निकोलस मदुरो
निकोलस मदुरो मोरोस हे व्हेनेझुएलाचे राजकारणी आहेत. व्हेनेझुएलाचे लोकप्रिय नेते हुगो चावेझ यांचे राजकिय वारसदार मानले जातात. हुगो चावेझ यांच्या सरकारमध्ये ते उपराष्ट्रपती आणि परराष्ट्र मंत्री होते. चावेझ यांच्या निधनानंतर मार्च २०१३ मध्ये ते काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून नियुक्त झाले. त्यानंतर झालेल्या फेरनिवडणुकांमध्ये १४ एप्रिल २०१३ रोजी निर्वाचन आयोगाने त्यांना विजयी घोषित केले.
बसचालक असलेले मदुरो कामगार संघटनांचे अध्यक्ष झाले आणि पुढे २००० मध्ये केंद्रिय मंत्री म्हणून निवडून आले. चावेझ सरकारमध्ये अनेक पदे भुषविल्यानंतर २००६ मध्ये परराष्ट्र मंत्री झाले. निकोलस हे चावेझ यांच्या आतल्या गोटातील अत्यंत खास आणि धोरणी नेते म्हणून ओळखले जात.
चावेझ यांच्या मृत्यूनंतर मदुरो यांनी सत्ता आणि राष्ट्रपती पदाचा कार्यभार संभाळला. एप्रिल २०१३ मध्ये राष्ट्रपतीपदासाठी झालेल्या मध्यवर्ती निवडणूकांमध्ये अगदी थोड्या मताधिक्याने युनायटेड सोशालिस्ट पार्टीचे उमेदवाराचा हेनरिक काप्रिलेस यांचा पराभव करून जिंकून आले. काप्रिलेस हे मिरांडा राज्याचे राज्यपाल आहेत. मदुरो यांच्या फेरनिवडणुकीवर आणि मतमोजणी प्रक्रियेवर काप्रिलेस यांनी जोरदार आक्षेप केले आहेत. मतमोजणी आणि मतदान प्रक्रियेत अनेक उणिवांकडे लक्ष वेधत त्यांनी चौकशीची मागणी केली आहे.