नांदेड जिल्ह्यातील शिलालेख

भारतीय इतिहासाचे साधने

संपादन

शिलालेख हे प्राचीन भारताच्या इतिहासाचे एक महत्त्वपूर्ण साधन मानले जाते. प्राचीन कालखंडाच्या इतिहाससाधनांत मुख्यतः पुरातत्त्वीय निरनिराळ्या वस्तूंचा समावेश होतो. उत्खननांमुळे मिळालेली भांडी, शस्त्रे, घरे व त्यांची बांधणी, ग्राम-नगरव्यवस्था, अलंकार इ. तत्कालीन समाजिक, धार्मिक व आर्थिक परिस्थितीवर प्रकाश टाकण्यास उपयुक्त आहेत. प्राचीन कालखंडात तयार झालेले विविध भाषिक ग्रंथ हेही इतिहासाचे महत्त्वाचे साधन आहे. या ग्रंथांचे समकालीन व उत्तरकालीन असे दोन भेद पडत असले, तरी ते प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रीतीने तत्कालीन इतिहासावर प्रकाश टाकतात. राजतरंगिणी, राष्ट्रौढवंशमहाकाव्य, शिवभारत इ. ग्रंथ प्रत्यक्ष इतिहास सांगतात तर हर्षचरित, विक्रमांकदेवचरित पंपभारत, मणिमेखलै इ. ग्रंथ रूपक शैलीने इतिहासकथन करतात. काही ग्रंथांच्या आरंभी किंवा अंतर्भागी किंवा अंती इतिहासविषयक माहिती मिळते. उदा., हेमाद्रिलिखित चतुर्वर्गचिंतामणि, जल्हणचा सुक्तिमुक्तावलि व प्रसिद्ध कानडी कवी पंप याचा विक्रमार्जुनविजय अथवा पंपभारत ह्या ग्रंथांच्या प्रस्तावनांत ऐतिहासिक माहिती आढळते. बसबभूपालने शिवतत्त्वरत्नाकरात मधूनमधून ऐतिहासिक माहिती गुंफली आहे तर सोमदेव सुरीने यशस्तिलकचंपूमध्ये ग्रंथाच्या शेवटी काही ऐतिहासिक माहिती दिली आहे. तथापि इतिहासकाळातील प्राचीन विभागाची साक्षात माहिती देणारे ग्रंथ एकंदरीत थोडेच आहेत. तत्कालीन राजकीय इतिहाससंबंधी माहिती देण्यास हे ग्रंथ अपुरे पडत असले, तरी इतिहासाच्या धार्मिक, सामाजिक, भाषिक ह्या विविध अगांसंबंधी माहिती देण्यास हे ग्रंथ उपयुक्त आहेत. पुराणे, रामायण, महाभारत, ही महाकाव्ये, तत्कालीन सामाजिक आचारविचार, राहणीमान, वस्त्रे, अलंकार इत्यादीसंबंधी माहिती देण्यास उपयुक्त व महत्त्वाची साधने आहेत. भारताच्या पारंपरिक इतिहासकाळातील निरनिराळ्या राजवंशांसंबंधी माहिती देण्यास पुराणे हेच एकमेव व महत्त्वाचे साधन आहे.

नांदेड जिल्ह्यातील शिलालेख

संपादन

गोदावरी नदीच्या खोऱ्यात आणि विशेषतः नांदेड जिल्ह्याच्या परिसरातील शिलालेखांचा शोध घेता, आजपावेतो ५० शिलालेख सापडलेले आहेत. यापैकी काहींची नोंद एपिग्राफिया इंडिया या संशोधनपर ग्रंथमालेत झाली आहे.[]तरीही मौर्य, सातवाहन, गुप्त व वाकाटक या प्राचीन राजघराण्याचे शिलालेख अजून पर्यंत सापडलेले नाहीत.

