नांदेड जिल्ह्यातील मूर्तिशिल्पे
सातवाहन कालखंडापासून ते १३ व्या शतकापर्यंत नांदेड जिल्ह्यातील मूर्तिशिल्पांचा आढावा घेता या जिल्ह्यात एकापेक्षा एक सरस शिल्पे पाहावयास मिळतात. नांदेड परिसरात शैव, वैष्णव, शाक्त, सौर व गाणपत्य इत्यादी संप्रदायांच्या मूर्ती वा प्रतिमा लेण्यांमधून, देवळाच्या देवकोष्ठातून अथवा मंदिराच्या परिसरात उपेक्षित अवस्थेत बघावयास मिळतात.
वैष्णव मूर्ती
संपादनशिऊर येथील विष्णूप्रतिमा
संपादनगुप्त वाकाटककालीन शिऊरच्या लेण्यात विष्णूच्या २४ प्रकारापैकी केशव पद्मनाथ, आणि वासुदेव मूर्ती उपलब्ध झाल्या आहेत.[१] ह्या मूर्ती एकेकाळी अतिशय चांगल्या असाव्यात. सध्या त्या फार झडल्या आहेत.
केशव
संपादनविष्णूप्रतिमांपैकी केशवाची प्रतिमा लेणी क्र. २ मध्ये मध्यभागाच्या खांबावर कोरलेली आहे. ही प्रतिमा अलंकाराने समृद्ध असली तरी कलाकौशल्याच्या बाबतीत म्हणावी तितकी चांगली नाही. मूर्तीच्या वरच्या हातात शंख तर खालच्या हातात गदा आणि पद्म आहे. रुपमंडन या ग्रंथाप्रमाणे पद्म, शंख, चक्र आणि गदा ज्या मूर्तीच्या हातात आहे ती मूर्ती केशवाची होय.[२]या मूर्तीच्या वरच्या हातातील आयुधे तुटलेले असले तरी मूर्तीशास्त्राच्या संकेताप्रमाणे उपलब्ध लक्षणावरून ही मूर्ती विष्णूमूर्तीप्रकारातील केशवाची ठरते.
पद्मनाथ
संपादनशिऊर येथील लेणी क्रमांक ३ मधील उत्तराभिमुखी असलेल्या मध्य भागाच्या खांबावर ही मूर्ती कोरलेली आहे. मूर्ती अलंकृत असून मूर्तीच्या खालच्या उजव्या हातात शंख व खालच्या डाव्या हातात गदा आहे. इतर दोन हात भंगलेले आहेत. रुपमंडन या ग्रंथाप्रमाणे पद्म, शंख, चक्र आणि गदा ज्या मूर्तीच्या हातात आहे.त्यावरून ही मूर्ती पद्मनाथाची असावी. [३]
वासुदेव
संपादननांदेड जिल्हा परिसरातील शिऊर येथील लेणी क्रमांक १ च्या स्तंभावर ही मूर्ती कोरलेली आहे. ही मूर्ती म्हणजे विष्णूच्या २४ प्रकारापैकी हा चौदावा मूर्तीप्रकार होय. मूर्ती समभंग असून वरच्या दोन्ही हातात संख व चक्र धारम केलेले आहे. खालचे दोन्हीही हात तुटलेले आहे. वासुदेवांनी धारण केलेली आयुधे रुपमंडन या ग्रंथाप्रमाणे पद्म, शंख, चक्र आणि गदा आहेत. त्यामुळे ही मूर्ती वासुदेवाची होय. डॉ. प्रभाकर देव यांनी शिऊर येथील लेण्यांवरील लेखात या सर्व मूर्तींना विष्णू असे संबोधले आहे.[४]
चालुक्य, यादवकालीन मंदिरातील विष्णूमूर्ती
संपादननांदेड जिल्ह्यातील होट्टल, अर्धापूर, खानापूर, मुखेड या ठिकाणी चालुक्य आणि यादवकालीन मंदिराच्या बाह्यभिंतीवर काही विष्णूमूर्ती कोरलेल्या आढळतात. त्यापैकी केशवाची एकमेव मूर्ती अर्धापूरात आहे. नांदेड-नागपूर रस्त्यालगत २२ कि. मी. अंतरावर अर्धापूर हे गाव असून ह्या गावाच्या मध्यभागी असलेल्या केशवाच्या पडक्या देवळात ही मूर्ती ठेवलेली आहे.
