नाणे मावळ हा मध्ययुगीन काळातील प्रशासकीय विभाग होता. सध्याच्या भाषेत सांगायचे तर हा मध्ययुगातील एक तालुका होता. नाणे मावळ हा भाग सध्याच्या मावळ तालुक्यात येतो. मध्ययुगीन तर्फ नाणे मावळात एकूण ८८ गावे होती. ह्या तर्फेचे मुख्य गाव कसबे नाणे होते व ह्या गावावरूनच नाणे मावळ हे नाव ह्या तर्फेस मिळाले आहे. लोहगड, विसापूर, राजमाची हे किल्ले ह्या मावळात मोडत. लोहगड-विसापूर ज्या डोंगर रांगेवर आहेत, ती रांग नाणे मावळची दक्षिण सीमा होती. तर जांभिवली, उकसान, माऊ ही उत्तर सीमेवरील गावे. खंडाळा, कुरवंडे ही गावे पश्चिम सीमेवर व मंगरूळ वडगाव ही गावे पूर्व सीमेवर होती. नाणे मावळात इंद्रायणी व कुंडलिका ह्या मुख्य नद्या आहेत.

देशमुख हे तत्कालिन तालुक्यांचे प्रमुख असत. नाणे मावळचा कारभार दोन देशमुख पाहत असत. गरुड देशमुख ४४ गावांचा व दळवी देशमुख ४४ गावांचा कारभार पाहत असत. तसेच देशमुखांच्या मदतीसाठी देशपांडे किंवा देशकुलकर्णी हे वतनदार असत. नाणे मावळात दळवी देशमुखांचे दोन व गरुड देशमुखांचे दोन असे चार देशपांडे प्रत्येकी २२ गावांचा कारभार पाहत असत.