नारायण मेघाजी लोखंडे
रावबहाद्दुर नारायण मेघाजी लोखंडे (जन्म : १३ ऑगस्ट, १८४८; - ९ फेब्रुवारी, इ.स. १८९७) हे एक भारतीय कामगार पुढारी होते.
नारायण मेघाजींचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील खेड (राजगुरुनगर) जवळचे कन्हेरसर. माळी शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या लोखंडे यांनी गरीब परिस्थितीतून माध्यमिक शिक्षण पुरे केले. सुरुवातीस रेल्वे खात्यात कारकून म्हणून व पुढे पोस्ट खात्यात काही काळ नोकरी केल्यावर, लोखंडे यांना मुंबईच्या मांडवी भागात एका कापड गिरणीत भांडारपालाची नोकरी मिळाली. तेथे त्यांना दहशतीच्या वातावरणात, दिवसातून १३-१४ तास काम करीत असलेले गिरणी कामगार आढळले; त्यांना आठवडयाची सुट्टीही मिळत नसे; परिणामी लोखंडे यांनी नोकरी सोडून स्वतःस कामगार चळवळीस वाहून घेण्याचे ठरविले. त्याकरिता ते कामगार वस्तीतच राहू लागले. त्यांनी बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही गिरणी कामगार संघटना २३ सप्टेंबर १८८४ रोजी स्थापन केली. ही कामगार संघटना भारतातील संघटित कामगार चळवळीची सुरुवात मानली जाते. इ.स.च्या १९व्या शतकात प्रथमच सुरू झालेल्या भारतातील स्वाभिमान कामगार चळवळीचे जनक म्हणून नारायण मेघाजी लोखंडे ओळखले जातात.
लोखंडे हे महात्मा फुल्यांनी स्थापलेल्या सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेचे अध्यक्षही होते. तसेच सत्यशोधक चळवळीतली त्यांची कामगिरीही महत्त्वपूर्ण मानली जाते.
लोखंडे यांच्या पत्नीचे नाव गोपिकाबाई व मुलाचे नाव गोपीनाथ असे होते.
याच लोखंडे यांनी आठवड्यातील सातही दिवस राबणाऱ्या कामगारांकरिता साप्ताहिक सुटीसाठी लढा दिला आणि 10 जून 1890पासून रविवार ही साप्ताहिक सुट्टी म्हणून जाहीर झाली जी आजपर्यंत चालू आहे.[१]
पत्रकारितासंपादन करा
इ.स. १८८० मध्ये पुण्यात बंद पडलेले दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचे पहिले मुखपत्र लोखंडे यांनी मुंबईत सुरू केले. हे नियतकालिक शेतकरी-कामकरी वर्गाची बाजू हिरिरीने मांडत असे; त्यांच्या हालअपेष्टांना, दुःखाला वाचा फोडून सरकारचे व जनतेचे लक्ष वेधून घेत असे. लोखंडे यांनी गुराखी या नावाचे एक दैनिकही काढले होते.
सक्तीचे शिक्षण, दारूबंदी, मागासलेल्यांना नोकरीत प्रवेश, विद्यार्थ्यांना सवलती, शेतकऱ्यांना जंगलच्या कायद्यामुळे होणारा त्रास, विधवांच्या केशवपनास बंदी वगैरे अनेक प्रश्नांना लोखंडे यांनी दीनबंधू ह्या मुखपत्रातून वाचा फोडली. रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची दुर्दशा झाली असल्याचा पहिला आवाज दीनबंधूने उठविला.[२]
सत्यशोधक समाजाचे पुरस्कर्ते आणि मुंबईतील आद्य प्रवर्तक नारायण मेघाजी लोखंडे आणि रामजी संतुजी आवटे यांनी दीनबंधूची जबाबदारी स्वीकारली. पत्रावर असलेल्या कर्जाचा बोजाही दोघांनी स्वीकारला. मुख्य जबाबदारी लोखंडे यांच्यावर होती. त्यांनी हे पत्र पुण्याहून मुंबईला नेले. ९ मे १८८० रोजी मुंबईतून दीनबंधूचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. भालेकरांना या पत्राची जबाबदारी का सोडावी लागली, याचे विवेचन या अंकात लोखंडे यांनी केले होते. अनेक अडचणी सोसून भालेकरांनी निष्ठेने हे पत्र सुरू ठेवल्याबद्दल त्यांनी यात भालेकरांचा गौरवही केला होता.
