ना.गो. कालेलकर

भारतीय भाषाशास्त्रज्ञ

डॉ. नारायण गोविंद कालेलकर (जन्म : बांबुळी-रत्‍नागिरी, ११ डिसेंबर १९०९; - ३ मार्च १९८९) [१] ) हे एक मराठीभाषक भाषावैज्ञानिक होते. ५० च्या दशकात भाषाविज्ञान ह्या विषयाचे औपचारिक शिक्षण घेतलेल्या लेखकांनी ह्या विषयावर मराठीतून लिहायला आरंभ केला. परंतु "भाषेचा भाषा म्हणून वैज्ञानिक पद्धतीने करण्यात येणारा अभ्यास"[२] ह्या अर्थी जी भाषाविज्ञान ही संज्ञा आज वापरण्यात येते; त्याप्रकारच्या अभ्यासाचा आरंभ त्या काळात झाला. ह्या नव्या अभ्यासशाखेचा परिचय करून देणारे लेखन मराठीत करणाऱ्या लेखकांपैकी डॉ. नारायण गोविंद कालेलकर हे नाव सर्वपरिचित आहे.

जन्म व शिक्षण संपादन

ना. गो. कालेलकर ह्यांचा जन्म रत्‍नागिरी जिल्ह्यातील बांबुळी येथे झाला. बडोदे, मुंबई आणि पॅरिस अशा विविध ठिकाणी त्यांचे शिक्षण पार पडले.

फ्रेंच भाषा, साहित्य आणि भाषाशास्त्राच्या अभ्यासासाठी कालेलकरांना 'सयाजीराव गायकवाड शिष्यवृत्ती' मिळाली. तिच्या आधारे १९३७ ते १९४० ह्या कालावधीत त्यांनी पॅरिस विद्यापीठात अध्ययन केले[३]. १९३९साली त्यांनी पॅरिस येथे फ्रेंच-भाषा-साहित्य-पदविका (डिप्लोमा) मिळवली[४].

बडोदे येथील महाविद्यालयात तसेच विद्यापीठात फ्रेंच भाषा व फ्रेंच साहित्य आणि भाषाविज्ञान ह्या विषयांचे अध्यापन त्यांनी १९४० ते १९५६ ह्या कालावधीत केले[४].

१९४९-१९५० ह्या कालावधीत कल्चरल एक्स्चेंज फेलो म्हणून कालेलकर पुन्हा फ्रान्सला गेले. पॅरिस विद्यापीठात त्यांनी ऋद्धिपूरवर्णनावरचा आपला प्रबंध फ्रेंच भाषेत सादर केला. १९५० ह्या वर्षी त्यांनी भाषाविज्ञान ह्या विषयातील पॅरिस विद्यापीठाची डी.लिट्. (दॉक्तर-एस-लेत्र) ही पदवी मिळवली[४] या काळात केव्हा तरी त्यांना मराठी भाषेच्या घटनेविषयी (घडणीविषयी) संशोधन करणाऱ्या प्रा. झुल ब्लोक् ह्यांचे मार्गदर्शन लाभले. आपले ध्वनिविचार हे पुस्तक डॉ. कालेलकर ह्यांनी प्रा. झुल ब्लोक् ह्यांच्या पुण्यस्मृतीस अर्पण केले आहे. आणि त्यांचा निर्देश आपले गुरू असा केला आहे[३].

डॉ. सु. मं. कत्रे ह्यांच्या प्रयत्नांतून १९५४-१९५९ ह्या काळात रॉकफेलर प्रतिष्ठानच्या आर्थिक सहकार्याने डेक्कन कॉलेज, पुणे येथे भाषाविज्ञानाचे हिवाळी आणि उन्हाळी वर्ग सुरू करण्यात आले. ह्या उपक्रमात डॉ. कालेलकरही सहभागी झाले होते.

ह्या उपक्रमाचा भाग म्हणून १९५५-१९५६ ह्या कालावधीत रॉकफेलर प्रतिष्ठानची ज्येष्ठ अभ्यासवृत्ती मिळवून डॉ. कालेलकर ह्यांना अमेरिकेतील येल विद्यापीठाच्या भाषाविज्ञान-विभागात अध्ययन करण्याची संधी मिळाली.

अध्यापन संपादन

१९५६-१९६२ ह्या कालावधीत डेक्कन-कॉलेज-पदव्युत्तर-व-संशोधन-संस्था, पुणे येथे इंडो-आर्यन भाषांचे प्रपाठक म्हणून आणि १९६२-१९७३ ह्या कालावधीत इंडो-युरोपियन भाषांचे प्राध्यापक म्हणून डॉ. कालेलकर कार्यरत होते[४].

