नाट्यरूप महाराष्ट्र

नाट्यरूप महाराष्ट्र हे वि.द. घाटे यांनी मुलांसाठी इ.स. १९२९मध्ये लिहिलेले एक पुस्तक आहे. हे पुस्तक इतिहासाची मानवी बाजू अधोरेखित करणारे आणि मुलांना मनोरंजकपणे इतिहास शिकविणारे पुस्तक आहे.

वि.द. घाटे यांनी या पुस्तकात इतिहासातील महत्त्वाच्या घटना नाट्यरूपाने सांगितल्या आहेत. पुस्तकातले शिवाजी-संभाजी मुलांना इतर माणसांसारखे चालता-बोलताना आढळतात.

शिवाजीचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी शेती सोडून शस्त्र हाती घेतल्यापासून औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंतच्या २२५ वर्षांतले ४३ प्रसंग नाट्यरूपाने या पुस्तकात येतात. ह्यातले काही प्रवेश फार छोटे, तर काही मोठे आहेत. सर्वात लांबीने मोठा असा प्रवेश शिवाजीच्या राज्याभिषेकाचा आहे. वेगवेगळ्या कलशांची स्थापना, गागाभट्टांनी विविध मंत्र-उच्चारणे, अष्टप्रधानांनी विविध जलांचा-द्रव्यांचा अभिषेक करणे, अशा कृती या प्रवेशात घडतात. प्रत्यक्ष सिंहासनावर आरूढ झाल्यावर छत्रपतींनी अष्टप्रधानांना वेगवेगळे किताब, पद, वेतन व इतर मानसन्मान यांची घोषणा करणे, परदेशी वकिलांनी नजराणे देणे, यांतून वाचकांच्या डोळ्यासमोर सारा प्रसंग जिवंत होतो.

औरंगजेबाचा मृत्यू हा शेवटचा प्रवेशही तेवढाच प्रत्ययकारी आहे. इतर प्रवेशांत ताराबाई, संभाजीराजे अशा व्यक्ती व शिवाजी-रामदास भेट, राजाराम महाराजांना अभिषेक असे प्रसंग येतात. संताजी-धनाजी यांच्यातील बेबनाव, संभाजीच्या काळात माजलेली फितुरी यांचेही दर्शन घडते.

खऱ्या शिक्षकाच्या भूमिकेतून केवळ इतिहासच नव्हे, तर त्यावेळच्या चालीरीती, प्रशासन, सामाजिक मूल्ये, बोलीभाषा या साऱ्यांचा परिचय विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी खूप योजनापूर्वक आणि परिश्रम घेऊन वि.द. घाटे यांनी हे लेखन केले होते.

या पुस्तकाला मुंबईतील सेकंडरी ट्रेनिंग कॉलेजचे तत्कालीन प्रिन्सिपॉल एच.आर. हॅमले यांची प्रस्तावना आहे