नांदेड जिल्ह्यातील उपलब्ध शिलालेखांचा अभ्यास करता असे आढळते की, आठव्या शतकांपासून अठराव्या शतकांपर्यंत म्हणजेत या एक हजार वर्षाच्या कालावधीत हे शिलालेख कोरले गेले आहेत. दक्षिण भारतातील प्रमुख राजघराण्यापैकी राष्ट्रकूट, उत्तर चालुक्य, कलचुरी आणि यादव या घराण्यांचे हे शिलालेख होत. या शिलालेखात एका ओळीच्या शिलालेखापासून ते सविस्तर वर्णन असणाऱ्या विस्तृत अशा शिलालेखापर्यंत अनेक प्रकारचे आढळतात.

चित्र:नांदेड जिल्हा शिलालेख नकशा.jpg
नांदेडचा नकाशा

काही राजांचे प्रशस्तिपर शिलालेखही या परिसरात उपलब्ध झाले आहेत.या प्रशस्तीपर शिलालेखाची भाषा बी अत्यंत लालित्यपूर्ण आहे. तसेच गद्य आणि पद्यातल्या अप्रतिम रचना काही शिलालेखातही आढळतात.[]

या परिसरातील उपलब्ध शिलालेखांपैकी बहुसंख्य शिलालेख हे कानडी लिपीत आहेत. ते सर्वच चालुक्यवंशीय असून काही शिलालेखांची भाषा आणि लिपी दोनिही कानडी आहेत. तर काहींची लिपी कानडी आहे आणि भाषा संस्कृत आहे. तर काही शिलालेख मराठी भाषेत आहेत, लेखन नागरी लिपीत केले आहेत.संस्कृत शिलालेखांची अक्षरवाटीका अत्यंत प्रमाणबद्ध असून कानडी लिपीतील शिलालेख कोरताना कोरवयांनी तीच कसब दाखवली आहे. []

प्राचीनतम् शिलालेख

संपादन

कंधार येथे इसवी सन १९५८ साली सापडलेला प्राचीनतम् शिलालेख हा आतापर्यंत उपलब्ध झालेल्या शिलालेखांपैकी एक होय. हा शिलालेख कंधार गावच्या वेशीजवळ असलेल्या बौद्ध मंदिरात असलेल्या बुद्धमुर्तीच्या आसनपीठावर कोरलेला आहे. हा शिलालेख नागरी लिपीतील असून फक्त दोन ओळींचा आहे. ह्या शिलालेखात बौद्ध तत्त्वज्ञानातील हेतुवादाचे विवेचन संस्कृत रचनेत करण्यात आले आहे. [] 'हे धर्मा हेतुप्रभवा हेतु तेषां तथा गतोहयवदत तेषांच यो निरोध:एवं वादी महाश्रमण' ह्या रचना असलेला शिलालेख राष्ट्रकुट काळातील असून सध्या कंधार शहराच्या मध्यभागी बौद्धद्वार वेशीजवळ असलेल्या बौद्धविहारात आहे. हा शिलालेख आठव्या शतकातील असून ती आजही बुधवार वेस म्हणून परिचित आहे.[]

राष्ट्रकुटांचे शिलालेख

संपादन

नांदेड जिल्ह्यातील सर्वात प्राचीन प्रभावी सत्ता राष्ट्रकुटांच्या स्वरूपात प्रस्थापित झाली. प्रारंभीच्या काळात राष्ट्रकुटाच्या हालचाली वेरूळच्या परिसरात केंद्रित झाल्या तसेच याच काळात नांदेड आणि उस्मानाबाद परिसरातही राष्ट्रकुटांचा प्रभाव दर्शविणारे काही संदर्भ ताम्रपटातून उपलब्ध झाले.

१९५७ साली नांदेड जिल्ह्यातील कंधार या ठिकाणी राष्ट्रकुटकालीन सापडला.

