नारदपरिव्राजकोपनिषद

(नारद परिव्राजक उपनिषद या पानावरून पुनर्निर्देशित)

हे उपनिषद अथर्ववेदाशी संबंधित आहे. या उपनिषदात परिव्राजक-संन्यासाचे सिद्धांत, आचरणे यांचे विस्तृत वर्णन केलेले आहे. त्याच्या नावावरूनच स्पष्ट दिसते की या उपनिषदाचे उपदेशक देवर्षी नारद आहेत; जे परिव्राजकांसाठी (परितः व्रजन्ति इति परिव्राजकः) सर्वोत्कृष्ट आदर्श आहेत.

या उपनिषदात संन्याशांच्या जीवनाची चर्चा करण्यात आलेली आहे.

या उपनिषदाचे एकूण नऊ प्रखंड आहेत; ज्यांना ‘उपदेश’ अशी संज्ञा दिलेली आहे. पहिल्या उपदेशात शौनकादि अनेक ऋषींनी देवर्षी नारदांकडे संसार बंधनापासून मुक्तीचा उपाय जाणण्याची इच्छा प्रकट केली. त्यालाच उत्तर देताना नारदांनी वर्णाश्रमधर्माचे विस्तारपूर्वक विवेचन केलेले आहे. द्वितीय उपदेशात शौनकांनी संन्यासविधीविषयी नारदांना प्रश्न केलेले आहेत. तृतीय उपदेशात नारदांनी संन्यासाचा खराखुरा अधिकारी कोण? असा प्रश्न पितामहांना विचारलेला आहे. त्यानंतर आतुर संन्यासाचे विवेचन केले गेलेले आहे. चौथ्या-पाचव्या उपदेशात संन्यासधर्माच्या पालनाचे महत्त्व आणि संन्यासधर्म ग्रहण करण्याच्या शास्त्रीय विधीचे विस्तृत वर्णन केलेले आहे. सोबतच संन्याशांचे प्रकार सांगितलेले आहेत. सहाव्या उपदेशात तुरीयातीत पदाच्या प्राप्तीसाठी कोणते उपाय करावेत यावर आणि परिव्राजकाच्या जीवनचरित्रावर विस्तृत प्रकाश टाकलेला आहे. सातव्या उपदेशात संन्यासधर्माच्या सामान्य नियमांचा तसेच कुटीचक, बहूदक आदी संन्याशाच्या विशेष नियमांचा उल्लेख केलेला आहे. आठव्या उपदेशात प्रणवानुसंधानाच्या क्रमाचे विस्तृत विवेचन केलेले आहे. अंतिम नवव्या उपदेशात ब्रह्माच्या स्वरूपाचे विस्तृत वर्णन आहे. सोबतच आत्मवेत्त्या संन्याशाची लक्षणे सांगून त्याद्वारे परमपद प्राप्त करण्याच्या प्रक्रियेचे निरूपण केलेले आहे.