दीनबंधू मुंबईतून सुरू झाले, संपादक बदलले, तरी पत्राच्या धोरणात बदल झाला नाही. विरोधकांची पत्रावरील टीकाही तशीच सुरू राहिली. या सर्व टीकेला लोखंडे यांनी तेवढ्याच दमदारपणे उत्तर दिले. पण या टीकेमुळे लोखंडे यांचे सहकारी अस्वस्थ होत. लोखंडे हे जोतिबा, भालेकरांच्या पठडीतले निष्ठावंत कार्यकर्ते होते. आवटे यांची वृत्ती व्यापारी होती. ब्राम्हणांना आवडत नसेल, कशाला टीकेच्या फंदात पडायचे, अशी त्यांची व्यवहार पाहणारी दृष्टी होती. आपला व्यवसाय झाला, दोने पैसे गाठीला लागले, की पुरे असा व्यवहार ते पाहत. तर, ब्राम्हणांना न घाबरता त्यांच्याशी दोन हात करायला लोखंडे मागेपूढे पाहात नसत. यामुळे आवटे आणि लोखंडे यांचेच वाद होवू लागले. शेवटी आवटे बाजूला झाले. पण खचून न जाता लोखंडे जिद्दीने अखेरपर्यंत (९ फेब्रुवारी १८९७) पत्राचे काम सुरू ठेवले.[३]
दीनबंधूची मालकी बदलली पण आर्थिक अडचणी कमी झाल्या नाहीत. लोखंडे संपादक झाल्यावर वर्गणीदार वाढले. पण त्यातून खर्च भागणे शक्य नव्हते. त्यामुळे लोखंडे यांच्या मुंबईतील नरसू सायबू, रामय्या व्यंकय्या, नागू सयाजी, जाया कराडी आदी हितचिंतकांनी वर्गणी गोळा करून चार हजार रुपये जमा केले आणि कर्जाचा बोजा हलका केला. डॉ. संतुंजी रामजी लाड यांनीही आर्थिक मदत करून पत्र बंद पडू दिले नाही.
पुरस्कार आणि सन्मानसंपादन करा
- लॉर्ड लॅन्सडाऊनच्या काळात मुंबईत १८९३ मध्ये झालेल्या हिंदू-मुसलमानांच्या दंगलीत शांतता प्रस्थापित करण्याचे काम नारायण मेघाजी लोखंडे यांनी केले. या कामगिरीबद्दल इंग्रज सरकारने त्यांना ‘रावबहादूर’ ही पदवी बहाल केली.
- ब्रिटिश सरकारने लोखंडे यांनी कामगारांसाठी केलेल्या कामगिरीची दखल देऊन त्यांना ‘जे.पी.’ (जस्टिस ऑफ पीस) हा किताब देऊन त्यांचा गौरव केला.
प्लेगने मृत्यूसंपादन करा
मुंबईत इ.स. १८९६ मध्ये प्लेगची मोठी साथ उसळली. या साथीत अनेक लोक मृत्युमुखी पडले. याही वेळी पुढाकार घेऊन लोखंडे यांनी सरकारी मदतीने प्लेगग्रस्तांसाठी एक ‘मराठा इस्पितळ’ काढले; परंतु दुर्देवाने लोखंडे यांनाच प्लेगने पछाडले व त्यातच त्यांचा अंत झाला.