चित्र:कंधारचा राष्ट्रकुटकालीन शिलालेख.jpg
कंधारचा राष्ट्रकुटकालीन शिलालेख

कंधारचा हा राष्ट्रकुटकालीन शिलालेख एका दगडी चौकोनी खांबावर- खांबाच्या तीन बाजूस कोरलेला असून या खांबाचा खालचा भाग तुटलेला असल्याने उपलब्ध झाला नाही. अडीच-तीन फूट उंचीचा जो भाग उपलब्ध झाला त्या भागातील शिलालेखाच्या अक्षरवाटिकेवरून हा शिलालेख राष्ट्रकुट राजा तिसरा कृष्ण(इ. स. ९३९-९६८) यांच्या कालखंडातील असावा असा निष्कर्ष डॉ. डी. सी. सकरार, आणि जी. भट्टाचार्य यांनी काढला आहे. [] या शिलालेखात कंधारचे अप्रतिम वर्णन करण्यात आले आहे. कंधार येथील शिलालेखांमध्ये राष्ट्रकूटकालीन नगररचनेचा आराखडा एकप्रकारे नोंदविला गेला होता व जाणीवपूर्वक या स्थानाचा विकास केला होता. या स्थानाचे भौगोलिक महत्त्व, भूस्थळ रचना व पर्यावरणाचा अभ्यास करून, जलाशयांसाठी सुयोग्य अशा स्थानाची निवड करून 'हत्तीनाला' हा एक जलप्रवाह अडवून तेथे कृष्ण दुसरा यांच्या काळातच 'जलतुंग समुद्र' या जलाशयाची निर्मिती करण्यात आली होती. यासाठी जवळपास ८५० मी. लांबीचा मातीचा बंधारा बांधण्यात आला व या परिसरातील 'मण्यार नदी' व हा जलाशय यातील उंच-सखल भागाचा योग्य उपयोग करून बंधारे तसेच विविध बारवांची एक शृंखला निर्माण केली गेली. परिणाम म्हणून मण्यार ही मांजरीची उपनदी व त्या काठावर असलेला हा संपूर्ण परिसर हा पाणलोट क्षेत्राचा भाग बनवून विकसित केला गेला.[] प्राचीन भारताच्या इतिहासात उल्लेखनीय भर टाकणारा एक महत्त्वाचा शिलालेख म्हणून ह्या शिलालेखाचा उल्लेख करावा लागेल. ह्या शिलालेखाच्या उपलब्धतेमुळेच कंधार हे राष्ट्रकुटांची राजधानी होती हे सिद्ध झाले आहे. कारण या काळी अस्तित्वात असलेल्या देवळांचे, मकरतोरणांचे आणि सर्वलोकेश्वर मंडपाचे वर्णन या शिलालेखात करण्यात आलेले आहे. राष्ट्रकुट राजांनी केलेल्या लोकोपयोगी कामांचे उल्लेख शिलालेखातून येतात.[]

उत्तर चालुक्याचे कानडी शिलालेख

संपादन

नांदेड परिसरात उत्तर चालुक्याचे एकूण बत्तील शिलालेख आजपर्यंत उपलब्ध झाले आहेत. यातील बहुसंख्य शिलालेख हे कानडी भाषेतील आहेत. राष्ट्रकुटाच्या नंतर नांदेड जिल्ह्यात कल्याणीच्या चालुक्याची राजवट सुरू झाली. ही बाब ह्या शिलाेखामुळे सिद्ध होते. हे सर्व शिलालेख कल्याणीच्या चालुक्य नृपती संबंधीचे आहेत. कल्याणी येथे उत्तर चालुक्याची राजधानी स्थापन करणारा पहिला सोमेश्वर[इ.स. १०४३-१०६८] यांच्या कालखंडापासून ते जगदेकमल्ल दुसरा [११३८-११५१] यांच्या कालखंडापर्यंत जवळपास शंभर वर्षाच्या कालावधीत नांदेड जिल्ह्यात ३६ शिलालेख सापडले आहेत.[] या घराण्यातील पहिला शिलालेख देगलूर तालुक्यातील तडखेल या गावी सापडला. हा शिलालेख तडखेल या गावच्या पूर्वेस महादेवाच्या मंदिराजवळ ठेवलेला आहे. [१०] हा शिलालेख कूपच विस्तृत असून सोश्वर व नागवर्मा यांच्या विजयाचे सविस्तर वर्णन यात केले आहे. लिखनाचे स्वरूप प्रशस्तिपर असून सोमेश्वरांच्या एकूण कार्याचा यात आढावा घेण्यात आला आहे. ह्या शिलालेखाचे वैशिष्ठ्ये म्हणजे हा शिलालेख कोरल्याचे वर्ष त्यात स्पष्टपणे नोंदवले असून सर्वजित संवत्सरातील शके ९६९ या वर्षात वैशाख शुद्ध तृत्तीयेस बुधवारी हा शिलालेख कोरवला गेला अशा प्रकारची नोंद ह्या शिलालेखात आहे. या शिलालेखामुळे चालुक्य सेनापती नागवर्मा ह्यांचे कर्तृत्त्व प्रकाशात आले एसून त्यांनी मिळवलेल्या अनेक विजयाचा उल्लेख ह्या शिलालेखात येतो. मुखेड तालुक्याचील मुखेड या गावीच विक्रमादित्याचा एक शिलालेख सापडला आहे. विक्रमादित्यांचे बहुतांश सिलालेख हे कानडी लिपीत व कानडी भाषेत लिहिले गेले असून एकमेव अपवाद संगम येथील शिलालेखाचा असून हा शिलालेख नागरी लिपीत व संस्कृत भाषेत कोरवला गेला आहे.