१९६९ ते १९७३ ह्या कालावधीत उपरोक्त संस्थेच्या भाषाविज्ञानविभागाचे प्रमुखपद डॉ. कालेलकरांनी भूषवले. त्यांच्या आधी अनुक्रमे डॉ. सु. मं. कत्रे आणि डॉ. अ. मा. घाटगे हे ह्या विभागाचे प्रमुख होते. १९७३ ह्या वर्षी डॉ. कालेलकर डेक्कन कॉलेजमधून निवृत्त झाले[४].

लेखन संपादन

१९३६ ह्या वर्षी श्री सयाजी साहित्यमालेचे २४६वे पुष्प म्हणून रिचर्ड फिक ह्यांच्या जर्मन ग्रंथाच्या डॉ. शिशिरकुमार मैत्रकृत इंग्लिश भाषांतरावरून केलेले {बुद्धकालीन भारतीय समाज} हे पुस्तक प्रकाशित झाले.[५]. ह्या पुस्तकावर लेखकाच्या नावाचा निर्देश `नारायण गोविंद कालेलकर, एम्. ए. प्राच्य विद्यामंदिर, बडोदे' असा केलेला आहे. त्यावरून कालेलकर ह्या संस्थेत काही काळ काम करत असावेत असे अनुमान निघते[३].

डॉ. कालेलकरांनी मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषांत लेखन केले. 'ध्वनिविचार' (१९५५, १९९०), 'भाषा आणि संस्कृती' (१९६२, १९८२) आणि 'भाषा : इतिहास आणि भूगोल' (१९६४, १९८५, २०००) ही त्यांची भाषाविज्ञान ह्या ज्ञानशाखेची तोंडओळख करून देणारी पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत. मराठी विश्वकोशात त्यांनी भाषा आणि भाषाविज्ञान ह्या विषयावर नोंदी लिहिल्या तसेच मराठीतील आणि इंग्लिशेतर विविध नियतकालिकांतून त्यांनी लेख आणि परीक्षणे असे लेखनही केले.

डॉ. कालेलकरांचे ध्वनिविचार हे पुस्तक डेक्कन कॉलेजच्या हॅण्डबुक सीरीज ह्या ग्रंथमालेत १८५५ साली प्रकाशित झाले. ख्यातकीर्त भाषाभ्यासक सु. मं. कत्रे ह्यांनी ह्या पुस्तकाचा उपोद्घात लिहिला आहे.

ह्याव्यतिरिक्त कंपॅरेटिव्ह मेथड इन हिस्टॉरिकल लिंग्विस्टिक्स (१९६०), पुरातत्त्व-परिचय (१९६६) हे डॉ. कालेलकरांचे अनुवादित ग्रंथ उल्लेखनीय आहेत. डेक्कन कॉलेज संशोधनसंस्थेच्या नियतकालिकातील सुशीलकुमाल दे ह्यांच्याविषयीच्या गौरवअंकाचे (१९६०) आणि संस्कृत हस्तलिखितांच्या तालिकेचे (कॅटलॉग) (१९६५) त्यांनी संपादन केले असून काही भाषाभ्यासविषयक पुस्तकांची परीक्षणेही केली आहेत. यांशिवाय अनेक फ्रेंच कथा, कविता, लेख यांचेही त्यांनी अनुवाद केले असल्याचे मराठी विश्वकोशातील त्यांच्याविषयीच्या नोंदीत[६] म्हटले आहे.

शुभदा-सारस्वत प्रकाशनाने पुनःप्रकाशित केलेल्या मोल्सवर्थकृत मराठी-इंग्रजी शब्दकोशाच्या १०व्या आवृत्तीला ना.गो. कालेलकर यांनी प्रस्तावना लिहिली होती. डेक्कन कॉलेजने प्रकाशित केलेल्या लिंग्विस्टिक्स ॲन्ड लॅंग्वेज प्लानिंग इन इंडिया या ग्रंथाचे ते संपादक होते. इ.स. १९६०मध्ये प्रकाशित झालेल्या इंडियन लिंग्विस्टिक्स या ग्रंथाच्या २१व्या खंडाचे ते एक सहसंपादक होते.

