्तींच्या आयुष्यातील एकूण २६० प्रसंग)
  • जगणारी माणसं (बाल एकांकिका)
  • डॉक्टर-रोगी-यम (बाल एकांकिका)
  • तीन एकांकिका (बाल एकांकिका)
  • दत्तक राजपुत्र (बालनाट्य)
  • निश्चयाचा महामेरू (बाल एकांकिका)
  • निःस्पृह (रामशास्त्री प्रभुणे यांची चरित्रात्मक कादंबरी)
  • प्रेषित (कादंबरी)
  • फत्तेवाडीचा झुंझार (बालकादंबरी) : या कादंबरीवर आधारित एकपात्री प्रयोग झाले.
  • बखर एका सारस्वताची (आत्मचरित्र)
  • बिनखात्याचा मंत्री (बाल एकांकिका)
  • मशाल (एकांकिका)
  • मोहनदास करमचंद (चरित्रात्मक कादंबरी)
  • सह्याद्रीचा सुपुत्र (यशवंतराव चव्हाणांचे चरित्र)
  • हल्लकल्लोळ आणि इतर एकांकिका (बाल एकांकिका)
  • हिंदुत्वातील कूट प्रश्न (अनुवादित, मूळ आंबेडकर लिखित इंग्रजी, रिडल्स इन हिंदुइझम)

जोशी यांच्यासंबंधीची पुस्तके

संपादन
  • डॉ. न.म. जोशी : व्यक्ती आणि वाड्मय (लेखक - डॉ. दिलीप गरुड)

सन्मान आणि पुरस्कार

संपादन