कलचुरी शिलालेख

संपादन

बाराव्या शतकाच्या सुमारास नांदेड जिल्ह्यातून चालुक्याची राजवट नाहिशी झाली. चालुक्य राजवटीस हुसकावून लावून कलचुरींनी काही काळ आपला प्रभाव नांदेड येथे प्रस्थापित केला असावा. नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील जुन्नी या गावी कलचुरींचा एकमेव शिलालेख सापडला आहे. हा शिलालेख म्हणजे एक स्तंभलेखच असून खांबाच्या तीन बाजूस तो कोरण्यात आला आहे.[११] जुन्नवलीगे म्हणजेच आजचे जुन्नी. या ठिकाणच्या काही देवालयांना दिलेल्या दानाचा उल्लेख ह्या शिलालेखात आहे. सुवर्णवृषभध्वज आणि कालिंजरपूरवराधिश्वर यासारख्या उपाधींचा वापर या शिलालेखात आठळतो.

यादवकालीन शिलालेख

संपादन

कलचुरीनंतर नांदेड जिल्ह्यावर यादवांचे प्रभुत्व प्रस्थापित झाले. नांदेड जिल्ह्यात सापडलेल्या शिलालेखावरून असे स्पष्ट होते की यादवांचे मांडलिक रट्टवंशीय बल्लाळ हे या परिसरात राज्य करीत होते. या बल्लाळ राजाची राजधानी अमरदकपूर येथे होती. तर राज्यातील एक प्रमुख केंद्र अर्धापूर हे होते. यादव नृपती भिल्लम पाचवा यांचा एक शिलालेख नांदेड शहरापासून बावीस किलोमीटर अंतरावर सलेल्या अर्धापूर या ठिकाणी सापडला आहे. [१२] या सिलालेखात रट्टवंशीय बल्लाळांची वंशावळ आणि त्यांनी दिलेल्या भूमिदानाचे उल्लेख केलेले आहेत. इ. स. बाराव्या शतकातील अर्धापूरचे सविस्तर वर्णन या शिलालेखात आढळते. या शिलालेखाचा रचयिता, लेखक आणि कोरक ह्यांचे उल्लेखही यात आलेले आहेत. हा शिलालेख अर्धापूर गावाच्या पश्चिमेस एका शेतातील चिंचेच्या झाडाखाली असलेल्या उद्धस्त मंदिराजवळ ठेवण्यात आला आहे. किनवट तालुक्यातील उनकेश्वर या ठिकाणी रामचंद्र यादवाच्या काळातला एक शिलालेख उपलब्ध झाला आहे. प्राचीन मराठी कोरीव लेखातील एक महत्त्वपूर्ण लेख म्हणून याचा उल्लेख करावा लागेल. [१३] इ. स. १२८०-८१ सालातील हा शिलालेख म्हणजे नांदेड परिसरातील शेवटचा यादवकालीन शिलालेख होय.