पुरस्कार संपादन

मराठी अभ्यास परिषद ही कोश, बोलींचा अभ्यास, भाषा आणि संस्कृती यांचा अभ्यास इत्यादी क्षेत्रांतील लेखनाला आणि लेखकांना २०१८ पासून दरवर्षी प्रा० ना.गो. कालेलकर यांच्या नावे पुरस्कार देते. २०१८ सालचा, रु २५,००० व सन्मानपत्र अशा स्वरूपाचा पुरस्कार प्रा० डाॅ० नरेश नाईक यांच्या 'सामवेदी बोली : संरचना आणि स्वरूप' या ग्रंथाला दिला गेलेला आहे.

यापूर्वी हा पुरस्कार मिळाले सन्मान्य लेखक संपादन

’अ डिक्शनरी ऑफ ओल्ड मराठी’ (लेखक शं.गोl. तुळपुळे आणि Anne Feldhaus), प्रा.कृ.श्री. अर्जुनवाडकर, डॉ. अशोक केळकर, ’भाषाव्यवहार आणि भाषाशिक्षण’ (संपादक सुरेंद्र गावसकर, प्रकाशक - कासेगाव एज्युकेशन सोसायटी), द.न. गोखले, वसंत आबाजी डहाके, शं.गो. तुळपुळे, डॉ. सदाशिव देव, डॉ. दिलीप धोंडगे, डॉ. भालचंद्र नेमाडे, डॉ. द.दि. पुंडे, डॉ. हरिश्चंद्र बोरकर, ’पाणिनीय व्याकरण आणि भाषा तत्त्वज्ञान’ (लेखक पं. वामनशास्त्री भागवत), डॉ. मिलिंद मालशे, ’शब्दानुबंध’ (लेखक शंकर सखाराम), ’केशवसुतांच्या कवितेचा शैलीचा वैज्ञानिक अभ्यास’ (डॉ. शकुंतला क्षीरसागरांचा अप्रकाशित प्रबंध), वगैरे.

ना.गो. कालेलकरांनी लिहिलेली पुस्तके संपादन

  • ध्वनिविचार (१९५५)
  • भाषा आणि संस्कृती (१९६०)
  • भाषा : इतिहास आणि भूगोल (१९६४)
  • Indian Linguistics
  • Linguistics and Language Planning in India : report of a seminar held at the Deccan College, Poona from 3rd April to 8th April 1967
  • Sushil Kumar De felicitation volume

ना.गो. कालेलकरांना मिळालेले पुरस्कार संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ कालेलकर १९९०, पान. दहा.
  2. ^ केळकर १९८३, पान. १४.
  3. ^ a b c टिळक २०१०, पान. १२.
  4. ^ a b c d e मुंडले १९८९, पान. १८.
  5. ^ दाते २०००, पान. ८३७.
  6. ^ जाधव.


संदर्भसूची संपादन

  • कालेलकर, नारायण गोविंद (१९५५), ध्वनिविचार, डेक्कन कॉलेज हॅण्डबुक सीरीज, , पुणे: डेक्कन कॉलेज पोस्टग्रॅज्युएट ॲण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट
  • कालेलकर, नारायण गोविंद (१९८२), भाषा आणि संस्कृती (२री ed.), मुंबई: मौज प्रकाशन गृह
  • कालेलकर, नारायण गोविंद (१९९०), ध्वनिविचार (२ री ed.), मुंबई: मौज प्रकाशन गृह
  • कालेलकर, नारायण गोविंद (२०००), भाषा : इतिहास आणि भूगोल (३ री ed.), मुंबई: मौज प्रकाशन गृह
  • केळकर, अशोक रा. (१९८३), वैखरी : भाषा आणि भाषाव्यवहार, मुंबई: मॅजेस्टिक बुक स्टॉल
  • जाधव, रा. ग., "कालेलकर, नारायण गोविंद", मराठी विश्वकोश, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिति मंडळ, २९ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले, २९ सप्टेंबर २०१७ रोजी ०१:१३ वा. पाहिल्याप्रमाणे
  • टिळक, विद्यागौरी (२०१०). "डॉ. ना. गो. कालेलकर". ललित. मुंबई: मॅजिस्टिक प्रकाशन (वर्ष ४७ : अंक ७वा): पृ. ११-२०.
  • दाते, शंकर गणेश (२०००), मराठी ग्रंथसूची [१८००-१९३७], ((पुनर्मुद्रण) ed.), मुंबई: राज्य मराठी विकास संस्था
  • मुंडले, आशा (१९८९). "माझे गुरू डॉ. कालेलकर". भाषा आणि जीवन. पुणे: मराठी अभ्यास परिषद (वर्ष ७ : अंक १ : हिवाळा): पृ. १५-१८.