केशवाची मूर्ती ही काळ्याभोर पाषाणाची असून चारही हाताची समभंग स्थानक आहे. खालचा हात वरदहस्त असून त्यात अक्षमाला धारण केली आहे. वरच्या दोन्ही हातात शंख आणि चक्र असून खालच्या डाव्या हातात गदा आहे. या मूर्तीने किरीट मुकुट धारण केला असून मकरकुंडले, वैजयंतीमाला, अंगद, उरुसूत्र, मेखला इत्यादी दागिण्यांनी ही मूर्ती अलंकृत झाली आहे. मूर्तीच्या पाठ शिळेवर प्रभावळ णसून त्यात लहान-लहान आकारात दशावतार कोरलेले आहेत. [५]
अवतार शिल्पे
संपादनधर्म अभ्युदयासाठी विष्णूने वेळोवेळी अवतार धारण केले. त्यातील काही अवतार हे आंशिक-तात्कालिक तर काही पूर्णावतार आहेत. त्यापैकी नृसिंह हा तात्कालिक अवतार होय. गोदावरी नदीच्या परिसरात नृसिंहाच्या अनेक मूर्ती सापडतात. त्यात प्रामुख्याने राहेर, बेळकुणी, नांदेड, शेलगांव, होट्टल येथील मूर्तीचा समावेश होतो. नृसिंहाची देवळेही नांदेड व राहेर या ठिकाणी आहेत. ७ मे, १२३६ च्या अर्धापूरच्या शिलालेखात सिंघण यादवाने नृसिंह, विनायक, चंडिका देवी व इतर देवतेच्या उपासनेसाठी देणग्या दिल्याचा उल्लेख आहे. या पुराव्यावरून या परिसरात नृसिंहाची उपासना मोठ्या प्रमाणात प्रचलित होती असे दिसते. प्रतिमाशास्त्राच्या दृष्टीने नृसिंहमूर्तीचे खालीलप्रमाणे वर्गीकरण करता येते.
गिरिज नृसिंह
संपादनगिरीज नृसिंह म्हणजे पर्वतातून प्रकट झालेला. गिरीज नृसिंह कधी-कधी पद्मासनात तर कधी-कधी उत्कटासनात दाखवतात. एकटा दाखविल्यास त्यास केवल नृसिंह असेही म्हणतात.
स्थौन नृसिंह
संपादनस्थौन या शब्दाचा अर्थ खांब होय. खांबातून प्रकट झालेला नृसिंह हा स्थौन नृसिंह होय.
यानक नृसिंह
संपादनगरूड किंवा आदिशेषाच्या पाठीवर बसलेली नृसिंहाची मूर्ती यानक नृसिंह म्हणून ओळखली जाते.
योग नृसिंह
संपादनयोग पट्टा बांधून बसलेला नृसिंह म्हणजे तो योग नृसिंह होय.
लक्ष्मी नृसिंह
संपादनलक्ष्मीबरोबर आसनावर बसलेला नृसिंह म्हणजे लक्ष्मीनृसिंह होय.
या नृसिंह मूर्तीचे स्थानक व आसन असे दोन प्रकार असून आसन प्रकाराची विभागणी आणखी दोन प्रकारांत केली जाते. जेव्हा नृसिंह हिरण्याला मारण्यासाठी मांडीवर घेऊन बसतो तेव्हा त्यास आसनप्रकारातील विदारणमूर्ती असे म्हणतात. जेव्हा ही मूर्ती एकटीच असते तेव्हा तिला केवल नृसिंह असे म्हणतात. केवल नृसिंहाचे यानक, गिरीज व योग नृसिंह असे तीन प्रकार आहेत.