पर्शियन आणि अरेबिक शिलालेख

संपादन

इ.स. चौदाव्या शतकात नांदेड परिसरावर मोहम्मद तुघलक यांचा प्रभाव प्रस्थापित झाला. कालांतराने बहामनी वर्चस्वाखाली नांदेड परिसर आला, आणि बिदर प्रांतातील भाग म्हणून नांदेड सुभा प्रस्तापित झाला. या बहामनी कालखंडातील अनेक महत्त्वाच्या घडामोडी कंधार परिसरात सापडल्या आहेत. त्याचप्रमाणे निझामशाही, बरीदशाही आणि इमादशाही या दक्षिणी सत्तांनीही नांदेड परिसरात शिरकाव केलेला होता. पुढे मोघलांचाही प्रभाव नांदेड परिसरात राहिला. कंधार या गावी या कालखंडातील काही शिलालेख उपलब्ध असून हे सर्व शिलालेख पर्शियन व अरेबिक या भाषेत असून कंधारच्या किल्ल्यात आणि गावातील दर्ग्यावर आढळतात.[१४] कंधारच्या किल्ल्यात असलेल्या शिलालेखावरून या परिसरातील मध्ययुगीन कालखंडाच्या अनेक घडामोडीवर प्रकाश पडतो. कंधारच्या किल्ल्यावरील बुरूजांची बांधणी, डागडुगी या विषयीचे संदर्भ या शिलालेखातून आढळतात.

संदर्भग्रंथ

संपादन
  1. ^ Dr. Ritti & G. C. Shelke, Inscriptions from Nanded Dist. 1968
  2. ^ राजन, अमिताभ, गाडगीळ, स. रा. आणि इतर, स्थानिक इतिहास आणि साहित्य : एक शोध - नांदेड, प्रकाशक- नांदेड जिल्हा संदर्भ ग्रंथ समिती, प्रकाशन वर्ष- १ मे, १९८६, पृष्ठ- ४४
  3. ^ राजन, अमिताभ, गाडगीळ, स. रा. आणि इतर, स्थानिक इतिहास आणि साहित्य : एक शोध - नांदेड, प्रकाशक- नांदेड जिल्हा संदर्भ ग्रंथ समिती, प्रकाशन वर्ष- १ मे, १९८६, पृष्ठ- ४५
  4. ^ कठारे, अनिल, दळवे, अरुण, राष्ट्रकुटांची राजधानी कंधार, पृष्ठ-११७
  5. ^ https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/history-of-kandhar/articleshow/59399344.cms[permanent dead link]
  6. ^ Dr. D. C. Sircar & Bhattacharya, Epigraphia Indica Vol. XXXV, Pg. 105
  7. ^ https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/history-of-kandhar/articleshow/59399344.cms[permanent dead link]
  8. ^ राजन, अमिताभ, गाडगीळ, स. रा. आणि इतर, स्थानिक इतिहास आणि साहित्य : एक शोध - नांदेड, प्रकाशक- नांदेड जिल्हा संदर्भ ग्रंथ समिती, प्रकाशन वर्ष- १ मे, १९८६, पृष्ठ- ४६
  9. ^ राजन, अमिताभ, गाडगीळ, स. रा. आणि इतर, स्थानिक इतिहास आणि साहित्य : एक शोध - नांदेड, प्रकाशक- नांदेड जिल्हा संदर्भ ग्रंथ समिती, प्रकाशन वर्ष- १ मे, १९८६, पृष्ठ- ४६
  10. ^ Dr. Ritti & G. C. Shelke, Inscriptions n0.3
  11. ^ Dr. ritti & Shelke, Opp. Cit.pp-29
  12. ^ Dr. ritti & Shelke Opp. Cit pp - 40
  13. ^ तुळपुळे, शं. गो. प्राचीन मराठी कोरीव लेख, पृष्ठ-२०१
  14. ^ राजन, अमिताभ, गाडगीळ, स. रा. आणि इतर, स्थानिक इतिहास आणि साहित्य : एक शोध - नांदेड, प्रकाशक- नांदेड जिल्हा संदर्भ ग्रंथ समिती, प्रकाशन वर्ष- १ मे, १९८६, पृष्ठ- ५०

बाह्य दुवे

संपादन

https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/history-of-kandhar/articleshow/59399344.cms[permanent dead link]