वराहमूर्ती
संपादनविष्णू अवतारांपैकी एक अवतार म्हणजे वराह अवतार होय. या अवतारशिल्पांपैची वराहमूर्ति नांदेड जिल्ह्यातील काही भगात आढळतात. सामान्यत: वराहमूर्तीचे शिल्पांकन भूवराह, आदीवराह, नृवराह, यज्ञवराह आणि प्रलयवराह या प्रकारात केले जाते. विष्णूधर्मोत्तरामध्ये भूवराह कसा शिल्पित करावा याचे वर्णन दिले आहे.[६] वराहचे मुख आणि मानवाचे शरीर असे ह्या मूर्तीचे स्वरूप असून ती अलिधासनात उभी आहे. [७]नांदेड जिल्ह्यात वाकाटक, गुप्तकालीन वराहाची मूर्ती शिर लेण्यात सापडलेली आहे.
शिऊर लेण्यात क्रमांक २ मध्ये प्रमाणबद्ध अशा प्रकारची ही भूवराहाची मूर्ती आहे. ही सर्वप्रथम डॉ. प्रभाकर देव आणि डॉ. शेळके यांनी प्रकाशात आणली.[८] याठिकाणी वराह अलिधासनात इभा असून डाव्या हातात त्याने पृथ्वी भूदेवीला धरली आहे. भूदेवी किंचितशी डावीकडे बघत आहे. आज ही मूर्ती झिजलेली असली तरी मूर्तीचे सौंदर्य आणि कलात्मकता कायम आहे.
श्रीराम मूर्ती
संपादनअवतार संकल्पनेत विष्णूच्या राम आणि कृष्ण या इवताराला पूर्णावतार म्हणले आहे. मराठवाड्यात रामाच्या मूर्ती कमी आहेत. कृष्णाच्या मूर्ती तर नाहीतच. नांदेड जिल्ह्यात रामाच्या मूर्ती फक्त दोन ठिकाणी पाहावयास मिळतात. त्यातील एक शिऊर येथील लेणी क्रमांक ३ मध्ये उपलब्ध झाली आहे. प्रथमदर्शनी मूर्ती पाहिल्यावर ओळखू येत नाही. परंतु निरीक्षणानंतर मूर्तीच्या हातात कोदंड असल्याने या मूर्तीस ओळखता येते. ही नांदेड जिल्ह्यातील सर्वात प्राचीन मूर्ती आहे. तर दुसरी मूर्ती होट्टल येथे चालुक्यकालीन देवालयावर आढळते.[९]
शेषशायी विष्णूमूर्ती
संपादननांदेड परिसरात शिऊर येथील लेणी क्रमांक ३ मध्ये शेषशायी विष्णूची मूर्ती आहे. ही मूर्ती शेषासनावर पहूडलेली असून हातात शंख, पद्म, चक्र आणि गदा आहे.
याशिवाय शेषशायी विष्णूची मुर्तिशिल्पे नांदेड जिल्ह्यातील देवालयामधूनही कोरली गेली आहेत. अर्धापूरला असेच अक अप्रतिम शिल्प सापडले आहे. ते सध्या गोदातीर इतिहास संशोधन मंडळाच्या संग्रही आहे. दुसरे एक शिल्प धर्माबाद जवळ जुन्नी या गावी आढळले आहे.
शिवमूर्ती
संपादनशिवमूर्तीचे प्रकार
संपादनविष्णचे जसे अवतार आहेत तसे शिवाचे नाहीत. शिवाने वेगवेगळ्या गोष्टी केल्या, त्याची कथानके आहेत व या कथानकावर आधारलेल्या शिवाच्या प्रतिमा आहेत. नांदेड जिल्ह्यातील सर्वात प्राचीन शिवमूर्ति हदगांव तालुक्यातील शिऊर या गांवी सापडली आहे. नांदेड परिसरात सापडणाऱ्या शिवमूर्ति ह्या प्रामुख्याने केवल शिवमूर्ति, लिंगोद्भवमूर्ति, नरेश व वृषवाहन या प्रकारातल्या आहेत. संहारमूर्तीपैकी अंधकासूर वधमूर्ति व भैरवही काही ठिकाणी आढळतो.
लिंगोद्भव मूर्ती
संपादनलिंगातून उत्पन्न झालेली ती लिंगोद्भवमूर्ति होय. त्याचे कथानक असे सांगतात की, एकदा विष्ण व ब्रह्मदेव यांच्यात श्रेष्ठ कोण याबद्दल वाद सुरू झाला. दोघेही हमरीतुमरीवर आले. शेवटी त्यांच्यात समेट झाला की आपल्या समोर जे मोठे लिंग आहे त्याचे आदि व अन्त शोधन काढ व कोण जिंकतो ते पाहू. उभयपक्षांनी हे मान्य केले. विष्णूनी वराहाचा अवतार घेतला व खाली उडी घेतली. ब्रह्मदेव हंसवाहनानी वर गेले. थकले, शेवटी त्यांनी त्यांना सापडलेले एक फूल आणले. दरम्यान विष्णूही आले, त्यांनी आपण हरलो हे कबूल केले. ब्रह्मानी सांगितले की मला टोक सापडले. मी फूल आणले एवढयात लिंगातून शिवाची मूर्ति प्रगट झाली. हीच ती लिंगोद्भवमूर्ति होय.
वेरूळ व औंढा येथे लिंगातून शिव पूर्ण प्रकट झालेला दाखवलेली मूर्ति आहे, तर शिऊर या ठिकाणी फक्त केवळ शिवलिंगच आहे. डॉ. नि. पु. जोशी असे म्हणतात की, उत्तरेत या मूर्तीत बहुतेक ठिकाणी नुसते शिवलिंगच दर्शवितात. शिऊर मूर्तीची परंपराही उत्तरेची परंपरा आहे, कारण लेण्या गुप्त, वाकाटककालीन आहेत. त्यामुळे त्या लेण्यातही मूतिं दर्शवीत असतांना केवळ लिंगच दर्शविले आहे. शिऊर लेण्यात लेणी क्र. ३ मध्ये ही मूर्ति आढळते. मध्यभागी शिवलिंग असून डाव्या बाजूला ब्रह्मा नमस्कार मद्रेत तर उजव्या बाजूला विष्णू असून विष्णूचा डावा हात शिवालिंगावर आहे. त्यांनी आपला खालचा डावा हात गुडघ्यावर ठेवला वरच्या उजव्या हातात चक्र तर खालचा उजवा हात अभयमद्रेत आहे. डॉ. नि. पु. जोशी यांचा आधार घेतल्यास ही मर्ति लिंगोद्भवमूर्ति म्हणून ओळखता येते. या परिसरातील चालुक्य, यादव, देवळावर हा प्रकार आढळत नाही. त्यामुळे हा प्रकार नंतरच्या काळात या परिसरात प्रचलित राहिला नव्हता असेच म्हणावे लागेल.
नरेश शिवमूर्ती
संपादनवृषवाहन मूर्ती
संपादनअंधकासूरवध मूर्ती
संपादनभैरव
संपादननांदेड जिल्ह्यातील मातृदेवता मूर्ती
संपादनपार्वती
संपादनचामुंडा, काली, महाकाली
संपादनमहिषासुरमर्दिनी
संपादनसरस्वती
संपादनलज्जागौरी
संपादनसप्तमातृका
संपादनकौमारी
संपादनवैष्णवी
संपादननृत्य मातृका
संपादनसंदर्भसूची
संपादन- ^ Dev, P. R. & Shelke, Brahmanical Caves of Siur, 1972
- ^ श्रीवास्तव, बलराम(संपादक), रुपमंडन, मोतीलाल बनारसीदास, वाराणसी, २०१२
- ^ श्रीवास्तव, बलराम(संपादक), रुपमंडन, मोतीलाल बनारसीदास, वाराणसी, २०१२
- ^ Dev, P. R. & Shelke, Brahmanical Caves of Siur, 1972
- ^ देशमुख, भगवान, नांदेड-स्थानिक आणि साहित्य : एक शोध, नांदेड जिल्हा संदर्भ ग्रंथ समिती, १९८६, पृष्ठ - ५५
- ^ द्विवेदी, शिवप्रसाद, विष्णुधर्मोत्तरमहापुरानम्, चौखांभ सुभारती प्रकाशन, वाराणसी, २०१६
- ^ https://www.hindi-web.com/god/[permanent dead link]
- ^ Dev, P. R. & Shelke, Brahmanical Caves of Siur, 1972<
- ^ देशमुख, भगवान, नांदेड-स्थानिक आणि साहित्य : एक शोध, नांदेड जिल्हा संदर्भ ग्रंथ समिती, १९८६, पृष्ठ - ५८